सुखकर्ता
सुखकर्ता
कधी समजून मला न गेले कोणी
आज मन माझे उमजून गेले कोणी
सावलीचेही संग जिथे नव्हते
ताफा साथ करुन गेले कोणी
हरवलेल्या मला गावही नव्हते
पत्त्यावर पोहचवून गेले कोणी
रडून डोळ्यांतले अश्रूही संपलेले
ओठांवर हासू फुलवून गेले कोणी
उदासीत या हर्ष जराही नव्हते
ओंजळीत सुख भरुन गेले कोणी
सुखकर्त्याला जगभर शोधत होते
'ह्रदयातच तो आहे' वदून गेले कोणी
- स्वप्ना
Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
संपादक
मंगळ, 24/04/2007 - 18:02
Permalink
मत
कल्पना चांगल्या आहेत. पण आपल्या या रचनेतल्या पहिल्या दोन ओळींत वृत्त, यमक (काफिया) आणि अन्त्ययमक (असल्यास) कुठले हे स्पष्ट होत नाही. मतल्यात दोन्ही ओळींत यमक (काफिया) आणि अन्त्ययमक (असल्यास) हवेच. त्याशिवाय मतला होणार नाही.
ह्या रचनेत गेलेही कोणी हे रदीफ आहे असे समजले तर ते कमजोर वाटते. गेलेही मधील ही मुळे ही समस्या आली आहे असे वाटते. त्याऐवजी गेले कोणी असे रदीफ घ्या.
संपूर्ण गझल एकाच वृत्तात असायला हवी. ह्या रचनेबाबत असे म्हणता येणार नाही.
पुन्हापुन्हा बाराखडी वाचावी. अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्तात गझल लिहिली जाते. वृत्तांचा अभ्यास करावा. लघू आणि गुरू म्हणजे काय, ह्याचा अभ्यास करावा. अक्षरगण कसे पडतात किंवा मात्रा कशा मोजतात, हे देखील समजून घ्यावे. किमान एवढ्या गोष्टी गझल लिहू इच्छिणार्याला शिकणे आवश्यक आहे. पहिल्या दोन ओळी (मतला) निर्दोष होत नाहीत तोपर्यंत पुढे जाऊ नये.
समीर चव्हाण (not verified)
बुध, 25/04/2007 - 14:56
Permalink
अभिप्राय
आपल्या गझल सारख्या रचनेचा साधेपणा भावला. विशेष करून
सुखकर्त्याला जगभर शोधत होते
'ह्रदयातच आहे' वदून गेले कोणी
(`ह्रदयातच तो' असे करावे म्हणजे निर्दोष होईल)
आणि
उदासीत या हर्ष नावालाही नव्हते
ओंजळीत सुख भरुन गेले कोणी
इथे दुसरी ओळ सुंदर जमलीय. मात्र पहिल्या ओळीत गडबड आहे.
तुमचे मीटर असे पाहता येईल: ८ मात्रा| ८ मात्रा| ४ मात्रा
उदासीत या| हर्ष नावालाही |नव्हते
८ मात्रा | गडबड | ४ मात्रा
गझल लिहायची असेल तर व्याकरणाचा अभ्यास करावा लागेल.
शुभेच्छा.