अशक्य केवळ

तुझाच वावर मनात केवळ
निभाव आता अशक्य केवळ

नको अता ही उगाच जवळिक
पुन्हा मनाचे दुभंग केवळ

तुझ्यामुळे ही फितूर गात्रे
अता गुलामी तुझीच केवळ

तुझी जराशी झुळूक यावी
कसे जगावे उन्हात केवळ

नको नव्याने तुझी उधारी
हिशेब नव्हते हिशेब केवळ

जयश्री

प्रतिसाद

बरी वाटली....
तुझी जराशी झुळूक यावी
कसे जगावे उन्हात केवळ

दोन शेर भलतेच  भारी  वाटले.
नको अता ही उगाच जवळिक
पुन्हा मनाचे दुभंग केवळ


तुझी जराशी झुळूक यावी
कसे जगावे उन्हात केवळ


 
बाकी  'कवाफी'  दिसले  नाहीत  गझलेत. 'अ'कारान्त  स्वर  काफिया  म्हणून  स्वीकारार्ह  आहे  का? जाणकारांनी  सांगावे.

नको नव्याने तुझी उधारी
हिशेब नव्हते हिशेब केवळ
  ... छान.
अकारान्त स्वर काफिया असावा की नसावा याबद्दल दुमत आहे. याबद्दल पूर्वी खूप चर्चा झालेल्या आहेत.
जाणकारांनी  सांगावे.  (म्हणजे नेमके कोणी?)

कलोअ चूभूद्याघ्या

@अजय-
जाणकारांनी  सांगावे.  (म्हणजे नेमके कोणी?)
म्हणजे  ज्याला  कुणाला  याबद्दल  निश्चित  काहीतरी  माहिती  असेल, अशा  कुणीही.
आधी  चर्चा  झाली  असेल, तर आनंद  आहे.
चर्चेचा  निष्कर्ष  काय  निघाला, ते  तुम्ही  सांगीतलेत  तरी  चालेल.
'काफिया' म्हणजे  'यमक' हे  सर्वमान्य  गृहीतक  आहे.
मनात, अशक्य, दुभंग, हिशेब  हे  काही  यमक  नाहीत.
शंका  आहे. निरसन  कुणीही  करावे.
जो  कुणी  निरसन  करेल, तो  माझ्या  दृष्टीने  जाणकार.

उर्दूप्रमाणे मराठीतही अकारान्त स्वरयमके स्वीकारता येणार नाहीत. त्यामुळे ही रचना कालांतराने विचाराधीन करण्यात येईल, ह्याची कृपया नोंद घ्यावी.

काफिया आवश्यक आहे.अकारन्त हा काफिया असून शकत नाही. मुक्तछंद कवितेत शक्य आहे, पण गझलेत नाही.

बाकी ..
नको नव्याने तुझी उधारी
हिशेब नव्हते हिशेब केवळ  ....
 
हा सुरेख विचार आहे. मस्तच.

प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"