सारे
हालचालींनी तिच्या जग त्रस्त सारे
कळ उरीची दाबण्यातच व्यस्त सारे
ठेवुनी डोळा दुजाच्या ऐवजावर
घालती दारी स्वतःच्या गस्त सारे
नाव ना यावे घरी ओठांमधूनी
या भयाने गाव चिंताग्रस्त सारे
पाहताना पाहिले नाही कुणीही
या दिलाशाने इथे आश्वस्त सारे
भेट तिजला घ्यावया जातो दुकानी
कां दुकानातील वाटे स्वस्त सारे
टाकते मागे वळूनी नजर जुल्मी
चालताना गोठती पांथस्त सारे
लग्न ठरले एकदा नुसते म्हणाली
जाहले आकाशही उध्वस्त सारे
Taxonomy upgrade extras: