थांबणे सोसेल तोवर लागते चालायला...

चालण्याचे दु:ख जोवर लागते विसरायला
थांबणे सोसेल तोवर लागते चालायला...

लाघवी भासांसवे संवेदना सुखवायला
वास्तवाचे पाश ते मग लागती जाचायला...

लाजणार्‍या मोगर्‍याचे हासणे फसवे किती..,
लागलेला वेळ थोडा वागणे समजायला...

मी फुलांना सांगतो हे भुलवणे आता नको
त्या कळ्यांचा धीर आता लागला संपायला...

या जगाची रीत न्यारी शिकवते भोगायला
लागते मग सवय वेड्या.., वेदनांची व्हायला...

नमस्कार मंडळी,

गझलेच्या क्षेत्रात मी अगदीच नवखा आहे. मायबोलीवरच्या काही गुरूजनांकडून नुकतेच शिकायला सुरुवात केलीय. इथेही बरेच काही शिकता येइल अशी अपेक्षा मनात बाळगुन आलोय. आपल्या मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत....

विशाल

प्रतिसाद

आणखी गझला प्रकाशित कराव्या. ह्या गझलेवरून तुम्हाला गझलेचे तंत्र अवगत झाल्यासारखे दिसते आहे.

स्वागत विशाल. आपल्या आणखी गझला येवु द्या.

या जगाची रीत न्यारी शिकवते भोगायला
लागते मग सवय वेड्या.., वेदनांची व्हायला.>>>

छान शेर विशालराव!

चित्त व कैलास यांच्याशी सहमत!