सरहदी का शोधती मग झुंजण्याची कारणे? (तरही)

सरहदी का शोधती मग झुंजण्याची कारणे? (तरही)

अंतरीचा घाव ताजा गंधण्याची कारणे,
काय होती वेदना आनंदण्याची कारणे ?

साजणाचे भास होते की सुखाचे चांदणे...
मध्यराती रोमरोमी धुंदण्याची कारणे

चांदण्याची रात्र जेव्हा मीलना खोळंबते...
लागती का हात-हाती गुंफ़ण्याची कारणे?

खेळता का डाव अर्धा, व्यर्थ वाटू लागतो....
रास्त जर होती मनाच्या गुंतण्याची कारणे

ना तुला कळली कधी जी, ना मलाही गावली...
उत्तरा खोळंबलेली भांडण्याची कारणे

जो नको तो ऐनवेळी कारणाविन गाठतो...
नेमकी तू टाळली बघ भेटण्याची कारणे

यंव होती कारणे अन त्यंव होती कारणे...
का कधी पडताळली नाकारण्याची कारणे?

एक जर बंदे खुदाचे, ईश्वराची लेकरे...
सरहदी का शोधती मग झुंजण्याची कारणे?

श्वास-श्वासा जोडण्याला जन्म सारा भांडले
श्वास गेला ताडताना संपण्याची कारणे

शेर सव्वा-शेर होते, गझलियत होती जरी
ना ’प्रिया’ कळली गझल, ना गंडण्याची कारणे.

-सुप्रिया(जोशी) जाधव.

प्रतिसाद

एक जर बंदे खुदाचे, ईश्वराची लेकरे...
सरहदी का शोधती मग झुंजण्याची कारणे? .... सुप्रियाजी वाह