काळानुरुप रचलेल्या अन नंतर कालबाह्य होणार्‍या गझलांविषयी......

मागे एका गझलेतिल प्रतिसादात चित्तरंजन भट म्हणाल्याचे स्मरते की व्यक्तिसापेक्ष रचलेला शेर अथवा गझल ही काळ पालटल्यानंतर अथवा तो प्रसंग विस्म्रुतीत गेल्यावर अपेक्षित परिणाम येत नाही......परंतु कालच वाचनात शिवाजि जवरे यांची ही गझल आली.....२००४ मध्ये रचलेली ही गझल.....आजही हातोडा आहे.....

कुणाच्या 'बा'सही नाही कळे-१२ मतिवाला
पडे-लोळे तरीही ना मळे-१२ मतीवाला.

कसाही वाजवी पावा कधी उजवा कधी डावा
जिथे लोणि दिसे तेथे वळे-१२ मतीवाला

तसा हा लाल किल्ल्याच्या उभ्या दारात ना मावे
प्रसंगी चाळणीतुनही गळे-१२ मतीवाला

उभ्या ओसाड या रानी बघा तो दावतो पाणी
म्हणे खोट्या तरंगांना-तळे-१२ मतीवाला

उसाला नी कपाशीला किती मी घाम शिंपावा?
करे मिर्ची न खुर्चीचे खळे १२-मतीवाला

सकाळी फेकुनी देतो दुपारी वेचुनी घेतो
पुन्हा रात्री वडे त्याचे तळे-१२ मतीवाला

कधीचे बांधुनी आहे बघा बाशिंग गुडघ्याला-
कधी भरती म्हणे घटका-पळे-१२ मतीवाला

कधीचे लोटतो आम्ही-बघा दिल्लीकडे याला
फिरुनी हा इथे वाळू दळे-१२ मतीवाला

विदेशिचा नको गुत्ता म्हणे मी काटला पत्ता-
पुन्हा का त्याच वाटेने पळे-१२ मतीवाला?

--शिवाजि जवरे...."आवेग " गझल संग्रह्,किर्ति प्रकाशन्,औरंगाबाद-२००४

कैलास गायकवाड

प्रतिसाद

कैलास,
आपला मुद्दा कळला.
माझे मत....
मुळात ही जी रचना आपण दिलेली आहेत ती गझल आहे का? हाच माझा पहिला प्रश्न आहे. वरवर बाराखडी वाचणार्‍यांना कदाचित ही गझल वाटेलही. ही हझल वगैरे होवू शकेल. केवळ तंत्रात जमवून लिहिली म्हणजे त्या रचनेला गझल म्हणावे असे मला वाटत नाही. केवळ तंत्र जमले की गझल असे बाराखडीतही लिहिलेले नाही. त्यामुळे मी या रचनेला गझल म्हणणार नाही. शिवाजी जवरेंबद्दल मी बोलत नाही आहे तर या रचनेबद्दल बोलत आहे. रचना कोणी लिहिली यापेक्षा ती काय आहे हे पहावे आणि नंतरच त्याचा उल्लेख उत्तम गझल म्हणून करावा हे माझे मत गेली २वर्षे मी मांडत आहे.
मागे एका गझलेतिल प्रतिसादात चित्तरंजन भट म्हणाल्याचे स्मरते की व्यक्तिसापेक्ष रचलेला शेर अथवा गझल ही काळ पालटल्यानंतर अथवा तो प्रसंग विस्म्रुतीत गेल्यावर अपेक्षित परिणाम येत नाही
हे चित्तरंजन यांचे म्हणणे अगदी योग्यच आहे. काळ पालटल्यानंतर अथवा प्रसंग विस्मृतीत गेल्यावर.... असे चित्तरंजन यांनी म्हटले आहे ना..? या त्यांच्या ओळी महत्वाच्या आहेत. काल पालटला आहे असे आपणांस वाटते काय..?
आपण म्हणता त्याप्रमाणे हा हातोडा वगैरे नसून एक उपरोधिक रचना आहे. अशी रचना कोणावरही होवू शकते. पुराव्यादाखल माझी 'कुणाकुणाला मार हवा' येथे क्लिक करून वाचा. यावरून पूर्वी भलतेच वादळ उठले होते. असो. अशी रचना कोणीही करू शकतो हे मला सांगायचे आहे.
२००४नंतर फार काळ गेलेला नाही. त्यामुळे फार विचार करण्याची आवश्यकता नाही.
धन्यवाद...!

अजयजींशी बहुतांशी सहमत.
वरील रचना (हझल असो वा इनोदी कविता) मस्तच आहे!
तसेच चित्तरंजनजींचे म्हणणे सुद्धा अगदी खरे आहे....
बघा अजून दहा वर्षांनी ही कविता अर्थातच कालबाह्य वाटेल याउलट भटांची किंवा इथल्या चांगल्या कवीची गझल तितकीच ताजी आणि अर्थपूर्ण राहील जितकी ती आज आहे.

अजयजींशी सहमत.
व्यक्तिसापेक्ष रचना ती व्यक्ती "वाल्याचा वाल्मीक" झाली तरी कालबाह्य ठरू शकते.
किंवा वरील रचना ज्या व्यक्तींशी संबधीत आहे त्या व्यक्तीने उद्या देशाला गौरवास्पद वाटेल असे एखादे कार्य केले तर त्या व्यक्तीचे भुतकाळातील सर्व दोष मागे पडतील आणि ही रचना लोक फेटाळतील.
एखाद्या आदरनिय व्यक्तीने किंवा महामानवाने, तो थोर म्हणुन उदयास येण्यापुर्वी काही अफलातून कृत्ये केली असेल तर ती कृत्ये आज आपल्याला कोणी सांगायला आले तर आपण ऐकून घेऊ काय?

आणि व्यक्तीसापेक्ष रचना बहुतांश वेळी निरपेक्ष नसतेच. म्हनुन तीचे मोलही कमी असते.