महत्व कशाला ? शब्दांना की अर्थाला.


लोकहो !!!


गेली काही वर्षे मराठी साहित्याचा आणि विशेष करून काव्याचा अभ्यास करत असतांना काही गोष्टी जाणवल्या. जाणवल्या म्हणण्यापेक्षा खटकल्या.


त्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे, गोंडस शब्द वापरून पाडलेल्या काव्याला अनभि़ज्ञांकडून नको तेवढी दाद मिळते. त्याला ते लोक सौंदर्यलक्षी शब्दकळा वगैरे वगैरे म्हणतात.


आमच्या एका मित्रांनी आम्हाला एका नामवंत कवीची कविता ऐकवली. त्यातले अगडबंब शब्द सोडले तर मूळ कल्पना काय तीच समजली नाही.


नंतर ते म्हणाले "पंत, काय सुंदर काव्य आहे ना?"


आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले की "आम्हाला यातलं झ्या...पण कळलेलं नाही. आणि जे कळलं नाही त्याला चांगलं किंवा वाईट म्हणणं हे योग्य नाही"


पण किमान आम्हाला काही कळलं नाही, हे तरी कळलं. पण असे अनेक आहेत की त्यांना काही कळत नाही , हे ही त्यांना कळत नाही. असो.


हीच सवय मराटीत ग़ज़ल लिहिणार्‍या काही कवींनी उचललेली आम्ही पाहिली आहे. जर मराठी ग़ज़ल याच अंगांनी गेली तर तिच्या भवितव्याची चिंता निर्माण होईल. कारण ग़ज़लेत शब्दकळेपेक्षा शेराचा आशय हा महत्वाचा आहे, असे किमान आमचे तरी मत आहे.


याच साईटवर मान्यवरांच्या ग़ज़ला नावाच्या शीर्षकाखाली ठेवण्यात आलेल्या काही ग़ज़लात हीच ऐब आम्हाला पहायला मिळाली. जर का तथाकथित मान्यवर अशा पध्दतीत लिहीत असतील तर नवशिक्यांचे काय?


"या लोकांना मान्यवर म्हणायचे का?" असा अगदी रत्नांग्रीच्या मध्यल्या अळीतला प्रश्नही आम्हाला पडला. ते मान्यवर आहेत हे त्यांना तरी मान्य आहे का? असो.


ग़ज़लची भाषा ही कुठेही शिकवली जात नाही. रविवारच्या ग़ज़ल पुरवणी नामक विविध वृत्तपत्रातील विनोदी सदरात सुध्दा याबद्दल कधीही  आम्ही वाचलेले नाही.


तरी या विषयावर इथे चर्चा व्हावी आणि त्या विचारमंथनातून नवीन उमेदीच्या लोकांना मार्गदर्शन व्हावे अशी प्रामाणिक इच्छा आहे.


आपला,
(बहुचर्चित) धोंडोपंत 


 


गझलचर्चा: 

प्रतिसाद

प्रिय धोंडोपंत,
एका महत्त्वाचा मुद्दा आपण ऐरणीवर घेतला आहे. ह्या चर्चेतून काही शिकायला मिळेल अशी आशा व्यक्त करतो.
आपला
(जिज्ञासू) प्र०

त्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे, गोंडस शब्द वापरून पाडलेल्या काव्याला
अनभि़ज्ञांकडून नको तेवढी दाद मिळते. त्याला ते लोक सौंदर्यलक्षी शब्दकळा
वगैरे वगैरे म्हणतात.

 ´सौंदर्यलक्षी शब्दकळा´ म्हणजे काय हे आम्हालाही कधी कळलेले नाही. गोंडस शब्द असलेल्या शब्दांना (पाडलेल्याहा शब्द मी वापरणार नाही.) नको ती दाद मिळते हेदेखील खरे आहे.  कानांना जे गोड, लुसलुशीत वाटते ते भले, भले त्याचा अर्थ निघो वा न निघो, असे अनेकांना वाटते. भटांनी वेळोवेळी ह्यावर टीका केलेलीच आहे.

हे वर्गीकरण केवळ सोयीसाठी आहे.  जे गेली काही १५-२० वर्षे लिहीत आहेत, ज्येष्ठ आहेत आणि ज्यांचे नाव झाले आहे त्यांची गझल या विभागात आहे.  पण ज्यांचे नाव झाले नाही ते ह्यांच्यापेक्षा कुठे कमी आहेत असे नाही. किंबहुना काही बाबतीत वीसच असू शकतात. दर्जाचा आणि मान्यवर गझलकार असण्याचा-नसण्याचा तसाकाहीही संबंध नाही, असेमला वाटते.


चार लोकांना माहिती असणारे शब्द वापरण्यात कमीपणा नसतो. पण मग माझा वेगळेपणा काय?काही वेगळ करण्याच्या हट्टातून असे प्रयोग होत असावेत. ती कायमची सवय नसेल तर प्रयोगाचा भाग म्हणून स्वीकार करावा, त्याचे स्वागत करावे.
धोंडोपंत,  
शब्दातून त्याचा अर्थ वेगळा काढता येत नाही हे आता मी सांगायची गरज नाही. अगदी समानार्थी शब्द घेतले तरी त्यांची अर्थछटा वेगळी असते.  शब्द किती चपखल आहे ते महत्त्वाचे.  सर्व शब्दकोश पालथा घालून झाल्यावर जर गझलकाराला आपल्या भावना सांगण्यास नवे शब्द करता येत असतील तर ते जरूर करावे किंवा असे नवे शब्द जर श्वास घेतो तेवढ्या सहजतेने येत असती ल तर ते सुद्धा वापरावे. मला तरी यात काही गैर वाटत नाही.
 बेचव पदार्थांच्या  नुसत्या दिसायला सुंदर दिसणार्‍या मांडणीने कोणाचे पोट भरत नाही किंवा समाधान होत नाही. हेच काव्याला आणि त्याचा आस्वाद घेणार्‍यांना व  काव्य लिहिणार्‍यांना भान राहिले पाहिजे. मग अशा चर्चांची गरज नाही.
हे सगळ राहू द्या एकीकडे... आपल्या बाब्याने केले तर ते चांगले अन्यथा ..नाही. एवढाच एक नियम मला जगात सगळीकडे दिसतो. बघा पटतय का?
 

शब्दातून त्याचा अर्थ वेगळा काढता येत नाही हे आता मी सांगायची गरज नाही. अगदी समानार्थी शब्द घेतले तरी त्यांची अर्थछटा वेगळी असते.  शब्द किती चपखल आहे ते महत्त्वाचे.  सर्व शब्दकोश पालथा घालून झाल्यावर जर गझलकाराला आपल्या भावना सांगण्यास नवे शब्द करता येत असतील तर ते जरूर करावे किंवा असे नवे शब्द जर श्वास घेतो तेवढ्या सहजतेने येत असती ल तर ते सुद्धा वापरावे. मला तरी यात काही गैर वाटत नाही.

हे सोनालीताईंचे म्हणणे एकदम पटले. पण धोंडोपंत आणि सोनालीताईंनी उदाहरणे दिली असती तर गोष्टी अधिक स्पष्ट झाल्या असत्या.उदाहरणे द्यावीत.

मराठी भाषेत अनेक तत्सम्/तद्भव शब्दांची रेलचेल आहे. मग ते संस्कृत असोत वा उर्दु वा फारसी. हे शब्द काव्यात वापरल्यास लोकांचा आक्षेप नसतो.
पण तेच शब्द जर इंग्रजीतले असतील तर लगेच ओरडा सुरु होतो.(उदा. इस्टो , पिन, पेन, ब्रेड, रेस, पायंडल...... इ.इ.इ.इ.) पाकिट (पॅकेट) सारखे शब्द तर  आता कधी निघून जातात ते समजतही नाही.
उगाच संस्कृतीरक्षण म्हणून संस्कृतातले अगड्बंब / जगड्व्याळ शब्द वापरावेत याला काय अर्थ आहे? मुद्दाम विंग्रजी 'पाजळावे' अशा मताचा मी मुळीच नाही. पण मुद्दाम सामान्य माणसाला उच्चारता येणार नाहीत (अर्थ तर लांबच) असे शब्द कशाला वापरायचे?

बेचव पदार्थांच्या  नुसत्या दिसायला सुंदर दिसणार्‍या मांडणीने कोणाचे पोट भरत नाही किंवा समाधान होत नाही.
 
अगदी बरोबर...म्हणूनच  काळ्जाला चिरत जाणारे शब्दच किंवा एकत्रितपणे तसा भास निर्माण करणारे शेर लक्षात राहतात.
उदा:
कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
कळते मला अरे हा माझा वसंत नाही
किंवा
मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

आपल्याला जे काही म्हणायचे आहे ते जनतेच्या भाषेत जनतेपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे.