मनातल्या मनात मी...

कविवर्य सुरेश भट यांच्या गीतांवर काही लिहावे, असे बऱयाच दिवसांपासून मनात घोळत होते. गाणं म्हटलं की, आपल्या डोळ्यांपुढे जी रचना (आकृतिबंधाच्या दृष्टीने) येते, तशा प्रकारची गाणी कविवर्य भट यांनी रचलेली नाहीत. रचनेपासूनच ती वेगळी आहेत. आशय तर काय, बंदा रुपयाच.

या सदरात आकृतिबंधाची वैशिष्ट्ये सांगण्यापेक्षा आशयावरच भर दिला जाईल.दर पंधरवड्याला एक अशा प्रकारे या संकेतस्थळावर कविवर्य भट यांच्या गाण्यांवर लिहायचे आहे...त्याची ही सुरुवात. मनातल्या मनात मी...या नितांतसुंदर गीतापासून.



मनातल्या मनात मी...

मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो !

अशीच रोज नाहुनी
लपेट उन्ह कोवळे
असेच चिंब केस तू
उन्हात सोड मोकळे
 
तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो !

अशीच रोज अंगणी
लवून वेच तू फुले
असेच सांग लाजुनी
कळ्यांस गूज आपुले

तुझ्या कळ्या, तुझी फुले इथे टिपून काढतो !

अजून तू अजाण ह्या
कुंवार कर्दळीपरी
गडे विचार जाणत्या
जुईस एकदा तरी
'दुरून कोण हा तुझा मरंद रोज चाखतो...?'

तसा न राहिला अता
उदास एकटेपणा
तुझीच रूपपल्लवी
जिथे तिथे करी खुणा
पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो !

.................................... "   


मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो


ही रचना प्रेयसीला उद्देशून आहे, हे तर स्पष्टच कळावे. पण ही प्रेयसी आणि प्रियकर दोघेही आहेत वाढाळू वयातील. त्या वयाच्या आसपासचे. दोघांची भेट आधी झालेलीच आहे. पण आता दोघेही दुरावलेत. तिच्या आठवणींची आवर्तनं त्याच्या मनात सुरू आहेत. तीही तिकडे दूर उमलत आहे, बहरत आहे. त्याच्या नजरेआड. तिचं उमलणं, बहरणं त्याला जवळून पाहायचं आहे. न्याहाळायचं आहे. निरखायचं आहे. पण ते शक्य नाही. मग अशा वेळी धावून येतं ते आपलं मनच. तो तिला आपल्या मनात कधीही, कुठूनही बोलावू शकतो. किंवा उलटही घडू शकते. तोही तिच्यापर्यंत पोचू शकतो. तिच्या जवळ घुटमळू शकतो. या कवितेतील प्रियकर तेच करत आहे. मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो...पण हे तिला तो कळू देत नाही. कारण ती संकोचू नये. तिचे सर्वांगाने उमलणे-बहरणे आणि हे होत असताना लाजणे, स्वतःशीच हसणे (कधी कधी त्याची आठवण येऊनही) हे सारे त्याला नीट पाहायचे आहे...डोळ्यांत, मनात साठवून घ्यायचे आहे. या तिच्या वसंतोत्सवात त्याला तिच्या आसपासच वावरायचे आहे. तिच्याही नकळत....म्हणून - तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो.

आपण तिच्या आसपास असताना तिने काय काय करावे, तिने काय काय केलेले आपण पाहावे, याच्या कवीने काही कल्पना केलेल्या आहेत. मी मनात्याल मनात तुझ्यासमीप राहत असताना तू काय करावेस.....? हे करावे -


अशीच रोज नाहुनी
लपेट उन्ह कोवळे
असेच चिंब केस तू
उन्हात सोड मोकळे


रोज न्हायल्यानंतर कोवळ्या उन्हात बसायला ये...तुझ्या नवकांतीवर हे कोवळे उन्ह, नवसूर्याचे कोवळे किरण पडू देत.तुझी (गौर) नवकांती आणि ते पिवळसर कोवळे किरण या दोन्ही पिवळेपणांचा संगम घडू दे.
उन्ह लपेटण्याबरोबरच तू तुझे न्हायल्यामुळे ओले झालेले केसही सुकवण्यासाठी मोकळे सोड.तुझा तो दाट केशसंभार असा खुला कर.अर्थात, हे सारे तू तिकडे करतच आहेस...मीही मनातल्या मनात हे पाहत आहे...पण मला खरोखरच इथे दूरवर तुझ्या त्या न्हायलेल्या तनूचा, मोकळ्या केसांचा सुगंध येत आहे...माझ्या आसपास तो कधी घमघमत आहे, कधी दरवळत आहे...मग मी काय करतोय तर  
तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो !
म्हणजे तू माझ्यापासून तशी दूर नाहीसच. सुगंधरूपाने माझ्याजवळच आहेस. मी तुला सुगंधातून अनुभतोय.

तू आणखी काय करावेस...?


अशीच रोज अंगणी
लवून वेच तू फुले
असेच सांग लाजुनी
कळ्यांस गूज आपुले

तू फुले वेच.तीही लवून!तुझ्या नवतारुण्याच्या साज-शृंगारासाठी तू ही फुले वेच. आणि ही फुले नुसती मुक्याने, मुग्ध-मौन राहून वेचू नकोस. त्यांच्याशी संवाद कर! विशेषतः कळ्यांशी. त्यांना लाजत लाजत सांग, गूज - आपल्या दोघांचेही. आपल्या दोघांमधील मुग्ध, अबोल, हळुवार प्रेमाची सुगंधवार्ता कळ्यांच्या कानी पडू देत (आणि लाजू देत त्यांनाही...लाजून उमलू देत...त्यांचा सुगंध आणि तुझा सुगंध दोन्ही एक होऊ देत...तुम्ही दोघीही - कळ्या आणि तू - समसुखी असा...मी तिथे आहेच. तुझ्यासमीप.मला दिसतंय, तू तिथे कळ्या-फुले वेचत आहेस.तू ते करत असताना मी इथे तुझ्या आठवणींच्या कळ्या, तुझ्या भासांची फुलं इथं टिपत आहेच...
तुझ्या कळ्या, तुझी फुले इथे टिपून काढतो !
दोघेही एकाच वेळी एकमेकांच्या आठवणी काढत काढत कळ्या-फुले वेचण्याचे नाजूक काम करत राहू...

पण...

अजून तू अजाण ह्या
कुंवार कर्दळीपरी
गडे विचार जाणत्या
जुईस एकदा तरी
दुरून कोण हा तुझा मरंद रोज चाखतो !

अजून तू नव्हाळीतील आहेस...अननुभवी आहेस...कुंवार आहेस,अस्पर्श्य आहेस...कुणासारखी ? तर अंगणातल्या त्या कर्दळीसारखी. तिच्यासारखीच तू कुंवार आहेस. तुला कदाचित हे कळूनही कळणार नाही की, तुझ्या आसपास कोण वावरतंय...? तुझा य़ौवनरसाचा आस्वाद कोण घेतंय...? त्या कुंवार कर्दळीची आणि तुझी - दोघींचीही - गत एकच. कळूनही काहीच न कळण्याचं तुम्हा दोघींच हे वय  !!
अशा वेळी एखाद्या जाणत्या, कळत्या कुणाची तरी मदत घ्यायलाच पाहिजे. जुई रूपाने नाजूक आहे. पण तिचा अनुभव मोठा आहे. ती जाणती आहे. (भ्रमराच्या आणि तिच्या कितीतरी भेटीगाठी आजवर झालेल्या आहेत !!) विचार तिला - बाई गं, ही काय भानगड आहे...? कोणता भ्रमर माझ्या आसपास गुंजारव करतोय, रुंजी घालतोय..? माझा य़ौवनरस चाखू पाहतोय...? सांगेल तुला ती सारं...सारं काही...!!

बघ, तू तिकडे एवढं काही कऱणार आहेस...आणि मी ? मनातल्या मनात तुझ्यासमीप असलो तरी तसा इथे एकटाच ना!! काहीसं उदास वाटणारंच मला...


तसा न राहिला अता
उदास एकटेपणा
तुझीच रूपपल्लवी
जिथे तिथे करी खुणा
पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो !


पण तरीही...हाही उदासपणा आता तसा राहिलेला नाही. कारण तुझ्या रूपाची पालवी,तुझं नवयौवन मला जिथे-तिथे, चोहीकडे खुणावत आहे. मला कळ्या-फुलांत, हवेत, जिकडे-तिकडे तू आणि तूच दिसत आहेस...क्षणभराचा माझा उदासपपणा तुझ्या या रूपपल्लवीमुळे बघ कसा दूर निघून गेला आहे...तो आता इथे राहिलेला नाही तसा...! आणि तुझ्या त्या यौवनगंधाबरोबरच मी हवेत सळाळतोय...तुझ्यासह. तू दूर नाहीसच. मनातल्या मनात मी तुझ्यासमीपच आहे. आणि तूही इथेच आहेस माझ्याबरोबर माझ्य़ा भोवतालच्या हवेत सळसळत...!

तुम्ही-आम्ही आपण सारेच आयुष्याच्या, वयाच्या एका टप्प्यावर मनातल्या मनात काही स्वप्नं पाहिलेली असतात. विशेषकरून आपल्या आवडत्या व्यक्तीविषयीची. ती व्यक्ती आपल्या श्वास-भासात मिसळून गेलेली असते. काही कारणाने सगळ्यांनाच आपल्या या आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभत नाही. लाभतोही, पण तो चुटपुटता, ओझरता. मग पुढे दोघे दोन्हीकडे. दोघांच्याही उमलत्या वयात असं झालं तर चोहीकडे ती व्यक्तीच दिसणार.आणि खासकरून निसर्गाच्या विविध रूपांत ती खुणावत राहणार. निसर्गाच्या माध्यमातून आपल्या प्रियकरीची मानसपूजा कविवर्य सुरेश भट यांनी अशा तरलतेने बांधली आहे की, आपल्यालाही वाटत राहावे, अरे, आपणही नाही का आपल्या वाढाळू वयात तिची कल्पनाचित्रे अशीच रंगवली होती. मनातल्या मनात आपण कितीतरी वेळी तिच्या जवळच तर नव्हतो का राहत...? आता ती काय करत असेल, मग ती काय करेल, असी चित्रे रंगवत होतोच की आपण..! कविवर्य भट यांची ही कविता अशीच समस्त तरुणवर्गाची यौवनधुंद कविता आहे....मनातल्या मनात आपण साऱयांनीच कितीतरी वेळा जगलेली...चिरतरुण कविता !


- प्रदीप कुलकर्णी


प्रतिसाद

खूपच छान पद्धतीने आपण गीतातला भावबंध  उलगडून दाखवला आहे !!! अप्रतिम !!

I have  collected ghazals   penned by Suresh Bhat(56 sung by 13 artists and 24 read by 3) I wish to know where i can get his poem "Geet tuze mi Aai gain" sung by late Amar Shekh and another :Fedin  pang sare by Sharad muthe