कमळाबाई



कर्नाटकची राणी व्हाया  हरखुन गेली कमळाबाई;
मुखात मारुन मटकन बसली हिरमुसलेली कमळाबाई !


पदर धरोनी हिचा जयांनी लुळा-पांगळा प्रवास केला--
'ठिकाण' येताच ते म्हणाले --भरकटलेली कमळाबाई


ठरले-तुटले, तुटले-ठरले कुणी कुणाला कितिदा वरले ?
परित्यक्ता ही अखेर झाली नवी-नवेली कमळाबाई !


बाप-लेक ते बनेल कोल्हे काटा-छापा खेळुन गेले;
साधन म्हणुनी वापरली ही --खुळी 'अधेली' कमळाबाई


धर्मि-निधर्मी करार झाला, अदलुन-बदलुन पाळी करू या
पाळी येता गलका झाला -- 'विटाळलेली कमळाबाई' !


सत्ता-डोही न्हाण्याचीही ओढ जिवाला ओढत असता--
कावेरीच्या पाण्याविण ही सुकली वेली कमळाबाई


निधर्मवादी मधुमेहींनी छान मतलबी पथ्य पाळले--
चाटुन-चोखुन दूर लोटली ही गुळभेली कमळाबाई



शिवाजी जवरे
दीपनगर - ४२५ ३०७
ता. भुसावळ, जि. जळगाव


Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

मस्त राजकीय व्यंग.. 'कमळाबाई' लय भारी
सत्ता-डोही न्हाण्याचीही ओढ जिवाला ओढत असता--
कावेरीच्या पाण्याविण ही सुकली वेली कमळाबाई..सही
-मानस६

'कमळाबाई'चे व्यंग रंगवणारी ही काव्यरचना छान पण गझल अथवा हझल या प्रकारांत मोडेल काय? असा प्रश्न पडला.