महिला गझलकारांची संख्या

गझल हा प्रकार वगळून कविता करणा-यांची एकूणच संख्या पैशाला पासरी आहे.
प्रचंड संख्येने कविता लिहिल्या जात आहेत आणि त्यात महिला कवयित्रींची संख्या नक्कीच पन्नास टक्के असणार. अगदी पन्नास टक्के नसली तरी पस्तीस ते चाळीस टक्के असावी.
गझल या विशेष काव्यप्रकाराला मात्र महिलांनी जरा कमीच हात लावला आहे, असे दिसते. संगीता जोशी, नीता भिसे, ललिता बांठिया ही नावे ठळकपणे जुन्या पिढीसंदर्भात समोर येतात. या जालस्थळावर सध्या काही नावे नजरेस पडतात.
टक्केवारी काढली तर पुरुष गझलकार गझललेखनाबाबत संख्येने निम्म्यापेक्षा खूप जास्त दिसतात. या काव्यप्रकाराबाबत महिला गझलकारांची संख्या पस्तीस-चाळीस टक्क्यांपेक्षाही कमी होईल, असे वाटते.
काही प्रश्न पडले, ते असेः
महिला गझल कमी का लिहितात ?
प्रतिभा आहे पण त्यांच्यापर्यंत गझल कमी पोचली, असे आहे का ?
त्यांच्या एकंदरीत गझलजाणिवा, जीवनजाणिवा काय आहेत?
या प्रश्नांवर येथील महिला गझलकारांचे मत जाणून घ्यायची इच्छा आहे.
अर्थात, पुरुष गझलकारांचे स्वागत आहेच.

गझलचर्चा: 

प्रतिसाद

केदार,

मी नुकतेच काही लिखाण केले. त्यातील पहिला काही भाग येथे इटॅलिक्समधे देत आहे. हे लिखाण अजून पूर्ण झालेले नाही. आपल्याला हे मुद्दे योग्य वाटतील अशी नम्र आशा आहे. काही गैर वाटल्यास स्पष्ट सांगावेत.

विविध काव्यप्रकार हे विविध प्रकारच्या भौगोलिक, सामाजिक परिस्थितून निर्माण होत असावेत असे मानायला वाव आहे. कसीदा हा सुलतान / नवाब / बादशहा अशांच्या स्तुतीपर असलेला काव्यप्रकार आजच्या लोकशाही शासनप्रणालीत जाहीरपणे वापरणे अवघड आहे. म्हणजे एकदम कुणी महाराष्ट्राच्या मुख्यंमंत्र्यांसमोर उभे राहून त्यांच्या स्तुतीपर काही ओळी ऐकवून बक्षीस मिळवू शकणे अशक्य नसले तरीही खूपच अवघड आहे. ही गोष्ट वेगळी की सत्ताधायांच्या आजूबाजूला काही ना काही स्तुतीपाठक जमतातच व कवितेतून नसले तरी आपल्या वागंण्यातून मर्जी मिळवण्याचा प्रयत्न करतातच. समजा एखाद्या समाजात जर स्त्री घराबाहेर पडतच नसेल, कायम बुरख्यातच वावरत असेल तर तिथे ’लावणी’ हा काव्यप्रकार निर्माण होणे सोपे आहे का? खूप अवघड आहे याचे कारण मुख्यत्वे करून जाहीर होणारे कलाप्रकार, जसे, काव्य, हे पुरुषांचेच असणार. त्यात शृंगार जरूर येऊ शकतो, पण तोही त्या त्या समाजाच्या नैतिकतेबाबत जे अलिखित निकष आहेत त्यांच्या अनुषंगानेच!
उदाहरणार्थ, अशा समाजामधे ’हात नका लावू माझ्या साडीला’ ( सध्या ’बुरख्याला’ असे म्हणू ) ही ओळ रचल्यानंतर तिला मुक्त दाद मिळणे खूप अवघड आहे. कारण मुळात स्त्री बुरखा घालते याचेच कारण समाज खूप कर्मठ आहे. अशा कर्मठ लोकांमधे ’माझ्या बुरख्याला हात लावू नका’ असे एखादी स्त्री म्हणणे शक्य आहे का? उलट, बुरखेधारी स्त्री काही वेळा बुरखा न घालता बोलत असली तरीही ती एका पडद्यामागे असते ज्यातून फ़क्त ’ती तिथे आहे’ एवढेच दिसू शकते व बोलणारा तिच्यावर प्रेम करत असला तर मौलाना हसरत मोहानींच्या ’चुपके चुपके’ या गाजलेल्या गज़लेतील (जी गुलाम अलींनी गायली आहे ) हा शेर निर्माण होऊ शकतो.

खेंचलेना वह मेरा पर्देका कोना दफ़्फ़तन
और दुपट्टेसे तेरा वो मुह छुपाना याद है

म्हणजे, जिथे प्रियकर अचानक पडदा ओढून आपल्याला आवडणारी व आपल्यावरही प्रेम करणारी स्त्री कशी आहे हे पाहायला जातो व तेव्हा ती संकोचून व गोंधळून आपलाच दुपट्टा पटकन आपल्या चेहयावर ओढून घेते तिथे ’हात नका लावू माझ्या साडीला’ ही ओळ काव्यात येणे किंवा ’लावणी’ हा काव्यप्रकार निर्माण होणे जवळजवळ अशक्य आहे.

अत्यंत कर्मठ, हिंसेने राज्य बळकावणे नित्य असणाया, स्त्रीवर प्रचंड बंधने असणाया अशा संस्कृतीमधे गज़ल निर्माण झाली.

तो काळही आजच्यासारखा प्रगत नव्हता. अनेक उर्दू गज़लांमधे ’मीलनाच्या रात्री ज्योत विझवणे’ याचे उल्लेख आहेत. प्रेयसीला निरोप धाडण्यासाठी इमेलची, एसएमएसची सोय नसलेला तो जमाना! मग दूत जायचा निरोप घेऊन!

एकंदर, अत्यंत विरोधी सामाजिक व सांस्कृतीक परिस्थितीमधे ’गज़ल’ नावाचा अत्यंत सुकोमल, हळवा, भावनांची आर्तता पराकोटीची असणारा असा तरल काव्यप्रकार जन्माला आला.

स्त्री पुरुषाचे प्रेम हा या सृष्टीच्या निर्मीतीचा पाया आहे. मात्र हे प्रेम व्यक्तच करता येत नसेल तर? व्यक्त करण्यासाठी सगळेच थोडीच सत्ताधारी असणार? मग कधीतरी लहानपणी खेळलेल्या मैत्रिणीबद्दल वयात आल्यानंतर जर अभिलाषा निर्माण झाली आणि त्यावेळी ती मात्र बुरख्यात वावरत असून मानसुद्धा वर करण्याच्या परिस्थितीत नसली, तिच्या व आपल्या घरचे यांना काहीही थांगपत्ता नसला व तो लागला तर परिणाम भीषण होण्याची शक्यता असली तर माणसाने आपल्या भावना व्यक्त कशा करायच्या? बर, त्यातही फ़ारसी / उर्दू या काही आपल्यासारख्या खड्या बोली नाहीत. शब्दाशब्दात अदब! आप, जनाब, फ़र्माइये, याद किया याशिवाय बोलणेच नाही. म्हणजे त्याच भाषेत आर्तता मांडणे आले. दोन तीन वर्षांपुर्वी पाकिस्तानातील एका खेड्यातील एक बातमी मी वर्तमानपत्रात वाचली होती. एका मुलीला रस्त्यातून जाताना मुहल्ल्यातील काही मवाली लोकांच्या तोंडी थट्टेला सहन करावे लागले. ती घरात येऊन कुणाशीच काही बोलली नाही. मात्र तिच्या दोन सख्ख्या भावांना ही बातमी मुहल्ल्यातील इतरांकडून मिळाली. त्यांनी घरी येऊन आपल्या बहिणीला ’खानदानाची इज्जत घालवली’ म्हणून मारून टाकले.

अशा संस्कुतीमधे आपली नैसर्गीक कामभावना शमवणे यासाठी ’अनैसर्गीक’ प्रेम हा एक मार्ग उपलब्ध होताच. अनेक पुरुषांना आपली कामभावना शमवण्यासाठी संपर्कातील मुलेच उपयोगी पडायची. मूळ गज़लेत यास्वरुपाचे उल्लेख बरेच दिसतात. मला नक्की माहीत नाही, पण मी ऐकलेला एक शेर आहे ज्यात पुरुष कवी आपल्या प्रेमिकेला उद्देशून लिहीत आहे की तू चाल’ली’च आहेस तर ( मला तरी ते चाल’ला’च आहेस तर असे वाटते ) माझा एकांतही घेऊन जा.

तू जा रहा है तो तनहाईयाभी लेता जा
ये ताल्लुकातकी परछाईया भी लेता जा

समलिंगी संभोग त्या संस्कृतीमधे अमान्य नव्हता. ’अमान्य’ कुठलीच संस्कृती करू शकणार नाही म्हणा! ’खोजे’ हा प्रकार त्यातून निर्माण झाला असावा असे मला वाटते. मात्र, या माझ्या विधानाबद्दल मला काहीही खात्री नाही. हे विचित्र वाटू शकेलही, पण हे सत्य आजही आपल्याही कोर्टाला कायदेशीररीत्या मान्य करावेच लागले.

या व अशा कारणांमुळे गज़ल ही मुख्यत्वे करून ’पुरुषाने’ रचण्याचा काव्यप्रकार झाला. आज तशी परिस्थिती अजिबात नाही. आपल्याकडे तर मुळीच नाही. तेव्हा आता स्त्री अगदी श्रेष्ठ गज़लकार व्हायला काही हरकत नाही.

मराठी स्त्री गझलकार फार नसण्याबाबत :

१. आपण ज्या कवींचा उल्लेख केलेला आहेत (पैशाला पासरी कविता लिहिणारे ) ते कवी नसतात. ते 'कविता सादरीकरणाची संधी शोधणारे' स्वयंघोषित साहित्यिक असतात.

२. खर्‍या कवींच्या काव्यातील 'एकंदर' संदेशातून :

अ - सामाजिक परिस्थिती गुण-दोषांसकट समजणे (पुढच्या कुठल्याही पिढीला )
ब - समाजातील अन्याय्य रुढी /समजुती याविरुद्ध प्रक्षोभ व्यक्त होणे
क - वाचकाला दिलासा मिळणे

या गोष्टी होतात. बहिणाबाई व मर्ढेकर ही चांगली उदाहरणे! तुकाराम हे सर्वोत्कृष्ट उदाहरण!

३. गझलतंत्राची एकंदर भीती, त्याला द्यायला लागणारा वेळ नसणे, 'आशयाला तंत्रापेक्षा जास्त महत्व आहे' हे ठासून सांगण्यात समाधान मानणे, दुर्दैवाने अजूनही पुरुषांइतके समाजाभिमूख नसणे, गझलेतील प्रामुख्याने हाताळला गेलेला विषय म्हणजे 'अप्राप्य प्रेम' हे व्यक्त करायला लाज वाटणे किंवा तसा समाज नसणे यासमान कारणांमुळे महिला गझलेकडे वळत नसाव्यात.

४. भटसाहेबांच्या प्रकाशित काव्यातील जवळजवळ वीस टक्के काव्य हे समाजातील रुढींवर आसूड ओढणारे आहे. असे 'बिनधास्त व्यक्त' होणे स्त्री सहसा करणार नाही. भटसाहेबांच्या उर्वरीत प्रकाशित काव्यात हळुवारपणा, व्यथा, अप्राप्य प्रेमाचा उल्लेखही आहे. पण त्यासाठी त्यांनी शेरांची जी उंची गाठली आहे ती आजपर्यंत मराठीत कुणी गाठली आहे असे वाटत नाही. त्यामुळे स्त्री गझलकार त्यांच्याच जमिनींवर 'बिलगून रात्र गेली', 'मिठी रेशमाची' सारख्या गझला करताना दिसतात. (हे कुणालाही उद्देशून वगैरे नाही.)

गझल हा 'माणसाने कवितेत स्पष्ट होण्याचा' सर्वात ठळक काव्यप्रकार असल्याने व आपल्या समाजातील स्त्री अजूनही अस्पष्ट राहण्यातच धन्यता मानत असल्याने हे होणारच!

-सविनय
बेफिकीर!

महिला गझल कमी का लिहितात ?
हे तुम्हाला कोणी सांगितले?
महिला गझलकार संख्येने कमी नाहीतच. कमी-जास्त याचे गुणोत्तर माण्डताना कोणापर्यंत काय पोचले आहे तेही पहावे. महिलांपर्यंत गझल अजून म्हणावी तितकी पोचलीच नाही आहे. ज्यांच्यापर्यंत ती पोचली आहे अशा अनेक महिला गझल लिहितात.

मुळात स्वतःला गझलकार म्हणविणारे पुरूष अशी किती गझल लिहितात वा समाजासमोर आणतात की आपण या प्रश्नाचा उल्लेख करावा?

स्वतःला गझलकार म्हणविणारे फारशी गझल का लिहीत नाहीत वा समाजासमोर आणत नाहीत असा खरेतर प्रश्न असायला हवा. अर्थात तुम्ही कशावर चर्चा घडवावी हा तुमचा प्रश्न.

केदार,
एक गमतीचा भाग असा की, बेफिकीरसह तुम्ही आणि मी निदान १-१ तरी स्त्री गझलकार निर्माण करायला काय हरकत?

चुभूद्याघ्या.

धन्यवाद, अजय.
महिला गझलकारही खूप आहेत, ही बहुमूल्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
टक्केवारीचा आपला अंदाज काय आहे, हे जाणून घ्यायची तीव्र इच्छा आहे.

आपला गमतीचा भाग फारच कल्पनारम्य आहे. आपण तो मांडल्यापासून माझे काही क्षण स्वर्गीय सुखात गेलेले आहेत.

ज्यांना गझल भिडते, ते लोक गझल लिहितात.
यात लिंगसापेक्ष काही नसावे, असे वाटते.

या साईटवरील क्रांतीताईंच्या गझला उदाहरणार्थ घेता येतील.

गंमतशीर चर्चा आहे.. चालू देत.
गझल जमत नाही , वेळ नाही, आशय महत्त्वाचा , सामाजिक जाणिव, स्पष्टवक्तेपणा, अप्राप्य प्रेम इत्यादी व्यक्त करणे जमत नाही म्हणून गझल लिहित नाहीत, वा हे करणे ज्यांना जमते त्याच स्त्रिया गझल लिहितात असे काही असावे असे मला नक्कीच वाटत नाही.

क्रिएटिव्ह रायटिंग करणारी प्रत्येक स्त्री जवळजवळ सर्व लेखन प्रकार हाताळते.तसा प्रयत्न करून पाहाते.( पुरुषही याला अपवाद नसावेत). त्यातले तिला जे भिडते आणि जे आतून करावेसे वाटते ते ती स्त्री अधिकाधिक प्रमाणात करते. ज्याला खरेच लेखन करायचे आहे ती व्यक्ती कोण काय म्हणते म्हणून लेखन करत नाही वा थांबवतही नाही.
केदार तुझ्या प्रश्नांची उत्तरे निदान माझ्याकडून
१- ज्यांना गझल भिडते त्या लिहितात.
२. गझल कमी पोहोचली असे मला तरी वाटत नाही.
३. जीवन जाणिवा आणि गझल जाणिवा वेगळ्या असतील तर उत्तम गझल लिहिता येणार नाही:) असो. गझल जाणिवा म्हणजे जर तंत्र आणि संबंधित माहिती असे असेल तर महिला आणि पुरुष यात भेदभाव नसावा... काह्।ई मूलभूत गोष्टी सोडल्या तरी जीवनजाणिवा या सुद्धा प्रत्येक स्त्रीचा अनुभव, वाचन , आवड यावर आहेत व्यक्तीसापेक्ष आहेत.

आज लेखन करणारी स्त्री स्पष्तवक्ते पणा टाळते असे मला तरी वाटत नाही. लेखनाची सुरुवात, प्रयत्न आणि त्यात आत्मविश्वास या पायर्‍या चढत किती वेगाने पुढे जायचे हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. कोणताही लेखन प्रकार हा श्रेष्ठकनिष्ठ असे काही नसते, नसावे. ते तुम्हाला आणि इतरांना भिडणे हेच महत्त्वाचे आहे. त्याकरता सच्चेपणा महत्त्वाचा आहे. माझ्याकरता गझल आतून येत नाही. एखादा शेर आपोआप येतो आणि इतर शेर तंत्राचा विचार करत पूर्ण करावे लागतात. हे मान्य करण्यात मला कमीपणा वाटत नाही. . शेर मनासारखे होत नाहीत म्हणून गझला अप्रकाशित राहतात. कविता सुद्धा यामुळे मी अप्रकाशित ठेवते. पण व्यक्त होणे ही माझी गरज आहे. म्हणून मी लेखन चालू ठेवते. कोणता फॉर्म आहे याचा विचार नंतर करते. माझ्यानावावर गझला कमी म्हणून मी गझलकार नाही असे होईल पण मी निव्वळ गझलकार होण्याच्या मोहात पडून क्वेवळ गझलच लिहीन अशी तडजोड करु शकत नाही:)

ज्यांची गझल आतून येते ते अनेक गझला लिहितात, मग त्यात स्त्री पुरूष असा भेद नसावा असे माझे मत आहे.

सन्माननीय सोनालीताई,

महिला गझलकार एकंदर संख्येने पुरुष गझलकारांपेक्षा कमी का आहेत याचे उत्तर आपल्या प्रतिसादातून मला तरी जाणवले नाही. म्हणजे, उदाहरणार्थ, एकंदर गझलकारांमधे ८५ ते ९० टक्के पुरुष गझलकार असून उरवरीत टक्केच फक्त महिला असतात (हे फक्त उदाहरण आहे ) असा चर्चेचा मुद्दा असून ते तसे का असे विचारण्यात आले आहे. आपले उत्तर इंटरेस्टिंग आहे हे नक्कीच पण मूळ मुद्याबाबत आपले मत निश्चीत्पणे समजले नाही.

कृपया राग नसावा.

-सविनय
'बेफिकीर'

माझ्याकडे ह्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. स्त्रिया गझला लिहीत का नाहीत ह्याचे योग्य उत्तर गझल न लिहिणाऱ्या, लिहू शकणाऱ्या कवयित्रीच देऊ शकतील.

पण मनात एक विचार आला आहे. स्त्री असो वा पुरुष, काही जण खूप भावनिक असतात. त्यांना लिहायचं असतं. खूप खूप लिहायचं असतं. गझल हा गोळीबंद, आटीव काव्यप्रकार आहे. भडभडून, बदाबदा अभिव्यक्त होण्यासाठी हा काव्यप्रकार योग्य नाही. पसरटपणाला, पाणचटपणाला वाव नाही. भावगीतीय गुळमटपणाला इथे वाव नाही. त्यामुळे अनेक जण गझल लिहितात, फसतात व प्रयत्न करणे सोडून देतात. तूर्तास एवढेच.

गझल हा गोळीबंद, आटीव काव्यप्रकार आहे......
त्यामुळे अनेक जण गझल लिहितात, फसतात व प्रयत्न करणे सोडून देतात

बहुतांशी खरे वाटते.

गझल लिहायचीच, आणि गझलच लिहायची असा अट्टाहास असणारे काही खरे गझलकार नव्हेत!
आपल्याला जे सुचतंय, स्फुरतंय ते मांडणं महत्त्वाचं!
काही जणांना गझल हे माध्यम आवडतं, जमतं म्हणून ते गझल लिहितात.

कदाचित स्त्रीमनाला दरवेळी आपली मतं गझलेतून मांडणं अवघड जात असेल,
प्रत्येक काव्यप्रकाराचा एक बाज असतोच ना!
उद्या कोणी म्हणेल स्त्रिया पोवाडे का लिहित नाहीत? ते स्त्रियांना कदाचित शोभत नसेल!
बहिणाबाईंच्या ओव्या बहिणाबाईंनाच शोभतात,
तरुणाच्या ओठी प्रेमगीत किंवा स्फूर्तीगीत असेल जलद लयीतलं; त्याने 'वासांसि जीर्णानि यथा विहाय' म्हणू नये!