नको रातराणी नको पारीजात

नको रातराणी नको पारीजात,असा गुंतलो मी तुझ्या कुंतलात.
जणु जाहला जीव वेडा भुकेला,असा नाहलो मी दुधी चांदण्यात.
 
विना उत्तरे ती मिटे प्रश्न सारे,असे मौन होते दुवा साधणारे.
जरा गुंग होताच श्वासात उष्ण,पुन्हा दंगलो मी तुझ्या कंकणात.
 
जणु गूढ झाले मधाने मधुर,जणु चातकाला मिळे चंद्रकोर.
उराशी मला तु लपेटुनि घेता,मला ऐकले मी तुझ्या स्पंदनात.
 
तुझा गंध येता पुन्हा मोगर्याला,तुझा रंग येता पुन्हा चांदण्याला.
जसा मेघ देई सुगंध मृत्तिकेला,तसा बरसलो मी तुझ्या अंगणात. 


तप्त श्वास सारे,तृप्त भासणारे, पुन्हांद्या विझूनी पुन्हा पेटणारे
असा भास व्हावा चितेच्या धगीचा,फुलावा जणु मोगरा चंदनात.


सुटे गार वारा उगवताना पहाट,जणु येतसे तु न्हाऊनि दवात.
पुन्हा फूलवीशी चित्तवृत्ती अशी की,जणु लाविशी तु पुन्हा सांजवात.
 
प्रिये तूच झालीस माझाच श्वास,पुरे व्यापिले तु रिक्त अंतरास.
जसा जीव वेडा राहे शरीरी,तसा राही मीही तुझ्या कुंकवात.



--------योगेश जोशी

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

वा ! योगेश, जि॑कुन घेतलस....!

योगेश्...सिंप्ली झकास..!!

वरील रचना गझल म्हणता येणार नाही. काही काळाने वरील रचना विचाराधीन विभागात हलविण्यात येईल, ह्याची नोंद घ्यावी ही विनंती.

नको रातराणी नको पारिजात, काही नाचतात मॄत्यू.., झेप यांना गझल का म्हणू नये ? ठिगळे, वषे झाली, व्यास माझ्यात... वगैरेंनाच गझल का म्हणावे ? कृपया स्पष्टिकरण द्यावे.....

मी गैरमुरद्दफ गझल लिहायचा प्रयत्न केला होता.
वृत्तात निश्चितच गडबड आहे कारण गझल लिहायचा हा माझा पहीलाच प्रयत्न..
आपल्याकडुन मार्गदर्शनाची अपेक्षा आहे..
प्रतिसाद देण्यापुर्वी पुन्हा भटसाहेबांच्या रचना पाहील्या..
मालवुन टाक दीप(माझ्या ह्या रचनेची प्रेरणा) ह्या रचनेला गीत असे संबोधले आहे..गझल नाही..जरी त्या गीतात गैरमुरद्दफ गझलेचे सर्व नियम पाळण्यात आले असले तरी..काफिया ("अंग"),अलामत("अं")..
माझा प्रश्न आता असा आहे की मालवुन टाक दीप ही रचना गझल का नाही आहे.?
प्रश्न विचारताना काही चुक झाली असल्यास क्षमस्व..
आपला..
(अननुभवी/शिकाऊ)योगेश जोशी.

योगेश, तुमचा पहिला प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे. सतत प्रयत्न करता करता, लिहिता लिहिता तंत्रावरही हुकमत येईल. गझलेचे व्याकरण जाणून घेण्यासाठी गझलेची बाराखडी आणि छंदविषयक माहिती घेण्यासाठी वेचक छंदविचार हे दोन लेख पुन्हा पुन्हा वाचावेत. 

फारच छान, अप्रतिम सुंदर.

जी गझल नाही आहे ती नाही आहे, पण एक सुंदर काव्यतरी आहे. फार सुंदर लिहीलस.