दाद होती !

त्या तुझ्या घावास माझी दाद होती
आसवांना पावसाची साथ होती

साजर्‍या वेशात आली वीज कोणी
ती नशीबाचा अनोखा वार होती

ऐकला मी ताल टाळ्यांचा मघाशी
ती कुणाची अंत्ययात्रा गात होती ?

मी जिच्यासाठी जगाला सोडलेले
पाय मागे ओढणारा गाव होती

भूतकाळाची पुन्हा कां ओढ लागे ?
मी कधीची कापली ती नाळ होती

 

 

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

भाव चांगले आहेत.. पण काफिये गझलेच्या व्याकरणांचे नियम पाळत नाहीत.. खात्री करुन घ्यावी
मानस६

मानस मी आपल्या विधान २ शी असहमत आहे...

मराठी गझलेत स्वरयमके वापरू नयेत असे माझे मत आहे. उर्दू स्वर यमके असतात. पण अकारान्त स्वरयमके मी तरी अजून पाहिलेली नाहीत.
आनंद, मानस म्हणतात तसे गझलेत भाव चांगले आहेत.

प्रिय मित्र आनंद,
आपण गझलेचे अर्धे 'तंत्र' आत्मसात केलेले आहे. कारण लघु-गुरूचा क्रम आपण सांभाळला आहे. पण काफियाचा दोष आपणास मानस व चित्तरंजन यांनी कळवलेला आहेच. शिवाय दोन ओळींतील परस्परसंबंधही सहज, स्पष्ट, सोपा आणि तरीही प्रभावी हवा. आपल्या मतल्यात व शेवटच्या शेरात हा प्रयत्न दिसून येतो. पण तो प्रभावी हवा. यासाठी आपण सुरेश भटांच्याच गझलांचा त्या दॄष्टीने अभ्यास करावा. आपण चांगली गझल लिहू शकता असा मला विश्वास वाटतो. शुभेच्छा.
संतोष कुलकर्णी, उदगीर
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०