गझलियत

मित्रांनो,


माझ्या बोचर्‍या शैलीमुळे मी अप्रिय असेन याची मला कल्पना आहे. पण आपण सर्व शेवटी मित्र आहोत व शायर आहोत. तेव्हा राग सोडुन द्यावा अशी विनंती.


वारंवार जे मुद्दे लिहीत आलो ते एकत्रित सांगण्याची इच्छा झाली. विनंती अशी आहे की आपण त्यावर आपली मते द्यावीत.


१. मालिश - आई जेव्हा आपल्या शाळेत जाणार्‍या व भरपूर खेळणार्‍या मुलाच्या अंगावरून रात्री 'दमला असेल' असे म्हणुन प्रेमाने हात फिरवते, तेव्हा मुलाला अचानक जाणवते की किती ठिकाणी त्याचे अंग दुखत होते. गझल ऐकताना श्रोत्याला नेमके असेच वाटायला पाहिजे की किती मनोवेदना या जगात आपण झेलत आहोत ते गझल ऐकल्यावर कळले. याचा संबंध व्यक्तीकरणाशी आहे. प्रत्येकजण सर्व गोष्टी व्यक्त करत नाही. करू शकत नाही. गझल त्याची ती इच्छा पूर्ण करते. मनोव्यापारांना गझलेत प्रचंड महत्व आहे. त्यामुळेच पूर्णपणे सामाजिक ( एखादा शेर असणे वेगळे ), पूर्णपणे श्रुंगारिक वा  स्तोत्र स्वरुपाच्या रचना गझला ठरू शकत नाहीत.


२. गझल ऐकताना रसिक त्या शेरांमधे व्यक्त झालेल्या मनस्थितीमध्ये गेला पाहिजे, हे यशस्वी गझलेचे निदर्शक आहे.


३. जर तो त्या मनस्थितीत जात नसेल तर शायराची मनस्थिती  समजावून घेण्याची त्याला मनापासून इच्छा व्हायला पाहिजे. हेही यशस्वी गझलेचे निदर्शक आहे. जसे ' हे नसे थोडके', 'दु:खाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा' अशा गझला.


४. गझलमधे अशी ताकद पाहिजे ज्यामुळे गझल या काव्यप्रकाराचे रसिकाला वेड लागले पाहिजे.


५. सर्व अनुभव सर्वांना येत नाहीत. तरी गझल ऐकताना तो अनुभव आल्याचे वाटले पाहिजे.


६. प्रत्येक शेराच्या पहिल्या ओळीचा दुसर्‍या ओळीशी संबंध असलाच पाहिजे. तो जाणवलाच पाहिजे.


७. क्लिष्ट अर्थ असलेल्या गझला चांगल्या का वाईट हा प्रश्न नसून प्रश्न असा आहे की गझल हा काव्यप्रकार जर लोकप्रिय करायचा असेल तर तो सर्वसामान्यांच्या मनाला भिडलाच पाहिजे. अर्थ काढत बसावे लागणे हे गझलेसाठी पोषक नाही. गझल हा काव्यप्रकार लोकप्रिय करायचा नसेल तरीही साध्या शब्दात, सहज कळेल असा मुद्दा मांडणे अत्यंत आवश्यक आहे.


८. कानाला गोड वाटणार्‍या, अलंकारिक शब्दांनी नटलेल्या, द्विपदीमधे संपूर्ण कहाणी न सांगता छोटीशीच बात सांगणार्‍या रचना या कविता असतात. त्यांचे मुल्य गझलेपेक्षा कमी असते असे नाही, पण त्या गझला नसतात. गझलमधे दोन ओळींत बराच व्यापक मुद्दा असतो. नुसता आशय वाढला की गझल झाली असेही नाही. गझल व कविता यातील प्रमुख किंवा एकमेव सर्वात महत्वाचा फरक असा की गजलेची नशा येते, कवितेची येतेच असे नाही किंवा येत नाही.


आता बघा:


देर लगी आनेमे तुमको, शुक्र है फिरभी आये तो


ही मुळात गझल आहे. पण 'विजयपथ' या हिंदी चित्रपटात त्याचे जे गाणे केले आहे ते फक्त काही काळ आवडू शकते, तेही प्रामुख्याने संगीतामुळे.


तेच शहरयार खानचे सीनेमे जलन मात्र छान सादर केले गेले आहे.


गझलची कविता करायला काहीच लागत नाही, कवितेची गझल करायला आयुष्यदेखील जाऊ शकते.


मित्रांनो,


गझल करणे, गझलवर बोलणे, समीक्षा करणे, दाद देणे या सर्व भिन्न गोष्टी आहेत. मी हे वरील जे काही लिहिले आहे त्यातून मला असे मुळीच म्हणायचे नाही ( म्हणुच शकत नाही ) की माझ्या गझला वरील निकषांप्रमाणे आहेत.


आपली मते द्यावीत अशी विनंती. 


 


 

गझलचर्चा: 

प्रतिसाद

१. पूर्णपणे सामाजिक ( एखादा शेर असणे वेगळे ), पूर्णपणे श्रुंगारिक वा  स्तोत्र स्वरुपाच्या रचना गझला ठरू शकत नाहीत.
>>   काळाप्रमाणे उर्दू गझलेतही फरक झाला आहे.
गझलेची बाराखडी :-
बदलत्या काळाच्या संदर्भानुसार गझलेमधील शेरांचे संदर्भ बदलू शकतात. पण गझल म्हणजे काय हे कवीच्या सोयीनुसार ठरत नसते- आणि ते समीक्षकांच्या सोयीनुसार नव्हेच नव्हे!
गझलेची बाराखडी :-
मराठी गझलेसाठी आवश्यक असलेली प्रतिमा, रूपके आणि संकेत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वातावरणात भरपूर आहेत. मराठी गझलेला मराठी मातीचाच सुगंध आला पाहिजे.
मराठी मातीत भक्ती ओतप्रोत भरलेली आहे. ती गझल स्वरूपातूनही येवू शकते.
२. गझलमधे अशी ताकद पाहिजे ज्यामुळे गझल या काव्यप्रकाराचे रसिकाला वेड लागले पाहिजे.
>>  कोणत्याही काव्यामुळे वेड लागले पाहिजे. समोरचाही तसाच असावा लागतो.
३. अर्थ काढत बसावे लागणे हे गझलेसाठी पोषक नाही.
>>  ज्याला मराठी असूनही मराठी शब्दांचे अर्थ कळत नसतील त्याला काय करावे? मी पहिलीत असून दहावीत जाणार नाही असेच झाले. बोली भाषा दर २५ किलोमीटरमागे बदलते.
     भटांचे म्हणणे पहा...
जरी ह्या वर्तमानाला, कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या, पिढ्यांशी बोलतो आम्ही

४. कानाला गोड वाटणार्‍या, अलंकारिक शब्दांनी नटलेल्या, ....रचना या कविता असतात.
>>  गझलेतही हे असणे मुळीच गैर नाही. बोजड शब्द नसावेत इतकेच.
५. गझल व कविता यातील प्रमुख किंवा एकमेव सर्वात महत्वाचा फरक असा की गजलेची नशा येते, कवितेची येतेच असे नाही किंवा येत नाही.
>>  भटांच्या अनेक कवितांची (कविता हं.. गझल नाही) आजही लोकाना नशा आहे. गझलेची गोष्टच वेगळी. तुमची लेखणी किती ताकदवान आहे यांवर ते अवलंबून आहे.
कलोअ चूभूद्याघ्या

प्रिय मित्र अजय,
असे करू नये. पूर्ण मुद्दा नीट वाचावा व समजून घ्यावा.
१. काळाप्रमाणे उर्दू गझलेत झालेला फरक सोदाहरण दाखवा पाहू? ( तो फरक हा गझलेच्या आत्म्यासंदर्भात झालेला असला पाहिजे बर का? म्हणजे गझलेतून मनोव्यापार नाहीसे झाले, फक्त सामाजिक विषय यायला लागले, फक्त श्रुंगारिक विषय यायला लागले, फक्त देवभक्ती यायला लागली असे बदल. परत सांगतो, एखाद दोन शेर तसे असणे वेगळे! )
२. गझल म्हणजे काय हे कवीच्या सोयीने ठरत नसते - हे विधान त्यांनी अत्यंत वेगळ्या संदर्भात केलेले आहे, जे आपण लक्षात घेतलेले दिसत नाही. तांत्रिकदृष्ट्या गझल म्हणजे काय हे कवी किंवा समीक्षक ठरवू शकत नाही असे त्यांना म्हणायचे आहे. गझलेचे तंत्र हे आधीच सर्वमान्य झालेले आहे. शेरांचा संदर्भ बदलणे शक्य आहे हे तर मान्यच आहे. पण परत तोच मुद्दा सांगतो. भटांच्या किती गझला अशा आहेत ज्याच्यात कवीचे मनोव्यापार नाहीत?
३. मराठी मातीचा सुगंध - मराठी गझलेला मराठी मातीचा सुगंध येणे म्हणजे संदर्भ मराठीचे, शब्द, वाक्प्रचार मराठीचे वगैरे! याचा अर्थ असा की मराठीमधे तुम्ही 'प्रेयसीने बुरखा दूर सारल्यावर चंद्र लाजून ढगाआड गेला' असे म्हणण्यात काही अर्थच नाही. याचा अर्थ असा नाही की मराठीमधे जे काव्यप्रकार आहेत ( अभंग, लावणी ) त्यांचे आशय घेऊन गझल होऊ शकते. आता बघा: मानस ६ ची ओळ आहे की 'ईश्वरा, मी तुला शेवटचे कधी आठवले हे आठवत नाही'. याच्यात मनोव्यापार आहे. भक्ती नाहीये. पण माकडांचा खेळ करणारा मदारी भिकारी होतो हे विधान फार तर सामाजिक आहे. ती गझल होऊ शकत नाही, जोपर्यंत कवी स्वतःच मदारी आहे व ते रसिकांना माहिती आहे.
४. ़कोणत्याही काव्यामुळे वेड लागले पाहिजे - मला सांगा, बीडी जलाईले हेही एक काव्यच आहे की नाही? माझे माहेर पंढरी पण काव्यच आहे. हात नका लावू माझ्या साडीला हेही काव्यच आहे. प्रत्येकाचे वेडही लागू शकते. पण आपल्या आसपास गझलवेडे किती दिसतात?तुलनेने  फार कमी! मला एवढेच म्हणायचे आहे की जी गझल रचली जाईल तिचे वेड लागली पाहिजे. बघा, वाटले बरे किती, केव्हातरी, जाणीव, जुने विसरून गेलेले यातील शेरांचे वेड लागू शकते की नाही? मी कुठे म्हणतोय इतर प्रकारांचे वेड लागू नये?
५. समोरचा तसा असला पाहिजे - कृपया जास्त स्पष्ट करावेत.
६.  मराठी असून मराठी कळत नाही - प्रिय मित्र, कृपया समजून घ्या.शब्दार्थ सगळ्यांनाच समजतायत. पण कवीला अभिप्रेत असलेला अर्थ त्या शब्दांमधून निघतोय का हे महत्वाचे. जसे प्रिय मित्र चुरीच्या कॉलेजच्या शेराचा अर्थ त्याने सांगीतल्यावर समजला, पण ती काल कॉलेजला गेली होती तर आज शाळेत कशी या शब्दांचा शब्दार्थ समजूनही शेर समजत नव्हता. आपण लिहिले आहेत की ग्रंथास जाळण्याचे कारण की तुझ्या रक्तात वेद मिसळावेत. एक तर आधी याच्यात मनोव्यापार नाही, हे तत्वज्ञान झाले. त्यात परत शब्दार्थ घेतला तर असा: रक्तात वेद मिसळावेत म्हणुन ग्रंथ जाळतायत. ही गझल कशी बरे? अर्थ तर कळला की? आता बघा:
गाहे गाहे इसे पढा कीजे
दिलसे बेहतर कोई किताब नही
ही गझल वाटते की नाही?
तिचे सौंदर्य मला खेचून नेते - यात प्रत्यक्षात कुणी कुणाला खेचत नाहीये, पण मन खेचले जातेय, हे समजते, तसे आपल्या त्या तीन शेरांबद्दल सांगा बरे?
७. अलंकारिक , कानाला गोड वाटणार्‍या - पुन्हा वाचा, छोटीशीच बात सांगणार्‍या असाही एक मुद्दा लिहिलाय मी. आपण भटांची इतकी उदाहरणे दिलीत, मुखपृष्ठावर त्यांचे वाक्य आहे तेही वाचा. अलंकारिक व थयथयाट असे.
८.नशा - भटांच्या कवितांची नशा आहे. मग मी कुठे नाही म्हणतोय? मी असे म्हंटले आहे की 'नशा येतेच असे नाही किंवा येत नाही' यातील काहीही एक होऊ शकते. भटांची एक गझल अशी दाखवा ज्याची अजिबात नशा येत नाही. मी असे म्हणतोय की गझलेची 'नशा' ही यायलाच पाहिजे. तरच ती गझल!
 
 

मी  गझलेचा जाणकार नाही, हे तर तुम्ही जाणताच. माझा गझलेचा फार व्यासंग नाही हे आधीच नमूद करतो. फक्त चर्चेत भाग घ्यावासा वाटला , म्हणून प्रतिसाद देतोय.
गझल हा मुळातच कठीण काव्यप्रकार आहे.  इतर कुठल्याही काव्यप्रकारापेक्षा तंत्राची आणि व्याकरणाची जास्त बंधने यात आहेत. केवळ दोन ओळींच्या मर्यादेत सगळा आशय व्यक्त करण्याचे आव्हान कवीपुढे असते, तेही काफिया, अलामत आणि वृताची अट सांभाळून! या किचकटपणामुळे आधीच गझलेला लोकाश्रय फार नाही. त्यात गझलेच्या आशयावरसुद्धा ठरावीक साचेबद्धपणाची बंधने आली, तर गझल लोकप्रिय होणार कशी? याचा अर्थ असा नाही की गझल लगेच बाजारू करावी, पण ती थोडी अधिक लोकाभिमुख झाली तर काय हरकत आहे?
आणि असे करायचे नसेल, 'गझल फक्त अभिजनांसाठी असावी' असा प्रयत्न असेल तरीही कालानुरूप बदल व्हायलाच हवेत, असे मला वाटते. 'फक्त कवीच्या वैयक्तिक वेदनेचे/अनुभवाचे प्रकटीकरण' असे  गझलेचे स्वरूप का असावे? काही सामाजिक, शृंगारीक, विनोदी, भक्तिमय प्रवाह गझलेतून आले(अर्थात, गझलेच्या मुलभूत अटी पुर्ण करून, बाराखडीत दिलेल्या व्याख्येनुसार..) तर त्याचे स्वागतच झाले पाहिजे.
गझलेचे वेड लागले पाहिजे, तिची नशा आली पाहिजे हे तुमचे मुद्दे मलाही मान्य आहेत.
पण सगळेच जण गझलेतून तेच ते विषय मांडू लागले, तर तिचे नाविन्य काय राहील? आधीच मराठीचे अनुभवविश्व मर्यादित, त्यातही तेच ते कवाफी आल्याने आजच अनेक गझला  "हमशकल" वाटतात की नाही? मग आशयाच्या दृष्टीनेही त्या एकसारख्या असल्या तर या साधर्म्याचा  कंटाळा येणार नाही का?
" कानाला गोड वाटणार्‍या, अलंकारिक शब्दांनी नटलेल्या, द्विपदीमधे संपूर्ण कहाणी न सांगता छोटीशीच बात सांगणार्‍या रचना या कविता असतात. त्यांचे मुल्य गझलेपेक्षा कमी असते असे नाही, पण त्या गझला नसतात..." या विधानावर माझा मुख्य आक्षेप आहे.
आता हेच पहा-
"अशी तारकांनी असूया करावी तुला पाहता,
सदा चंद्र- सुर्यात संवाद व्हावे अशी गोड तू.." किंवा
"तुझे मूल्य जाणून झाले अचंबीत ब्रम्हांड हे,
कुबेरासही मी भिकारी गणावे, अशी गोड तू.."
याला तुमच्या मते 'गझल'म्हणता येत नाही, हो ना? (कारण सगळेच शेर शृंगारीक आहेत) पण अशी नजाकत नसलेली, स्वतःच्या दु:खाबद्दल बोलणारी, शब्दाला शब्द जोडून केलेली कोणतीही रचना (उदाहरणे तुमच्याकडे असतीलच) गझल म्हणून चालेल! फार तर तिला वाईट गझल म्हणाल, पण निदान गझलेचा दर्जा तरी द्याल. पण 'अशी गोड..' ही गझल नाही. आहे की नाही गंमत!
दुसरे उदाहरण-
"नकोच  बोलू शब्द एकही - फक्त रिंग दे..
तुझा अबोला मला कळावा, एक फोन कर.."

यात तुमच्या मते गझलियत असेल वा नसेल, पण अशा रचना आल्याशिवाय गझल लोकप्रिय होणार नाही, तिची वाढ खुंटेल हे सत्य आहे! गझलेचे  शरीर  असलेली , आणि 'प्रामाणिक' असलेली कोणतीही रचना गझल म्हणून स्विकारली जावी, असे वाटते.

असो! ही सर्व माझी मते आहेत. चर्चेसाठी खुली आहेत.
इतरांचीही मते वाचायला आवडेल.

प्रिय मित्र ज्ञानेश,
फारच छान प्रतिसाद दिलास. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
१. विरह हा एक विषय जर घेतला, तरः
हसरत मोहानी - आगया गर वस्लकी शबभी कहीं जिक्रे फिराक
                              वो तेरा रो रो के मुझकोभी रुलाना याद है
अमीर - शबे फुरकत का जागा हुं फरिश्तो अब तो सोने दो
               कभी फुरसतमे करलेना हिसाब आहिस्ता आहिस्ता
मोमीनचा एक शेर मी कुठेतरी दिलाच आहे ज्याचा अर्थ असा आहे की रे मृत्यो, तू येणार हे तर सत्य आहेच, मग या विरहाच्या रात्रीतच आला असतास तर बरे झाले असते.
एकच विषय पण नावीन्य!
२. अशी गोड तू - मला हे समजत नाही की स्वतः अत्यंत उत्कृष्ट गझला करून तू असे मुद्दे कसे मांडतोस? आता तुझीच गझल बघः
पुन्हा ती भेटली तेव्हा जराशी वेगळी वाटे
इरादे भासले होते तिचे बदलून गेलेले ( नेमके शब्द लक्षात नसले तरी आशय हाच होता )
या शेरात किती अर्थ आहे? भरपूर. याऐवजी अशी गोड तू ही रचना अत्यंत छान असली तरी अर्थ फक्त प्रणयाराधनाइतकाच आहे. असे वर्णन ऐकून फार तर प्रेयसी तुमच्या प्रेमात पडेल. एकदा संसार सुरू झाल्यावर नाही कवी तिच्याबद्दल अशा रचना करण्याची हमी नाही तिला त्याच भावना मनात येण्याची हमी! मला एवढेच म्हणायचे आहे की अशी गोड तू ही गझलेसारखी रचना असली तरी गझल नाही. कारण आशय अतिशय त्रोटक आहे. त्यात अनुभुती नाही. अनुभुतीचे इमले नाहीत. व्यथा तर नाहीच. व्यक्तीकरण आहे पण मर्यादीत! मला कवीच्या क्षमतेबाबत काहीही म्हणायचे नाही. जो माणूस 'अशी गोड तू' ही रचना करू शकतो तो निश्चीतच दर्जेदार गझल करू शकेल. पण ही गझल नाही.
३. इतर प्रवाह - जरूर गझलेत इतर प्रवाह येऊ शकतात. पण मला एक सांग, स्वामींच्या रचना या शुद्ध तत्वज्ञान वाटत नाहीत का? अशी गोड तू ही एका मिनिटासाठी मुसलअसल गझल मानली तरी त्यात मुळात सर्व शेरांत एकच मुद्दा वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेला नाही का? समजा शायर एकदा प्रेयसीला, एकदा जिंदगीला, एकदा आईला, एकदा स्वतःच्या मुलीला, एकदा गझलेला, एकदा कलाकाराच्या अदाकारीला गोड म्हणला असता तर ठीक होते. पण २६ शेर ( संख्येबद्दल मला फारसे काही नाही ) रचून एकच मुद्दा सांगणे योग्य आहे का?
वर दिलेली हसरत मोहानींची जी सुप्रसिद्ध गझल आहे ना, चुपके चुपके, त्यात जवळ जवळ ११ का काहीतरी शेर आहेत. प्रत्येक शेरात शेवटी हेच सांगीतले आहे की ते जुने प्रेमयुग आठवते. पण त्याच्यात उल्लेख केलेल्या प्रसंगांना वाचलेकी अंगावर काटा येतो. अशी अनुभुती होते का तुझ्या अपेक्षित इतर प्रवाहातून?
प्रिय मित्र, गझल वाचल्यावर वाचक ( किंवा ऐकल्यावर श्रोता ) शायराच्या मनस्थितीत जाणे किंवा शायराच्या मनस्थितीला जाणून नैसर्गीक दाद देणे हे अत्यावश्यक आहे.
असो. या साईटवरच स्वतः चित्तरंजन, प्रदीप,अनंत,  तू, समीर, केदार, उपरा, मानस, यांनी कितीतरी उत्कृष्ट गझला व शेर रचले आहेत. ते व इतर समोरासमोर ठेवले की सहज फरक कळेल.