गजल गायक भीमराव पांचाळे यांना मातृशोक
प्रसिद्ध गजल गायक भीमराव पांचाळे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई गुलाबराव पांचाळे यांचे काल (२१ ऑक्टोबर २००९ रोजी) रात्री मोर्शी तालुक्यातील आष्टगाव या त्यांच्या मूळगावी वृध्दापकाळाने निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. "आईचा आवाज अतिशय गोड होता. त्या संस्कारातच मी वाढलो. मला गाण्याची देण आईकडूनच मिळाली. बरीच लोकगीते, जात्यावरची गाणी तिला मुखोद्गत होती. गायनकलेचे बाळकडू त्यामुळे घरातूनच मिळाले," अशा शब्दात भीमराव पांचाळे यांनी त्यांच्या भावना 'लोकसत्ता'शी बोलताना व्यक्त केल्या. लक्ष्मीबाई यांच्या पार्थिवावर आष्टगाव येथे आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पुत्र भीमराव पांचाळे यांच्यासह पाच मुलगे आणि चार मुली, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.
(बातमी दैनिक 'लोकसत्ता'मधून साभार)