शहारा

तुला रोज येतो कधीही शहारा
कसा सांग व्हावा ? नशेचा उतारा

किती ऊन सोसून मी वाट पाहू ?
तुझ्या सावली चा मला दे किनारा

बिछाना च होईल आकाश गंगा
तु ये ना जरा लाजवू शुक्र तारा

उभा जन्म काट्यात आहे तरीही
तुझी आस आहे सुगंधी फुलोरा

जरी अंगणे विस्तवाचीच माझी
तुझ्या आठवांचा मिळो गार वारा

अनाहत तुझ्या अंतरी मीच आहे
मुक्या काळजाचा घुमे हा दरारा

...मयुरेश साने..दि...२६-जानेवरी-११