पाय
असा कसा उठला बाजार श्रद्धेचा ज्ञानिया
रेड्याचा हा हाती कासरा, धरला विठू तू
रुजू शासकीय महापुजा दुष्काळ निवारणा
विकासाच्या नावे खिसा, भरला विठू तू
भेगाळली वीट पुंडलिकाची वाहून पापाला
इतुका सुवर्णाच्या भाराने वाकला विठू तू
नाम्याच्या समाधीचा चोरला जाताना चिरा
तुझ्या इमल्यावर चढवला इमला विठू तू
आषढी-कार्तिकी श्राद्ध तुकयाचे इंद्रायणी तीरा
सुधारणा बुडाली गाथा वाचत बसला विठू तू
कल्लोळ पैशाचा बडवे नाचती दिंड्या-पताका
वैष्णव दीनवाने रांगेत पाहुन हसला विठू तू
पारायणाचा झाला इव्हेंट आणि वारीची जत्रा
मुखवटा चांदीचा लावून गप झोपला विठू तू
दुमदुमली पुण्य पंढरी हौश्या नवश्या गवश्या
चोरांच्या आळंदीला साक्षीला धावला विठू तू?
श्रद्धेच्या वारकर्याची ज्यांनी बांधली उत्तरपुजा
त्यांच्याच नवसाला कायद्याने पावला विठू तू
दुष्काळाने गांजला तरीही सारी वारी चालला
तुझ्या दारी थांबला तरीही न ढळला विठू तू
वारीमध्ये जो रंगला तु़झ्या नादात दंगला
उभा जन्म त्याचा भंगला जागला विठू तू
या पामराने असा स्वर्ग मागितला कोणता
की त्या हजार दरवाज्यांमागे दडला विठू तू
मी हात पुढे केला महारोगी हा सत्याचा
नेमका त्यावेळी का मागे सरला विठू तू
युगे अठ्ठावीस उभा राहून खरेच झिजला
की पंढरीतून आता पाय काढला विठू तू?
किमंतु
आनंदऋतू प्रकाशन
०३/०९/२००९
प्रतिसाद
विश्वस्त
शुक्र, 23/04/2010 - 16:00
Permalink
तंत्रशुद्ध नसलेल्या रचना
तंत्रशुद्ध नसलेल्या रचना कालांतराने विचाराधीन करण्यात किंवा अप्रकाशित ठेवण्यात येतात, ह्याची नोंद घ्यावी.
कैलास
शुक्र, 23/04/2010 - 21:04
Permalink
किमंतु साहेब्,ही आपली आनंद
किमंतु साहेब्,ही आपली आनंद ऋतू प्रकाशन तर्फे प्रकाशित झलेली रचना आहे का?
ही रचना गझल नाही आहे.
लयीत म्हणता येत नाही...
मात्र आशय चांगला आहे.
कृपया विश्वस्तांच्या म्हणण्याकडे लक्ष द्यावे.
डॉ.कैलास
ऋत्विक फाटक
शनि, 24/04/2010 - 13:03
Permalink
क्षमा करा..... कविता रटाळ
क्षमा करा.....
कविता रटाळ आहे...
१. ही गझल नाही.
२. ही रचना लयीत वाचता आली नाही.
३. आशयातील तोचतो'पणाचा कंटाळा आला.
अवांतरः किमन्तु म्हणजे काय?
ऋत्विक फाटक
शनि, 24/04/2010 - 13:05
Permalink
विश्वस्तांप्रत : ही रचना
विश्वस्तांप्रत :
ही रचना 'गझल' या शीर्षकाखाली प्रकाशित का केली आहे?
किमंतु
मंगळ, 27/04/2010 - 11:05
Permalink
@सर्वांस आपल्या प्रांजळ
@सर्वांस
आपल्या प्रांजळ अभिप्रायाबद्दल धन्यवाद. मी गझल लेखनास नवीनच सुरुवात केली आहे त्यामुळे आपणा सर्वांइतपत सराईतपणे मी गझल लिहू शकेनच असं नाही. बाराखडी आणि गझलेच्या व्याकरणाच्या अंगाने पण त्यात पुष्कळच चुका आहेत पण नवीन माणसास ते लगेचच साधेल असंही नाही.
नवीन माणसास एखादी गोष्ट आत्मसात करण्यास थोडा वेळ लागतो तसेच त्या क्षेत्रातील मान्यवरांचा सहवास सुद्धा लागतो. एखादी रचना थोडी नियमाबाहेर आहे असं सिद्ध झाल्याने ती प्रकाशित करायचीच नाही असा पायंडा पाडला तर मग नवीन माणसास आपण शिकण्याची संधी नाकारतो आहोत आणि त्यास नाउमेद करतो आहोत असं नाही का होणार?
माननीय सुरेश भट यांच्या सारख्या मान्यवरांच्या गझलापण सुरुवातीच्या काळात ओबड-धोबडच होत्या असं त्यांनी स्वतःच म्हटलं आहे. अनुभव, सराव आणि साधना यांनीच परिपुर्णता गाठता येते. त्यामुळे मला असं वाटतं की एखाद्या नवीन कलावंताची रचना आपणा सर्व प्रतिभावंतांएवढी परिपूर्ण नसेल तरी ती आपल्या साईट्वर नवीन कलावंतास उत्तेजन व गझल लेखनाचा प्रसार व्हावा या उद्देशाने प्रकाशित होऊ द्यावी. तरीही विश्वस्त व आपणा सर्व मान्यवरांचा परिपूर्ण लेखनाचाच आग्रह असेल तर मला खेद आहे. त्यामुळे या वेबसाईटचा नियमभंग होऊ नये म्हणून मी इथून पुढे माझ्या रचना इथे प्रकाशनार्थ देणार नाही. कारण त्या एका नवशिक्या कवीने लिहलेल्या असल्यामुळे तितक्याशा परिपूर्ण लगेच होऊ शकणार नाहीत याबद्दल माझी खात्री आहे.
किमंतु