मार्गदर्शन

ह्या संकेतस्थळावर आपल्या रचना सादर करणाऱ्या अनेक सदस्यांच्या रचना अनेकदा तंत्रशुद्ध गझला नसतात. अशा सदस्यांना विशेषतः गझलेच्या तंत्राबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एखादा धागा असायला हवा, अशी काही सदस्यांनी सूचना केली होती. ही सूचना लक्षात घेऊन हे पान उघडण्यात आले आहे. ह्या पानावर आपल्या रचनेच्या तंत्राबाबत शंका असल्यास, मार्गदर्शन हवे असल्यास सदस्यांनी प्रतिसादाच्या स्वरूपात आपल्या रचना व शंका मांडाव्यात. इतर सदस्य आपल्या सवडीने, आपल्या परीने आणि आपल्या वकुबानुसार त्यांना मदत करतील, अशी आशा आहे.

प्रतिसाद

एकच यमक अनेकदा आले असेल तर ते गझलेच्या नियमात बसते का?
उदा.- नुकतीच प्रकाशित झालेली कैलास गांधी ह्यांची रचना 'कर्जमाफीच्या अमीशावर माजली शेते'. ह्या रचनेत रदीफ नाही. अलामतीच्या सोयीसाठी शेते आणि येते अशी कवाफी घेतलेली आहे. पुढच्या शेरांमध्ये घेते, नेते अशी यमके येणे अपेक्षित(?) आहे. परंतु पुढच्या चारही शेरांमध्ये 'शेते' हे एकच यमक वापरलेले आहे.
ही रचना नियमा नुसार आहे असे म्हणता येईल का?
(आत्ता ह्या प्रकारची हीच एकमेव रचना येथे दिसत असल्याने उदाहरणादाखल दिली आहे. गैरसमज नसावा.)

एकच यमक अनेकदा आले असेल तर ते गझलेच्या नियमात बसते का?
नियमात बसते. पण सहसा टाळावे. मी एकच यमक दोनपेक्षा अधिक वेळा वापरत नाही. असो. शेवटी चूभूद्याघ्या.

तेव्हा तर आहेच...:-)
धन्यवाद!

अलामतीत सूट अशी तळटीप देऊन प्रकाशित झालेली गझल मी एके ठीकाणी वाचली आहे (कुठे? असा प्रश्न ज्याना विचारायचा त्यानी निरोपातुन चर्चा करावी). असे चालते का?

अलामतीत सूट अशी तळटीप देऊन प्रकाशित झालेली गझल मी एके ठीकाणी वाचली आहे

दुवा द्यावा. गझल नियमांत बसणारी नसल्यास लगेच अप्रकाशित/विचाराधीन करण्यात येईल.

http://www.sureshbhat.in/node/2049

ही माझी गझल ६ शेरांची असून.... मक्त्यात अलामतिची सूट घेतली आहे.
ही गझल आहे किंवा कसे?

डॉ.कैलास

नाही कैलासजी तुमची नाही. मला तुम्ही अलामतीत घेतलेली सूट माहिती नव्हती.

विश्वस्त,
मी मायबोलीवरवाचलेली आहे. मला फक्त अशी सूट घेता येते का हे माहिती करून घ्यायचे होते.

एखाद्या ठिकाणी ऱ्हस्वाक्षराची सूट घेतल्यास गैर नाही. उदा. मतल्यात घरी, जरी अशी यमके असल्यास
अपवादात्मकरीत्या उरी हे यमके चालून जावे. इथे अपवादात्मकरीत्या हा शब्द महत्त्वाचा. शेर उत्तम होत असल्यासवर अपवाद केल्यास बरे वाटते. शेवटी चूभूद्याघ्या.

हबा या गझलेबद्दल तर बोलत नाहीत- :)

http://www.sureshbhat.in/node/1348

येस ज्ञानेश, या नाही पण अशीच तळटीप असलेल्या एका गझलेविषयी बोलत आहे. पण आता या गझलेविषयी माझा प्रश्न आहे आहे असे स्मजुन उत्तर द्या. असे चालते का? (हेतु फक्त माहिती करून घेण्याचा आहे.)

माझ्या माहितीप्रमाणे, मतल्यातच अशी सूट घेतली तर चालते. मतल्यात अलामत ठरून गेली असल्यास, पुढच्या शेरांत त्यात सूट घेता येत नाही.
चूभूद्याघ्या वगैरे आहेच.

गझल लिहून झाल्यानंतर जर एखाद्या शेरात अलामत भंगतेय असे लक्षात आले,तर मतल्यातच तसे बदल करावेत ज्या योगे अलामत भंगणार नाही.

वानगीदाखल आपणांस हा मतला दाखवत आहे..... बेफिकिर यांच्या गझलेचा आहे.

पुर्वी नवीन गोष्टी शिकवीत अर्भकांना
हल्ली नवीन गोष्टी कळतात पालकांना

इथे बेफिकिर यांस '' अर्भकांना '' ऐवजी,''बालकांना '' असे लिहिता आले असते.....ते जास्त लयीत झाले असते... परंतु त्यांच्या पुढच्या शेरांकडे आपण पाहिले तर लक्षात येईल की पुढे अलामत भंगु नये म्हणून त्यांनी आधीच '' अर्भकांना'' असे योजुन निर्दोष गझल निर्मिली.

पुढचे शेर असे आहेत...

निर्जीव ओंडक्याचा आधार बेडकांना
अध्यक्षस्थान मिळते हल्ली समीक्षकांना

भर सत्तरीत यांचा पडतो पदर कुठेही
स्त्री ला न देत मुक्ती देतात स्फोटकांना

माझ्यामुळेच येती प्रान्ती प्रकाशनाच्या
माझा प्रकाश असतो काही प्रकाशकांना

'माझे भटांबरोबर संबंध खूप होते'
इतकाच देत परिचय छळतात प्रेक्षकांना

रक्तात गंड नाही त्याने गझल करावी
समजायचे कसे हे खोटारड्या ठकांना

मी मुक्तछंद घेतो, अन तो विडीत भरतो
अन 'बेफिकीर' हसतो, फेकून थोटकांना

म्हणजेच ज्ञानेश म्हणतोय तशी सूट वगैरे नंतर घेणे योग्य नाही..... मतल्यातच निश्चित करावे.

चुभुद्याघ्या...

डॉ.कैलास

अलामतीत होणारा भंग मतल्यातच निश्चीत केल्यास गझलेत अलामतीची सवलत घेता येते असा निष्कर्ष निघतो आहे. फार फार आभारी आहे. विषेशतः कैलासजी आपण सोदाहरण स्पष्ट केल्याने समजुन घेण्यात मदत झाली.
ज्ञानेशजी धन्यवाद. चुभुद्याघ्या वगैरे...

एका गझलेत पाचही/सगळेच मतले असले तरी चालतात हे मला काल कळाले. भुषण कटककर आणि कैलासजींनी याविषयी विस्तृत माहिती दिली. बोलता बोलता भुषणजींनी अशा शायरीसाठी ओळखल्या जाणार्‍या उर्दु शायराचे नावही सांगितले होते.(विसरलो). असे लिहीले तरी चालते एवढेच मला कळाले पण या विषयाची अधिक माहिती जाणकारांनी इथे दिली तर ती उपयुक्त ठरेल असे वाटते.

गझल आणि हझल यामध्ये नेमका काय फरक आहे, याविषयी मार्गदर्शन व्हावे.

हझलेची एक साधी व्याख्या अशी करता येईल: हझल म्हणजे हास्यगझल.

धन्यवाद विश्वस्त.
आभारी आहे.

चांगला धागा!

कैलास व ह.बा.,

कृपया माझ्या लिखाणाचे / बोलण्याचे संदर्भ येथे देऊ नयेत अशी विनंती!

(बाय द वे, 'सूट' या शब्दाचा अर्थ सर्वांनी स्वीकारलेल्या तंत्रामधे हेतूपुरस्पर घेतलेली हरकत किंवा सूट! तेव्हा ती मतल्यातच असायला हवी हे मला तरी मुळीच मान्य नाही. कारण ती मुळातच 'सूट' असते.)

-'बेफिकीर'!

तुह्या डोयात बसावं,माह्या जिवाले वाटते
नाही जगाले दिसावं,माह्या जिवाले वाटते

तोंड लपवण्यासाठी मले नाही कुठे जागा
तुह्या मनात लपावं,माह्या जिवाले वाटते

तुह्या मुचूक जगणं,वाटे जह्यराची पुडी
तुह्या संगंच मरावं,माह्या जिवाले वाटते

माह्या मनातलं गूज्,कसं मोठ्यानं मी बोलू?
तुह्या कानात सांगावं,माह्या जिवाले वाटते

माह्या नावापुढे मले,लावू वाटे तुहं नाव
तुहं नाव मिरवावं,माह्या जिवाले वाटते

ही रचना '' गझल'' आहे किंवा कसे?

डॉ.कैलास

ही अष्टाक्षरीतली गझलसदृश कविता वाटते आहे. अक्षरछंदात गझल लिहिली जात नाही. अशाने आज अक्षरछंदातली , उद्या बोलकवितेसारखी गझल असा प्रकार होईल.

हझलविषयी आणखी:
हझलेत ग्राम्यपणा असू शकतो. असतोच किंवा असलाच पाहिजे असे नाही. (ग्राम्य हा शब्दाचा अर्थ ग्रामीण असा नाही. त्यामुळे शहरी विरुद्ध ग्रामीण असा वाद चुकीचा.)

उदाहरणार्थ:
सोचता क्या है कमीने कुत्ते
देखता क्या है कमीने कुत्ते

ये तो अपनीही तेरी परछाई
भौंकता क्या है कमीने कुत्ते

शेवटी चूभूद्याघ्या.

ग्राम्य हा शब्दाचा पहिला अर्थ गावंढळ.खेडवळ,अडाणी असा होतो.
आणि दुसरा अर्थ अश्लील,असभ्य असा होतो.

पण गावंढळ.खेडवळ,अडाणी भाषा अश्लील,असभ्य असतेच असे नाही.
मग ग्राम्य या शब्दापेक्षा असभ्य हा शब्द अधिक चांगला ठरेल असे वाटते.

चूभूद्याघ्या.

'ग्राम्य', 'गावंढळ'. 'खेडवळ', 'अडाणी' ह्या शब्दांना वेगळ्या छटा आहेत. वापरही वेगळा आहे. उदा. शब्द 'गावंढळ' नसतात. 'खेडवळ' किंवा 'अडाणी' तर नसतातच. मात्र शब्द 'ग्राम्य' असतात. चूभूद्याघ्या.

शब्दांवर चर्चा करण्यासाठी वेगळी व्यासपीठे/संकेतस्थळे आहेत. तिथे ही चर्चा केल्यास अधिक उपयुक्त ठरेल. शुभेच्छा.

धन्यवाद चित्तजी

डॉ.कैलास

ग्राम्य शब्द बोचरा आणि अपमानास्पद वाटला म्हणुन लिहिले होते, एवढेच.

शब्द 'गावंढळ' नसतात. 'खेडवळ' किंवा 'अडाणी' तर नसतातच. मात्र शब्द 'ग्राम्य' असतात. या माहीतीमुळे समाधान झाले.
धन्यवाद.

कैलास,
माझ्यामते आपण दिलेली रचना केवळ अक्षरछंदात असल्यानेच ती गझल होणार नाही असे मत सर्वठिकाणी दिसत आहे. ही तुमची स्वतःची रचना आहे का?

चित्तरंजनजी,
अक्षरछंदात गझल लिहिली जात नाही.
सध्यातरी. मात्र मात्रांचा क्रम उलटसुलट करूनही लिहिता येतेच की!

अजयजी,
ही श्रीकृष्ण राउत यांची रचना आहे.

डॉ.कैलास

नमस्कार मी आजच हि वेब साईट जॉईन झाले .....तशी नुकतीच गझल लिहायला चालू केली आहे ....मनोरमा वृतात गझल लिहायचा प्रयत्न केला मी ....तरी याला मी गझल म्हणू शकते का ....काही त्रुटी असल्यास जरूर सांगा आणि मार्गदर्शन करा

फीतूर (गझल )....

लाजणे फीतूर होते
आरशाला दूर होते .............!!

श्वास ओले पैंजणाचे
बासरीचे सूर होते ..............!!

कंकणी जे स्पंदनी ते
मी मला काहूर होते .............!!

भाळता आभाळ भाळी
चंचला मी चूर होते ..............!!

वाळले डोळ्यात अश्रू
काजळा आतूर होते ..............!!

गाजले ओठात नाही
हारणे मंजूर होते ................!!

अंतरी तुझ्या जळोनी
मी नवा अंकूर होते ..............!!

.....कविता

वृत्त :मनोरमा

छान चर्चा......!

-दिलीप बिरुटे

अलामतीच्या सक्त नियमामुळे जर एखाद्या चांगल्या शेराला आपण मुकणार असू, तर त्यात अलामतीची सूट जरूर घ्यावी, असे आमचे मत आहे.

कारण नियमांपेक्षा चांगला शेर अधिक महत्वाचा आहे.

धोंडोपंत

२५.८.२०१० आणि ८.१२.२०१० ला मी पाठवलेल्या`जाळे पुढयात माझ्या ` आणि `शिखर त्यानी गाठलेले ` या दोन गझलांची पोच आपल्याकडून आली , पण पुढे काय झाले ? समजेल काय ?

लाभला ना जन्म केवळ,यायला अन जायला
एक आला द्यायला,मग एक येतो घ्यायला

ही शिध्याची ओळ आहे नागव्यांची चावडी
ती कुबेराची मुलेही लागली का यायला?

जन्मताना लाउनी या सोय पोटाची इथे
लोकशाहीची स्तने राखीव केली प्यायला!

मी म्हणालो 'भामट्याना का बुवा करतो विठू?'
तो म्हणाला 'काळ पाहुन लागते बदलायला!'

या जगाचे काय होणारे कुणाला माहिती!
माहिती नाहीच तर मग जाउदे च्या मायला!

वरील गझलेत्,स्तने प्यायला,नागव्यांची चावडी, च्या मायला ..... असे ग्राम्य व काहीसे अश्लील शब्द अंतर्भूत आहेत.
असे शब्द गझलेत असावेत की नसावेत याबाबत काय प्रवाह आहेत यावर विश्वस्तांनी कृपया मार्गदर्शन करावे.

माझ्यामते कवितेत किंवा गझलेत कुठलाही शब्द आला तरी चालतो. फक्त त्या शब्दांना कशी ट्रीटमेंट कशी दिली आहे हे बघणे महत्त्वाचे.

Namaskaar, mi attach thodya velapurvi aplya website var majhi ek ghazal publish karaycha prayatna kela, ani "ghazal created" asa message hi ala. Ata pudhe mala ti ghazal "navya ghazla" section madhe disat nahiye, so will this go through some scrutiny first ? majhya ghazalecha naav toha "tuze hech dole..."

१३मे ला पाठवलेल्या माझ्या काव्य-रचने बद्दल "मार्गदर्शन" (?) कराल काय ? चांगल्या संकेतस्थळाकडून सत्वर मार्गदर्शनाची अपेक्षा बाळगत होतो ! ही दुस-यांदा काव्य-रचनेबद्दल मार्गदर्शनाची अपेक्षा बाळगण्याची वेळ आहे !! उत्साह द्विगुणित करण्याऐवजी त्यावर विरजण टाकू नये,एवढीच माफक अपेक्षा !!!

अशा चर्चांनीच सखोल अभ्यास होतो. धन्यवाद.

पोस्ट केलेली रचना या सन्केतस्थळा वर कधी दिसते?