दारु

दारु ( हज़ल )

नशा आगळी आज मद्यात होती...
अशी धुंद मैफील रंगात होती...

किती पेग आले, किती रिक्त झाले;
जणू काय टाकीच पोटात होती...

कधी 'स्ट्रेट' गेला, कधी 'टॉप' केला;
कधी 'नीट' 'व्हीस्की'च बर्फात होती...

इथे 'वोडका' हा, तिथे ती 'टकीला';
अता 'रेड वाईन' ग्लासात होती...

घड्याळात पाहून बाहेर आलो;
तरी बाटली बाहुपाशात होती...

पुन्हा आज ढोसून आलो घराला;
पुन्हा बायको आज त्वेषात होती...

तिने घातली लाथ माझ्या बुडाला;
शिवीही तिची पूर्ण वाक्यात होती...

पुन्हा झोपलो मी पुराण्या ठिकाणी;
पुन्हा रात माझी, गटारात होती...

- निरज कुलकर्णी.

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

ही 'हझल' ( ? ) प्रकाशित होऊ शकत असल्यामुळे मला गप्प राहणे भाग आहे.

हझल  ब-यापैकी  जमली  आहे.
काही  ठिकाणी  हसायला  येते  आहे.

समीक्षा करणे हे किती जिकिरीचे काम आहे हे सर्वांच्या लक्षात आले असेलच.
नशा आगळी आज मद्यात होती...
अशी धुंद मैफील रंगात होती...
हा शेर हझलस्वरुपी नाही.

किती पेग आले, किती रिक्त झाले;
जणू काय टाकीच पोटात होती...
इथे काहीजणांना हसू येणे शक्य आहे.  'जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधून पाहे' या रामदासांच्या वृत्तात रामदासांनी प्रचंड विरोध दर्शवलेल्या बाबीवर हा शेर रचला आहे. टवाळा आवडे विनोद असे ते जे म्हणायचे हे खरे करून दाखवण्याची महत्वाकांक्षा या शेरातून दिसते.

कधी 'स्ट्रेट' गेला, कधी 'टॉप' केला;
कधी 'नीट' 'व्हीस्की'च बर्फात होती...
विविध भाषांमधून आता गझल प्रसारीत होत आहे. अर्थात मद्याच्या विविध प्रकारांना प्रमाण मराठीत वेगवेगळे शब्द नाहीत. त्यामुळे व्हिस्कीला व्हिस्की म्हणणे निकडीचे आहे. पण स्ट्रेट, टॉप व नीट ( एन्ग्लिश नीट ) यांचे मराठीकरण होते का ते बघायला हरकत नाही.इथे व्हिस्की नीटपणे ( म्हणजे मुकाटपणे ) बर्फात बसली होती असे म्हणायचे असल्यास वेगळी गोष्ट आहे. पण एकंदर कवीला मिळत असलेला अत्यानंद शब्दाशब्दातून जाणवत आहे. हे यश मानावे लागेल.

इथे 'वोडका' हा, तिथे ती 'टकीला';
अता 'रेड वाईन' ग्लासात होती...
साधारणपणे आमच्या अनुभवाप्रमाणे वोडका हा शब्द व्होडका असा असुन तो स्त्रीलिंगी आहे. अर्थात किती पेग आले किती रिक्त झाले हे कळत नाही म्हंटल्यावर जोडाक्षरे न म्हणता येणे व काही किरकोळ लिंगबदल होणे यात काही विशेष नाही.टकीला हे पेय सहसा स्त्रिया घेतात. त्यामुळे कवी कुणाबरोबर असावा याचा थोडा अंदाज येऊ शकतो. व्होडका इथे अन टकीला तिथे असल्यामुळे आता रेड वाईन ग्लासात आली की काय असा एक संदेह निर्माण होऊ शकेल.

घड्याळात पाहून बाहेर आलो;
तरी बाटली बाहुपाशात होती...
बाटलीला कवीने घड्याळात बघण्यात हरकत घेण्यासरखे काय असावे ते समजत नाही. अन बाटली बाहुपाशात होती तर टकीलेचे काय झाले हे ठरवणे रसिकांवर सोडलेले दिसते.

पुन्हा आज ढोसून आलो घराला;
पुन्हा बायको आज त्वेषात होती...
या दोन ओळींचा परस्परसंबंध नसेल तर बायकोचा त्वेष बहुधा कवी घराला आल्यामुळे निर्माण झाला असावा. परस्पर संबंध असेल तर त्वेष समजता येण्यासारखा आहे.

तिने घातली लाथ माझ्या बुडाला;
शिवीही तिची पूर्ण वाक्यात होती...
ही सत्य परिस्थिती वर्णन करण्याचे धाडस फक्त तोच पुरूष करू शकतो ज्याला खरोखरच किती पेग आले अन किती रिक्त झाले हे समजले नसावे. इथे महिलावर्गाला हसू येणे शक्य आहे. महिलावर्गाला हसू आणणे फारसे अवघड नसते. कारण हसायचे आहे असे सांगीतले तरी त्या हसतात. म्हणजे 'कवीने हझल केली' हे वाक्य तोंडाला पदर लावून खुसखुसण्यासाठी पुरे आहे.

पुन्हा झोपलो मी पुराण्या ठिकाणी;
पुन्हा रात माझी, गटारात होती...
हे जे सातत्य आहे ते प्रशंसनीय आहे. बुडाला लाथ बसल्यावर आपोआप कवी गटारात गेला की स्वतःहून गेला हे ठरवणे रसिकावर सोडले आहे.
एकंदर हझल बरी.
१०० पैकी २०

मदिरा खराब आहे तुम्ही सांगता कुणाला
कुणी ऐकण्यास तुमचे शुद्धीत पाहिजे ना
मला माझ्याच ओळी आठवल्या. धमाल हझल.
गंभीर समीक्षकांची समीक्षा भलतीच अ-गंभीर आहे.

सांभाळून..!
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०