रोजचेच.. (तरही गझल)

(कौतुक शिरोडकरांच्या 'रोजचेच..' या गझलेवरून सुचलेले हे काही  शेर. एवढ्या लहान वृत्तात लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे चूभूद्याघ्या.)


==========
गिरवतोय  रोजचेच
नाद  तेच, वाद  तेच..


रोज 'आजचे  भविष्य'
हाय! कालसारखेच..


भेटलो  किती  दिसात,
हासलो  किती  बळेच..


का  विचारशी  उगीच,
ही  दशा  तुझ्यामुळेच !


सत्य  बोलतो  खुशाल
संपलेत  डावपेच.


काळजी  करू  नकोस;
'सोडली'  तुझ्यासवेच..


गे, तुला  कधी  कळेल-
जिंकतात  कासवेच..!!


वाद  वाढवू  उद्यास
तूर्त  आज  एवढेच !


 


 


-ज्ञानेश.
==========

प्रतिसाद

गिरवतोय  रोजचेच       #वाह !!
नाद  तेच, वाद  तेच..
रोज 'आजचे  भविष्य'  # पटले...
हाय! कालसारखेच..


का  विचारशी  उगीच, #अफलातुन...शेर....
ही  दशा  तुझ्यामुळेच !


सत्य  बोलतो  खुशाल  # हे ही पटले...
संपलेत  डावपेच.


काळजी  करू  नकोस;  #अफलातुन...शेर....
'सोडली'  तुझ्यासवेच..

वाद  वाढवू  उद्यास  #अफलातुन...शेर....
तूर्त  आज  एवढेच !

ज्ञानेश,
चांगली गझल आहे.
मी आपल्याला तरही गझलसाठी एक आव्हान देतो.
मला आपल्या गझला वाचायला मजा येते म्हणुन आव्हान देत आहे.
 
जमीन - 'उशीर झाला तेव्हा कळले उशीर झालेला आहे'
'उशीर' - काफिया
'झालेला आहे' - रदीफ
मतल्यातील दुसरी ओळ - 'उशीर झाला तेव्हा कळले उशीर झालेला आहे'
अट - किमान पाच शेर!
मात्रा - ३० ( १५ गुरू )
प्रतिसादात दिलीत तरी चालेल. परत सांगतो, आपल्या गझला आवडतात म्हणुन हे आव्हान देत आहे.
धन्यवाद!

भुषणजी,
प्रयत्न जरूर करेन. फक्त थोडा वेळ द्यावा...

तारकां लपे बिळांत
चमकतात काजवेच
चोर होतसे प्रसिद्ध
अडकतात भाबडेच
ज्ञानेश,
ते 'हाय' काढता आले तर पहा ना.
रोज पाहतो भविष्य
आज-काल तेच तेच   ...  असे काही?
काळजी  करू  नकोस;
'सोडली'  तुझ्यासवेच..
   ...  हे आवडले.
...आणि आमच्या कासवाला छान सांभाळलेत.
कलोअ चूभूद्याघ्या

गिरवतोय  रोजचेच
नाद  तेच, वाद  तेच..
सर्वप्रथम एक सांगावेसे वाटते की वृत्ताच्या लांबीरुंदीवर यशस्विता ठरत नाही. लहान वृत्तात गझल करण्याचा 'प्रयत्न' म्हणणे हे अयोग्य आहे. कारण जो गझलकार असतो तो  वृत्त ठरवुन गझल करत नाही. मनातील विचार गझलेत मांडणे यासाठी खालील ३ गोष्टींचीच फक्त आवश्यकता आहे.
विचार ( यात नावीन्य, उपमा, शब्द सुचणे, अलंकारिकता, हृदयस्पर्शी कल्पना हे आले )
वृत्ताची जाण ( यात सहजता अत्यंत महत्वाची )
गझल व इतर काव्यप्रकारांमधील भेदाची जाण.
तेव्हा मुळातच विचार येतात ते एखाद्या वृत्तात येणे हे जन्मजात गझलकाराचे लक्षण मानावे.
मतल्यामधे कवीने 'नाद' हा शब्द टाळायला पाहिजे असे आमचे अत्यंत आग्रही मत आहे. कारण 'रोजचेच' व 'वाद तेच' यामधे एक दृढ असा परस्पर संबंध आहे जो 'नाद तेच' ने निष्कारण संदिग्ध होतो. 

रोज 'आजचे  भविष्य'
हाय! कालसारखेच..
'हाय' हा शब्द सुरेश भटांनी अनेक वेळा वापरला होता. तो शब्द तसा इथेही बर्‍यापैकी वापरला गेला आहे. मात्र थोडेसे संदर्भ तपासले तर असे वाटु शकेल की सुरेश भटांनी सर्वसाधारणपणे 'हाय' हा शब्द अत्यंत नाजुक भावना मांडण्यासाठी वापरला होता. जसे प्रेमाच्याबाबतीत वगैरे. ( असेच आहे असे नाही, पण बर्‍याच वेळा तसे असेल असे वाटते ). अर्थात 'हाय' हा शब्द काही असा नाही की तो कधी वापरावा यावर काही बंधने असावीत किंवा त्यात कुणाचातरी काही एक्सक्लुझिव्ह अधिकार असावा. पण एखादा शब्दच असा असतो की त्याला स्वतःचे एक रुपडे असते. म्हणजे कधी 'हाय' म्हणावेसे वाटते असा प्रश्न आपण स्वतःला विचारला की काही विशिष्ट परिस्थिती डोळ्यासमोर येऊ शकतात. त्यात रोजच आजचे भविष्य कालच्यासारखेच आहे ही परिस्थिती 'हाय' म्हणण्यासारखी आहे का ...
अशी हाय गेली उरातुन माझ्या
तिचे सांजवेळी हसे लुप्त झाले ( याच कवीची एक गझल 'लुप्त' )
याच्यातली हाय जास्त योग्य आहे असा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर कवी अजय जोशी यांची दुरुस्ती आम्हाला योग्य वाटते.


भेटलो  किती  दिसात,
हासलो  किती  बळेच..
सुंदर शेर. मराठी भाषेला कधी कसे किती वळवायचे हा कवीचा वैयक्तिक प्रश्न असुन ते कसे स्वीकारायचे हा रसिकांचा खासगी प्रश्न आहे. 'दिसात' या शब्दामधे ग्रामीण मराठीचा समावेश केला आहे, जो एकंदर गझलेला एक छोटा फाट देउन जातो.  


का  विचारशी  उगीच,
ही  दशा  तुझ्यामुळेच !
हा शेर आमच्यामते अनावश्यक आहे. म्हणजे 'हासलो बळेच' मधे जी परिस्थिती डोळ्यासमोर येतीय तीच जरा अधोरेखित करणारा हा शेर वाटतो.


सत्य  बोलतो  खुशाल
संपलेत  डावपेच.
सुंदर शेर आहे.


काळजी  करू  नकोस;
'सोडली'  तुझ्यासवेच..
हा शेर मार खातो. इथे सोडलीला अवतरण चिन्हे वापरुन काय सोडली ते रसिकाला व्यवस्थित समजेल याची काळजी घेतली गेली आहे. पण मुळातच आशयाच्या दृष्टीने अत्यंत कच्चा शेर आहे. कवीने सोमरसपानाचा त्याग करणे किंवा न करणे हे इतर कुणाला काळजीचे का वाटावे असा एक बाळबोध सवाल निर्माण होतो. हे कुणाला सांगीतले जात आहे असाही एक प्रश्न निर्माण होतो. कारण आत्तापर्यंत प्रेयसी होती, आता मी दारु सोडलीय तू काळजी करु नकोस याच्यात प्रेयसीच्या ऐवजी एक नवीन सजीव समाविष्ट झाला असावा असा भारतीय संस्कृतीला अनुसरुन आमच्या मनात विचार येतो. आपल्या देशात प्रेयसीला हे सांगावे लागते हे मान्य आहे की तू काळजी करू नकोस कारण मी सोडली आहे, पण हे अजून फारसे सांगावे लागत नसावे की मी जी काही सोडलीय ती तुझ्याबरोबरच सोडलीय. किंवा कवी या गझला दुसर्‍या गोलार्धातून प्रकाशित करत असल्यास माहीत नाही. आणखीन एक नवाच विचार असा की कवीने प्रेयसी आणि दारू एकदमच सोडल्या आहेत की प्रेयसीने व कवीन एकदमच दारू सोडली आहे हे आकलन व्हायला जरा जड जाते. त्यामुळे या शेरामधे ऐकणारी व्यक्ति प्रेयसी असण्याची शक्यता मावळते. तो कुणीतरी मित्र असावा ज्याला ' आपण एकट्यानेच सोडली, हा लेकाचा मला फसवुन अजून ढोसतच असतो ' अशा स्वरुपाच्या काही तक्रारी असाव्यात.


गे, तुला  कधी  कळेल-
जिंकतात  कासवेच..!!
फार म्हणजे फारच उत्तम शेर आहे.


वाद  वाढवू  उद्यास
तूर्त  आज  एवढेच !
हा तसा बरा शेर आहे. मात्र याच्यात 'आज एवढेच' मधे ते एवढेच काय आहे हे लक्षात यायला पाहिजे. म्हणजे 'आज फक्त प्रणयाराधन, वाद उद्या वाढवुयात' असे आहे का 'आज एवढाच वाद किंवा टोमणे, बाकी वाद उद्या वाढवुयात' असा अर्थ आहे ते कळत नाही. कदाचित असेही असू शकेल की 'आज फक्त गझल करु, वाद उद्या घालू' . म्हणजे गझल करतानाच प्रचंड वाद होण्याची हमी कवीला स्वतःलाच वाटत आहे.
एकंदर गझल ठीक अन चांगली यांच्या सीमारेषेवर आहे.
वृत्त, शब्दरचना, खयाल यांच्या निकषावर व कवीने स्वतःच नम्रपणे 'प्रयत्न' म्हंटले आहे याची नोंद घेउन... १०० पैकी ६२.