'रिपब्लिकन' स्वामी विवेकानंद!

'रिपब्लिकन' स्वामी विवेकानंद!

आज मी स्वतः मागणी करीत आहे की, रामजन्मभूमीची मुक्ती झालीच पाहिजे आणि अयोध्येची बाबरी मशीद पाडून पाडून तेथे पूर्वी असलेले राममंदिर पुनः अधिक भव्य आणि दिमाखदार स्वरूपात उभे राहिले पाहिजे.

एवढेच नव्हे तर मी अशी जाहीर मागणी करतो की, मुसलमानी राजवटीत आपल्या भारतात ज्या ज्या ठिकाणी हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करून मशिदी बांधण्यात आल्या, त्या त्या ठिकाणी सर्व मशिदी पाडून पुन्हा हिंदूंची मंदिरे उभारण्यात यावीत.
जे ज्याचे आहे ते त्याला ताबडतोब परत मिळालेच पाहिजे. बाबरी मशिदीच्या जागेचे मूळ मालक हिंदू होते. तेव्हा मूळ मालकाला त्याच्याकडून हिरावून घेतलेली जागा किंवा मालमत्ता मिळावयास नको काय?

महाराष्ट्रातील बरेच लोक मला धर्मनिरपेक्षतावादी लोक, सांसदीय लोकशाहीवादी वगैरे समजतात. पण माझे अलीकडे "हृदयपरिवर्तन" वगैरे झाले आहे. शिवाय, मला माझी मते बदलण्याचा किंवा "धोरण" बदलण्याचा पूर्ण अधिकार आहे. तेव्हा मी "हिंदुत्ववादी" बनलो असेनच, तर कुणीही आश्चर्य वाटून घेऊ नये किंवा माझा निषेध करू नये. मी रामजन्मभूमीच्या मुक्तीची मागणी केली तर कोणत्याही पुरोगामी माणसाने मला शिव्या देऊ नये, माझ्यावर संधिसाधूपणाचा व भ्रष्टाचाराचा आरोप करू नये.

मी रामजन्मभूमीच्या मुक्तीची मागणी केले तर कुणीही आश्चर्य वाटून घेऊ नये, वाटणारही नाही म्हणा.

आता हेच पहा ना, शरद पवारांवर भूखंडीय भ्रष्टाचाराचा सतत जाहीर आरोप करणाऱ्या शिवसेनाप्रमुख श्री॰ बाळासाहेब ठाकरे यांनी अलीकडे "या" भूखंडाच्या भानगडीच्या बाबतीत "हिंदुत्ववादी मौन" धारण केलेले आहे, याचे मुंबईतल्या शेंबड्या पोराला तरी आश्चर्य वाटते का?

तरी पण शूः बोलायचे नसते. एकाच वेळी मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी "त्या" भूखंडाच्या आघाडीवरील "सामसूम" आवश्यकच आहे.

सॉरी! चुकलो! रामजन्मभूमीच्या मुक्तीऐवजी मी भूखंडाकडे वळलो. कुठे अयोध्या आणि कुठे मुंबई? शिवाय रामराज्यात म्हणजे सत्युगात या "उपद्रवी" परिटाच्या वाट्याला किती "भूखंड" आले होते, याची शहानिशा करून घेतल्याशिवाय मी अधिक लिहिणे उचित नव्हे. शिवाय, जे हिंदुत्ववादी असतात आणि भरीत भर म्हणून सारखा शिवछत्रपतींचा जयजयकार करतात, त्यांनी काहीही केले तरी त्या प्रकाराला भ्रष्टाचार व संधिसाधूपणा म्हणायचेच नसते. असो.
तर मी म्हणत होतो की, अयोध्येची बाबरी मशीद पाडून तेथे पुन्हा रामाचे मंदिर बांधून हिंदूंना त्यांची मूळ मालमत्ता परत मिळालीच पाहिजे. ज्याचा मूळ हक्क त्याला परत मिळालाच पाहिजे.

परवाच नागपूरच्या झाशी राणी चौकात मला बाबूराव मास्तर भेटले. (तुम्हाला आमचे 'बाबूरावजी' ठाऊक नाहीत? महाराष्ट्राचे 'बौद्धिक' प्रमुख आहेत. बुद्धी या शब्दाचा गैरवापर केल्याबद्दल मी मायमराठीची क्षमा मागतो.)

मी विचारले, "काय बाबूराव? रामजन्मभूमीची मुक्ती कधी होणार? बाबरी मशिदीच्या जागी पुन्हा राममंदिर कधी बांधले जाणार? पण अयोध्येत अनेक मशिदी आहेत. तेव्हा सध्याच्या कोणत्या मशिदीच्या जागी प्रभू रामचंद्र जन्मले? हे कसे ठरवायचे?"

"आम्ही पुराव्याशिवाय बोलत नसतो" बाबूरांवांनी माहिती दिली. त्यावेळी मंथरेचा मामा अयोध्येचा डिव्हिजनल कमिशनर होता. आणि त्या मामाचाच मावसभाऊ अयोध्येचा म्युन्सिपल कमिशनर होता. त्याचाच एक नातल अयोध्येचा टाउन प्लॅनिंग ऑफिसर होता. आमच्या लोकांनी रथयात्रेच्या वेळीच जुनी कागदपत्रे मिळवली.त्यात बाबरी मशिदीच्या जागेचा तेव्हाचा सर्व्हे नंबरही आहे! तेथे कौसल्यामातेचा प्रासाद होता. आमच्याजवळही या प्रासादाचासुद्धा दशरथकालीन नकाशा आहे. (मोठ्याच प्रयासाने मिळवला हो!) या नकाशात कौसल्यामातेचा प्रसूतिकक्षही आहे. यावरून हे निर्विवादपणे सिद्ध होते, आज जेथे बाबरी मशीद आहे ना, तेथेच प्रभू राम जन्मले!
"तुमची कमाल आहे बुवा बाबूराव!" मी कौतुकाने म्हणालो, "एवढी दुर्मिळ माहिती तुम्ही पुराव्यानिशी कशी हो मिळवली?"
"अहो भय्यासाहेब!" बाबूराव सांगू लागले, "आमच्याजवळ त्या काळात अयोध्येत ज्या जागेत आमची सर्वात मोठी शाखा भरत असे, त्या जागेचासुद्धा सर्व्हे नंबरसकट नकाशा आहे. काय समजलात? साक्षात वशिष्ठ मुनी आमच्या त्या शाखेच्या उद्घाटनासाठी आलेले होते."

नंतर बाबूराव काय बोलले ते मला ऐकू आले नाही. पण जेव्हा शुद्धीवर आलो, तेव्हा बाबूराव निघून गेले होते आणि माझ्यासमोर गर्दी जमली होती. शुद्धीवर आलो तेव्हा बाबूरावांनी दिलेल्या ऐतिहासिक माहितीमुळे माझे हिंदुत्व जागृत झाले होते. घरी परतल्यावर मी विचार केला की, 'हिंदू' असल्यामुळे आता आपण स्वामी विवेकानंदांच्या ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. मग मी नागपूरच्या रामकृष्ण मठाने प्रसिद्ध केलेल्या 'स्वामी विवेकानंद ग्रंथावली'चा पाचवा खंड सहज चाळू लागलो. आधी चाळावे आणि मग वाचावे. तेव्हा पुस्तक चाळता-चाळता माझी नजर सहज २२३ या पानावर थबकली. ते स्वामीजींचे मद्रासला केलेले एक भाषण होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, व भारतीय जनता पक्ष यांची पूर्वानुमती न घेता त्या काळी स्वामी विवेकानंद (ओळ क्रमांक २२, २४ व २५) एखाद्या 'रिपब्लिकन' पुढाऱ्याप्रमाणे म्हणाले होते–
'जगन्नाथाचे मंदिर हे प्राचीन बौद्ध मंदिरच आहे. आपण हे मंदिर व अन्य मंदिरे घेऊन त्यांना पुन्हा हिंदू देवालयांचे स्वरूप दिले आहे. अजूनही अशा अनेक गोष्टी आपल्याला करावयाच्या आहेत. असे हे जगन्नाथाचे स्थान असून त्यावेळी तेथे एकही ब्राह्मण नव्हता.'
मला आता मधूनच शंका वाटते की, स्वामी विवेकानंद हिंदुत्वविरोधी तर नव्हते ना? तसे नसेल, तर 'जगन्नाथाचे मंदिर हे मूळ बौद्ध मंदिर होते आणि हिंदूंनी अशी अनेक बौद्ध मंदिरे ताब्यात घेऊन त्यांना हिंदू देवालयाचे स्वरूप दिले' असे स्वामीजी म्हणालेच कसे?
बाबराने अयोध्येतील राममंदिर पाडून तेथे 'बाबरी मशीद' बांधण्यासाठी जे केले, तोच प्रकार कितीतरी शतके आधी जगन्नाथाच्या विद्यमान मंदिराच्या जागी व अन्य बौद्ध मंदिराच्या बाबतीत झाला, असे आम्ही भारतीयांनी समजायचे काय? तरी पण हरकत नाही. रामजन्मभूमी मुक्त झालीच पाहिजे. बाबरी मशिदीच्या जागी पुन्हा प्रचंड राममंदिर उभारले गेले पाहिजे, एवढेच नव्हे तर मुसलमाना राज्यकर्त्यांनी ज्या हिंदू मंदिरांना उद्ध्वस्त करून मशिदी बांधल्या, त्या मशिदींचे पुन्हा देवालयात रुपांतर झाले पाहिजे. कारण मूळ मालक हिंदूच आहेत!
पण जगन्नाथपुरीच्या जगन्नाथ मंदिराचे काय करायचे? आणि ज्या बौद्ध मंदिराचे हिंदू देवालयाच रूपांतर करण्यात आले, त्या बौद्ध मंदिराच्या बाबतीत विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्षाचे काय म्हणणे आहे?

जो न्याय मशिदींना लावायचा आहे, तोच न्याय हिंदू मंदिरांनाही लावण्यात आला पाहिजे. मूळ मालकांना त्यांची मालमत्ता परत मिळालीच पाहिजे. यासाठी विश्व हिंदू परिषद व भाजपने तज्ज्ञांची कमिटी नेमून भारतातील सर्व मशिदी व सर्व हिंदू देवालयांचा 'सर्व्हे' केला पाहिजे. आणि बौद्धांची मूळ मंदिरे (आज ती हिंदू मंदिरे असली तरीसुद्धा) त्यांना आपुलकीने व आपणहून परत करण्यात आली पाहिजेत. त्यात काहीच अडचण नाही. नाही तरी बौद्ध बांधव विशाल हिंदू समाजाचेच घटक आहेत की!
तेव्हा हिंदूंची मंदिरे हिंदूंना परत आणि बौद्धांची मंदिरे बौद्धांना परत! एकसाथ होऊच द्या!
पण हे स्वामी विवेकानंद म्हणजे अडचण आहे! नको ते बोलून बसतात! शाखेतील 'संस्कार' मिळाले नाहीत म्हणून हे असे झाले! त्यांना कोणीतरी हिंदुत्वाचा अर्थ समजावून सांगा रे!