सुरेश भट नावाचा मस्त कलंदर
फाटक्या पदरात माझ्या का तुझे मावेल अंबर ?
दानही करशील तू पण मी असा आहे कलंदर !
असा खऱ्या अर्थाने कलंदर वृत्तीचा , पण जबरदस्त प्रतिभा आणि शब्दकळेचे धन लाभलेले कवी सुरेश भट यांचा १५ एप्रिल हा जन्मदिवस... त्यानिमित्त....
...........................................
नागपूरसारख्या हिंदीचे प्रभुत्व असलेल्या नगरात राहून भटांनी मराठी कविता जोपासली व लिहिली. त्यांनी राजकीय भाष्य करणाऱ्या कविता लिहिल्या , भावकविता रचल्या व प्रेमकविताही सादर केल्या. पण ते खरे रुजले , रुळले आणि बहरले , गझलांच्या प्रांतात. माधव ज्युलियन यांच्यानंतर भटांनीच गझल समर्थपणे लिहिली व लोकप्रिय केली. मोजक्या , आशयघन शब्दांत गेयतेसह गझल पेश करण्याची त्यांची हातोटी जबरदस्त. म्हणूनच त्यांच्या गझला केवळ मंचकविता म्हणून नव्हे , तर रेडिओवरील ' गाणी ' बनून जनमानसात पोहोचल्या व ओठांवर रुळू लागल्या. ते कधीच कठीण व संस्कृतप्रचुर शब्द आणि संकल्पनांच्या जाळ्यात सापडले नाहीत.
सामान्यांना दिसते व भावते , अशाच शब्दांत त्यांनी आपली कविता लिहिली. ' मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे , मोकळ्या केसात माझ्या तू जिवाला गुंतवावे ', हे हळुवार प्रणयगीत असो किंवा ' कालचे सारे लफंगे बैसले सिंहासनी , ढाळतो आम्ही भिकारी लक्तराची चामरे ' हे भयंकर उद्वेगाचे सामान्यांचे फुत्कार असोत , भटांचे शब्द आणि त्यामागे दडलेले अर्थांचे विविध पापुदे उलगडताना रसिकांना तोशीश पडली नाही वा शब्दकोशांचा आधारही घ्यावा लागला नाही. भटांची देहयष्टी प्रचंड. अशा आडदांड माणसाकडून ' मालवून टाक दीप चेतवून अंग अंग , राजसा किती दिसांत लाभला निवान्त संग ' असे शब्द लिहिले जातील , यावर अनोळख्याचा विश्वास बसणे कठीणच.
पण ज्यांना भटांचा थोडाफार सहवास लाभला , त्यांना या वैदभीर्य ऐसपैस माणसाची प्रतिभा बसल्या बैठकीतच कशी खुलत जायची , याची कल्पना आहे. ' भर उन्हात आले , काही पावसात आले , मला शब्द भेटायला गात गात आले ', असे ते सहजगत्या लिहून जात व त्याचे ' काव्य ' बने. गेल्या शतकात महाराष्ट्राने गदिमांसारखा प्रतिभासंपन्न कवी पाहिला. भटांची जातकुळीसुद्धा तीच होती. ' हाय तरीही बाजारी , माझी तोकडी पुण्याई , नाही अजून तेव्हढी माझ्या शब्दांना कल्हई ', असे ते म्हणत असले , तरी त्यांच्या शब्दांना केवळ कल्हईच नव्हे , तर तलवारीची धारही होती.
त्यामुळेच त्यांनी आणीबाणी आल्यानंतर १ ' उष:काल होता होता काळरात्र झाली , अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली ' अशा कडव्या शब्दांत आपला निषेध व्यक्त केला. आपल्याच मस्तीत आयुष्य व्यतीत करणाऱ्या भटांच्या कारकीदीर्ची सुरुवात शिक्षकी पेशाने झाली व नंतर त्यांनी काही काळ पत्रकारिताही केली , हे खरे असले , तरी ती त्यांची ओळख नव्हे. ' रंग माझा वेगळा ', ' एल्गार ', ' रुपगंधा ', ' झंझावात ' यासारखे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. त्यातील प्रत्येकाचा रंग वेगळा होता , कारण कुठल्याही चाकोरीत फार काळ राहायचे नाही , असे जणू या कलंदराने वयाच्या विशीतच ठरवून टाकले होते.
' चल ऊठ रे मुकुंदा , झाली पहाट झाली ', ही त्यांनी रचलेली अस्सल भूपाळी सुमन कल्याणपूर यांच्या गळ्याने महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत पोहोचवली आणि ' मराठीला नवा होनाजी सापडला ,' अशा शब्दांत त्यांचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. पण भूपाळ्या , अभंग वा लावण्या लिहिणे हा आपला प्रांत नाही , हे त्यांनी तेव्हाच ओळखले होते. त्यामुळेच ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महाराष्ट्राच्या बाजूने उतरले व त्यांच्या लेखणीतून नवमहाराष्ट्रगीत अवतरले , ' घरोघरी स्वातंत्र्याचा पांडुरंग आला , महाराष्ट्र भेटीसाठी पुंडलीक झाला , विटेवरी आम्ही ठेवू जागता पहारा '. भट केवळ लिहीत राहिले असते , तर त्यांच्या कविता व गझला फार तर पुस्तकरूपाने चिमूटभर वाचकांपुरत्या उरल्या असत्या.
पण पं. हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांच्या अनेक कवितांना संगीतबद्ध केले आणि लता व आशा या मंगेशकर भगिनींनी त्या शब्दांचे जणू सोने केले. एकाच वेळी तरल , मृदू आणि विव्हल अशा विविध मानवी भावनांचा कल्लोळ कागदावर उतरवण्याचे सार्मथ्य असलेल्या भटांच्या लेखणीतून साकारलेल्या ' तरुण आहे रात्र अजुनी , राजसा निजलास का ' किंवा ' केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली ' या विराण्यांमध्ये डोळ्यात टचकन् पाणी आणण्याची ताकद आहे.
ऐहिक सुखाची पर्वा न करता , भट हयातभर लिहीत राहिले. पुत्रवियोगाचे दु:ख त्यांनी पचवले. पण वरवर शांत वाटणारे भट आतल्या आत फुटत होते. ' जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे , सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही ', असे लिहिताना त्यांच्या पेनात आसवांची शाई होती. असा हा मस्त कलंदर , ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा , गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा ' असे अभिमानाने जाहीर करणारा. या जगाच्या गुंत्यातून आपले पाय अलगदपणे सोडवून तो निघून गेला.
(महाराष्ट्र टाइम्जमधून साभार)
१. उषःकाल होता होता ही कविता आणिबाणीच्या फार पूर्वीची आहे.