जन्मभर....

*

खोल खोल आतवर तुझी नजर
गुंतले जिच्यात मी निमीषभर

आर्जवे खट्याळ पाहण्यातली
का करी अजाणता मनात घर ?

थोपवू नको विजेस वादळा
हाय! मी उभी जळेन फ़ारतर

नेमकाच प्रश्न टाळलास तू
बोललो जरी बरेच आजवर

शांतता टिकेल का घरी सख्या,
संशयास मानशील मित्र जर

निर्विवाद लाव सोक्षमोक्ष तू
धिंड काढ वाटल्यास ’दर-बदर’

राहिले खरेच ओळखायचे
काढले उणे-दुणेच जन्मभर

-सुप्रिया.

प्रतिसाद

थोपवू नको विजेस वादळा
हाय! मी उभी जळेन फ़ारतर

क्या बात है !