झंझावात - २

लिहिता लिहिता मला एक अत्यंत समर्पक व सुंदर संस्कृत सुभाषित आठवले आहे. ते येथे उद्धृत करण्याचा मोह टाळवत नाही. अन्यथा तो माझा अपराध ठरेल. प्रसाद ( म्हणजे सहजपणा व स्पष्टता) हा गुण काव्यासाठी अपरिहार्यपणे आवश्यक असतो. जेथे प्रसाद नसेल, तेथे काव्य कोठून येणार? मग प्रसादगुण असलेले काव्य, म्हणजे काय?


श्रुतिमात्रेण शब्दातु येनार्थ प्रत्येयो भवेत् ।
साधारणसमग्राणां स प्रसादो गुणो मतः ॥


ज्या काव्यातील शब्दांचा वाचता वाचता -ऐकताक्षणीच सामान्य बुद्धी सर्व माणसांना प्रत्यय येतो. अर्थ समजतो, त्याला प्रसादगुणाचे काव्य म्हणावे. पण अशा काव्याला अनेक थोर अत्याधुनिक अमेरिकन मराठी कवी काव्य समजत नाहीत. जे समजत नाही, जाणवत नाही आणि टिकत नाही, ज्याला हल्ली अभिजात काव्य म्हणतात. पण अशा काव्याचे आयुष्य किती? जे 'काव्य' लोक चटकन विसरून जातात, त्याला काव्य म्हणायचे काय?

मी स्वत:ला कुणी डुढ्ढाचार्य समजून हे बोलत नाही. मी करोडो मराठी माणसांच्या समुद्रतला केवळ एक बुडबुडा आहे. बुडबुडे फुटतात, पण समुद्र शिल्लक राहतो. माझ्या या तथाकथित प्रस्तावनेच्या निमित्ताने मला जे वाटते, ते सांगायची मी ही संधी साधत आहे, एवढेच. समजा, मी मुळात कवीच नाही, हे जरी मान्य  केले, तरी मी एक मराठी माणूस म्हणून मराठी काव्याविषयी आणि सध्याच्या परिस्थितीविषयी माझी प्रान्जळ मते मांडण्याचा अधिकार मला कुणीची नाकारू शकत नाही. येथे मी माझ्या काव्यलेखनाविषयी, या काव्यसंग्रहाविषयी काहीही लिहिलेले नाही. स्वतःची स्वतःच शिफारस करणे मला पटत नाही. शिवाय, माझा स्वतःचा असा कोणताही कळप नाही.


आता जे कवी गझल लिहीत आहेत ,' ते भटांच्या संप्रदायातील आहेत', असा आरोप करणे म्हणजे शुद्ध द्वेषमूलक खोटारडेपणा आणि घाणेरडेपणा होय! जो तो स्वतःच्या दमावर जगत आहे! आणि लिहीत आहे! ज्यांना गझल लिहायची असेल, ते गझल लिहितील. हा तर ज्याच्या त्याच्या मर्जीचा सवाल आहे आणि गळ्यात पडणे म्हणजे प्रेम नव्हे. शेवटी काळाचा वाहता वारा भूस उडवूनच नेतो. पण मराठी गझल आता महाराष्ट्रात कायमची रूजली आहे, हे सूर्यसत्य आंधळ्यांतला आंधळा माणूस सुद्धा नाकारू शकणार नाही. आणि हे काय कमी झाले?


याचसाठी केला  ।होता अट्टाहास ।शेवटचा दिस ।गोड व्हावा


माझ्या काव्यलेखनाच्या प्रवासात मी पूर्वी कसे व जे लिहायचो, तसेच व तेच मी आज निश्चितच लिहीत नाही.
कारण परिवर्तन हा जिवंत असण्याचा पुरावा होय.


परंतु, मी जे भूतकाळात लिहिले, ते मीच लिहिले , ही वस्तुस्थिती मी नाकारून चालणार नाही.