जखमा जुन्या (गझल )

जखमा जुन्या (गझल )

का मोगरा उशाला, तू माळतेस आता
काळीज आठवांनी, का जाळतेस आता

मोडून स्वप्न सारी ती रात रंगलेली
त्या काजळी सुखांना का भाळतेस आता

गेला निघून गेला तांडा नव्या दिशेला
त्याच्या खुणा कशाला सांभाळतेस आता

काळास दोष नाही वेळाच थांबलेल्या
का जाहल्या चुकांना मग चाळतेस आता

सारे तुझेच होते झोळीत जे मिळाले
डोळ्यातले झरे का ते गाळतेस आता

आक्रोश या 'मनी'चा कोणास ना कळाला
जखमा जुन्या कशाला तू पाळतेस आता

मनिषा (माऊ).......
दि .७.०४.२०११

प्रतिसाद

सारे तुझेच होते झोळीत जे मिळाले
डोळ्यातले झरे का ते गाळतेस आता

क्या ब्बात है मनिषाजी वाह...

त्या काजळी सुखांना का भाळतेस आता!

चांगला व चांगले विचार! 'भरीचे' काही शब्द / अक्षरे कदाचित टाळता यावीत.

'बेसिक' स्वरुपाची गझल 'वाटली'!

अभिनंदन व शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

सारे तुझेच होते झोळीत जे मिळाले
डोळ्यातले झरे का ते गाळतेस आता

क्या ब्बात है.

मतला छान

"सांभाळतेस" ही आवडला

का मोगरा उशाला, तू माळतेस आता
काळीज आठवांनी, का जाळतेस आता

गेला निघून गेला तांडा नव्या दिशेला
त्याच्या खुणा कशाला सांभाळतेस आता

आक्रोश या 'मनी'चा कोणास ना कळाला
जखमा जुन्या कशाला तू पाळतेस आता

अप्रतिमच!

गेला निघून गेला तांडा नव्या दिशेला
त्याच्या खुणा कशाला सांभाळतेस आता

खुपच मस्त

आक्रोश या 'मनी'चा कोणास ना कळाला
जखमा जुन्या कशाला तू पाळतेस आता

सुरेख.....अप्रतिम......