एकदा तरी
मायबोलीवर डॉ. कैलास ह्यांनी दिलेल्या मिसर्यावर लिहीलेली ही तरही गझल
लढेन षड्रिपुंसवे किमान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी
पहाड, जंगले, नद्या उदास सर्व भासती
वळून पाहशील का निदान एकदा तरी?
ढगांवरी जळून चंद्र, वायुला विचारतो
'मिळेल का मला तुझे विमान एकदा तरी?'
मदार केवढी तुझी उधार जिंदगी वरी
बघून यायचेस पण दुकान एकदा तरी
कळेच ना कशामुळे क्षणात बिनसते तुझे
करेन मी जगा तुझे निदान एकदा तरी
नकोस तू ! मला तुझा पुरेल फक्त भास ही
शमेल मृगजळामुळे तहान.... एकदा तरी
करायचाय एकदा असह्य छळ तुझा मना
बनेल काय देह अंदमान एकदा तरी?
गझल:
प्रतिसाद
supriya.jadhav7
सोम, 28/02/2011 - 19:26
Permalink
मतला घसघशीत. गझल आवडली.
मतला घसघशीत.
गझल आवडली.
विद्यानंद हाडके
बुध, 02/03/2011 - 07:38
Permalink
कळेच ना कशामुळे क्षणात बिनसते
कळेच ना कशामुळे क्षणात बिनसते तुझे
करेन मी जगा तुझे निदान एकदा तरी
बहोत खुब मिल्या....
ज्ञानेश.
बुध, 02/03/2011 - 10:22
Permalink
मस्त गझल. 'निदान' आणि शेवटचे
मस्त गझल.
'निदान' आणि शेवटचे दोन शेर आवडले !
क्रान्ति
बुध, 02/03/2011 - 22:27
Permalink
आवडली गझल!
आवडली गझल!
चित्तरंजन भट
शुक्र, 04/03/2011 - 10:42
Permalink
गझल छान आहे. पण खालील सुट्या
गझल छान आहे. पण खालील सुट्या ओळी तर फारच छान आहेत.
'मिळेल का मला तुझे विमान एकदा तरी?'
करेन मी जगा तुझे निदान एकदा तरी
शमेल मृगजळामुळे तहान.... एकदा तरी
गंगाधर मुटे
मंगळ, 08/03/2011 - 20:18
Permalink
पुर्ण गझल आवडेश.
पुर्ण गझल आवडेश.
मिल्या
बुध, 09/03/2011 - 11:16
Permalink
अनेक धन्यवाद... चित्त :
अनेक धन्यवाद...
चित्त : तुम्ही फक्त काही ओळी उधृत केल्यात म्हणजे कुठलाही शेर पूर्ण आवडला नाही असे वाटते... :( तुम्हाला वेळ झाल्यास सविस्तर विवेचन कराल का? शिकायला मदतच होईल...
चित्तरंजन भट
बुध, 09/03/2011 - 15:29
Permalink
प्रिय मिल्या, वरच्या ओळी
प्रिय मिल्या,
वरच्या ओळी अधिक न्याय करणाऱ्या हव्या होत्या असे वाटून गेले. उदा. विमान एकदा तरी ही ओळ फारच मस्त आहे. पण त्यामानाने वरची ओळ फारच साधी, सरळ आहे असे वाटले. आणि विमान म्हटल्यावर मला तुकारामच आठवला. शमेल मृगजळामुळे तहान एकदा तरी ह्या ओळी आधीच्या ओळीतही भास पुरेल असे आले आहे. त्यामुळे खालच्या ओळीचा प्रभावीपणा कमी झाला आहे.
मिल्या
गुरु, 10/03/2011 - 16:31
Permalink
चित्त समजले... तुम्हाला काय
चित्त समजले... तुम्हाला काय म्हणायचेय ते... बघू सुधारणा जमतात का काही