एक संवाद-८

: आपण आपल्या संभाषणामध्ये सतत हिंदीचा वापर करता. आपण काही हिंदी-उर्दू गझला रचल्या आहेत का?
: हिंदी-उर्दू बेसाख्ता निकल जाता है. मराठीपेक्षा उर्दू-हिंदी उत्स्फूर्तपणे बाहेर येते. याचे कारण माझे बालपण आणि तारुण्य हिंदी, उर्दू भाषक लोकांमध्ये बऱ्याच प्रमाणात व्यतीत झाले, हे असावे. मी काही रचना केल्या आहेत उर्दू-हिंदीत. पण त्यांची संख्या फार नाही.


: एखाद-दुसरा शेर सांगता येईल का?

तू यहाँ है तू वहाँ है तू कहाँ कहाँ नही है
ये तेरे वजूद का है मेरा हर नफस तराना


माना की टल ही जाएगा रात का आखरी पहर
लेकिन भटक रही है दोस्त जाने कहाँ मेरी सहर
छेडी है जिंदगी ने फिर नग्म-ए-आरजू की धुन
कौन ये मुस्कुरा उठा किस की ये झुक गयी नजर


: मग तुम्ही विपुल हिंदी-उर्दू रचना का केली नाही? तुमच्या कीर्तीचे क्षेत्र कदाचित वाढले असते!
: मराठी माणूस आणि मराठी भाषा यावर असणारे माझे अपार प्रेम. त्यामुळे मला मराठी गझलांपासून दूर जावे असे वाटले नसावे.


: स्फुट कविता आणि गझललेखन याशिवाय इतर काव्यनिर्मिती आपण केली आहे का?
: होय. 'विद्रोह' नावाचे दीर्घकाव्य लिहायला घेतले होते. पण ते अपुरे राहिले. आता ते पूर्ण होणेही अशक्यच.


: व्यावसायिक गझलगायनाला आपण केव्हापासून व कशी सुरुवात केली?
: मी पूर्वी नोकऱ्या केल्या. मग पेपर काढला पण थकलो, कंटाळलो. संपूर्ण दिवस जायचा. विचार केला कशाला आजारी पडा, स्वतःचं लाइफ डिस्ट्रॉय करा? मला स्वतःचे आयुष्य, आवडीनिवडी महत्त्वाच्या वाटल्या. एक दिवस पेपर बंद करून टाकला, तेव्हा माझ्यावर कर्ज नव्हतं आणि तोट्यातही मी चालवत नव्हतो.


: पेपर चालवणे स्वतःच्या आनंदाचा किंवा आवडीनिवडीचा भाग नव्हता का?
: नाही. स्वतःच्या प्रपंचासाठी पेपर चालवला. खोटं कशाला बोलायचं? माझे काव्यगायन लोकांना अधिक आवडायचं. म्हटलं, करू या काही तरी. अशातच पहिला कार्यक्रम झाला धनवटे रंगमंदिरात १९८० साली. नक्की तारीख आठवत नाही. पण बहुधा ३ सप्टेंबरला झाला.


: आपण गझलगायनासाठी ज्या गझला निवडता त्यामागे आपली काही विशिष्ट भूमिका असते का?
: याचा विचार टोटल कार्यक्रमात मी दहा टक्के करतो. साधारणतः लोकांना काय आवडतं हे मला ठाऊकच असतं.


: लोक फर्माइशही करीत असतील ना?
: करतात ना. काही ऐकतो, काही नाही ऐकत. त्यांची आवड असतेच, पण प्रत्येकाची इच्छा कशी पुरवता येणार? लोकांना आपल्याकडे वळवून घ्यायचे असते. त्यांना आवडेल असे म्हणायचे पण ऐकवायचे ते आपले.


: अशा गझलगायनाचा एखादा दुर्मीळ अनुभव आपण सांगू शकाल का?
: माझे गझलगायन आणि उर्दू गझलगायन यात फरक आहे. माझे गायन म्हणजे गुलाम अली, मेहदी हसन, फरीदा खानम यांच्यासारखे नाही. तसं साग्रसंगीत नाही. मी काही तबला-पेटी घेऊन बसत नाही. मी एकटा असतो. ऊपर अल्ला नीचे माइक! तसा माझ्या दृष्टीने दुर्मीळ अनुभव नाही, पण अंबेजोगाईला माझा कार्यक्रम झाला. दहा हजार लोक ऐकत होते. कुणी उठायला तयार नव्हता. साडेचार वाजेपर्यंत सगळे बसून होते. तरीही याला 'दुर्मीळ' म्हणता येणार नाही, माझ्या दृष्टीने. इतर कवींच्या दृष्टीने म्हणता येईल कदाचित.


: टीकाकारांच्या बऱ्यावाईट प्रतिक्रियांचा आपल्या गझललेखनावर काही परिणाम होतो का?
: काही प्रतिकूल टीका झाली तर मी विचार करतो खरोखरच ही टीका पटते का? प्रत्येकाच्या फूटपट्ट्या वेगवेगळ्या असतात, बऱ्यावाईट असतात. पुष्कळदा आपल्यालाच ठाऊक असते की, आपण चांगले लिहिले आहे.


: पण परिणामांचं स्वरूप नेमकं काय असतं?
: लिहिताना जास्त त्वेष चढतो-- अधिक चांगले लिहिण्याचा! प्रतिक्रियची प्रतिक्रिया एवढीच. मी अधिकाधिक जिद्दीने लिहितो. खचून जात नाही मी कधी. माझा त्वेष वाढवतो. त्वेष चांगल्या अर्थाने म्हणतो आहे बरं मी आणि जन्मभर हेच घडत आले आहे.


: प्रा. चंद्रकांत पाटलांनी 'पुन्हा एकदा कविता' या संग्रहाच्या प्रस्तावनेत तुमचा समावेश रसिकरंजनी परंपरेत केला आहे. तुम्हाला हे बिरुद मान्य आहे का?
: रसिकरंजनी म्हणजे हलकी परंपरा आहे का? न टिकणारी परंपरा असे म्हणायचे आहे का? शेवटी कविता कशासाठी, कुणासाठी असते? कविता एखाद्या मंदिरात लोखंडी गजांमागे बंद करून तिची पूजा करण्यासाठी असते का? चंद्रकांत पाटील हे नेमके कोण आहेत मला ठाऊक नाही!


: अहो, ते 'वाचा' प्रकाशनाचे कवी!
: मी पण मराठी माणसांचा कवी आहे. तुम्ही दरवाजे बंद करून कविता लिहा, वाचा, पण एवढं खरं ज्या भाषेत गझल आली, तिथे ती पट्टराणीच बनली.
तुमची करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे
तुमच्यात मी येऊ कसा? बदनाम झंझावात मी!
आणि काळे, हे जर रसिकरंजनीच असेल तर केव्हाच विझून जायला हवे होते. ही तात्पुरती फेज आहे असे म्हणणारे कवी केव्हाच विझले, मी ३२ वर्षांपासून गझल लिहीत आहे; पण अजून विझलो नाही. तुम्ही नावे ठेऊन काय होणार? आणि हे केवळ रसिकरंजनीच आहे तर 'मौज' का छापते आमची कविता? चला समोरासमोर या. होऊन जाऊ द्या फैसला. तुम्ही तुमची म्हणा, आम्ही आमची म्हणतो. त्यांना वाटतं, आपणच अभिजात कवी. मग तुम्ही मासमिडिया टाळा. आपल्या बिळात बसा अन् ऐकवा एकमेकांना. टी. व्ही. आणि रेडियोवर जाता कशाला? लेख आणि संग्रह छापता कशाला? काळे! तुम्हाला खरं सांगू का? यांची ही 'दुखणी' व्यक्तिगत आहेत!