गझल सुचण्याच्या प्रक्रियेचे निकष!

माझे मित्र श्री केदार पाटणकर यांनी

काफिया आणि रदीफ' या चर्चेमधे काही मते मांडली होती. त्या मतांवरून माझी, त्यांची व अजय जोशी यांची विविध विषयांवर चर्चा झालेली 'ताज्या चर्चा' या सदरामधे दिसतच आहे.

त्या चर्चेच्या अनुषंगाने, त्यातीलच एका मुद्यावर मी या ठिकाणी माझी मते मांडत आहे. आपल्याला विनंती की आपण यावर आपले मत द्यावेत.

माझा विषय आहे: गझल सुचण्याच्या प्रक्रियेचे निकष!

माझ्या मते 'गझल सुचणे' ही बाब नैसर्गीक आहे. म्हणजे ठरवून गझलकार होणे शक्य नाही. एखादा माणूस तंत्रशुद्ध रचना कशी करायची हे शिकू शकेलच. पण तंत्रशुद्धतेवर गझलेच्या गुणवत्तेचा दर्जा पूर्णपणे ठरू नये, तर फक्त गझलच्या बांधणीचा दर्जा ठरावा.

गझलेच्या गुणवत्तेमधे तंत्र ही 'नॉन निगोशिएबल' बाब आहे. त्यावर चर्चाच होऊ नये. जी निगोशिएबल बाब आहे ती आहे गझलेचा आशय! 'निगोशिएबल' म्हणजे 'भाव' करण्याच्या दृष्टीने घेऊ नये तर त्यावरून ठरावे की ते काव्य 'गझल' आहे किंवा नाही.

गझलेचा आशय काय असावा यावर अजय जोशी यांनी उपस्थित केलेल्या 'गझल आणि गझलियत' या चर्चेमधे मी माझी मते मांडली होती. सर्वात महत्वाचा मुद्दा हा समजला जावा असे मला प्रामाणिकपणे वाटते की 'गझल' हे काव्य वैयक्तिक व दैनंदिन अनुभवांवर आधारित आहे.

सुचण्याच्या प्रक्रियेचे निकष!

गझल सुचण्यासाठी:

१. २४ तास माणूस कवी म्हणुनच वावरला पाहिजे. त्याने जगाकडे 'कवीप्रवृत्तीने' पहायला पाहिजे. त्रयस्थाप्रमाणे स्वतःकडे त्याला पाहता आले पाहिजे. याचा अर्थ असा निश्चीतच नाही की कामधंदा सोडून कविता कराव्यात. पण जेव्हा केव्हा माणूस मोकळा असेल, जरा वेळ असेल तेव्हा काव्य स्फुरण्याची तीव्र कामना मनात असली पाहिजे. ते तसे होण्यासाठी एक दृष्टीकोन लागतो.

उदाहरण : - रस्त्यावर आपल्याकडे एक भिकारी भीक मागत आहे.

रागीट माणूस - "चल पुढे"
संत माणूस - "घे बाबा, ठेवून मला तरी काय फायदा"
सामान्य माणूस - नुसता हाताने नकार देणे, सुट्टे नसल्याचे सांगणे, तोंड फिरवणे, वैताग व्यक्त करणे
जरा जास्त शहाणा - "काम का नाही रे करत काहीतरी?"
उद्धट माणूस - हाकलल्यासारखे करणे
दानी माणूस - काही ना काहीतरी देऊन मनात देवाला सांगणे की केले रे बाबा मी थोडे दान!
कवी - अरे यार, ' भिकार्‍या मागतो आहेस पैसे माणसांपाशी -  अरे त्याच्याचसाठी ते इथे आहेत आलेले' असे म्हणुन एखादा रुपया देऊन टाकेल अन भिकारीही हसेल.

कवी असे म्हणू शकण्याचे कारण म्हणजे 'घडणार्‍या प्रत्येक बाबतीत त्याचा दृष्टीकोन हा एखाद्या तत्वज्ञासारखा किंवा अध्यात्मवाद्यासारखा असतो'. तो घडणार्‍या गोष्टींपेक्षा जास्त काहीतरी बघतो किंवा बघू शकतो. 'हा भिकारी एकटाच थोडीच भिकारी आहे?, सगळेच भिकारी आहेत' असे काहीतरी वाटाणे. 'असा माणूस असावा लागतो'. असे ठरवून होता येत नाही. ( अर्थातच, मी असा आहे वगैरे माझे दावे नाही आहेत)

२. नॉन निगोशिएबल तंत्र हे नैसर्गीकरीत्या बाणले गेलेले असले पाहिजे. म्हणजे, एक विचार आहे, तो आनंदकंदमधे बरा वाटेल की मंजूघोषामधे असा प्रश्नच मुळात पडू नये.

समजा पुर्वीचे प्रेम न आठवणारी किंवा त्याला विशेष महत्व न देणारी प्रेयसी कवीला रस्त्यात सामोरी आली अन ओळखीचे हासली तरः

आजही ती भेटल्यावर हासते
मात्र आधीसारखे ना खास ते

यापुढे 'हेही खरे' किंवा 'हासते' या शब्दाआधी 'ओळखीचे' हा शब्द वापरून पुढच्या ओळीत वृत्तासाठी आणखीन एखादा शब्द ( मात्र आधीसारखे ना हासणेही खास ते वगैरे ) घालावासा वाटणे हे 'कवीलाईक' नाही. 'कवीलाईक' हे आहे की मुळातच ओळ खालीलपैकी एका पद्धतीने सुचावी:

'आजही ती भेटल्यावर हासते - मात्र आधीसारखे ना खास ते'

किंवा:

'आजही ती भेटल्यावर ओळखीचे हासते - मात्र आधीसारखे ना हासणेही खास ते'

हां, अशी ओळ सुचल्यावर ऍक्चुअली सादर करेपर्यंत त्यात कित्येक बदल होऊ शकतील, पण मुळात ओळ वृत्तात सुचावी. 'हल्लीसुद्धा ती हासते, पण ते हासणे काही पुर्वीसारखे नसते' ही फक्त जाणीव आहे. या जाणीवेची वृत्तबद्ध ओळ करणे ही प्रवृत्ती 'कवीलाईक' आहे. आणि ती प्रवृत्ती सदोदीतची असायला हवी. 'जाणीवेची वृत्तबद्ध ओळ करूयात' ही जाणीव होणे माझ्यामते 'अनैसर्गीक' आहे.

आता समजा ही एक ओळ वृत्तात सुचली, तर पुढची गझल व्हायलाच पाहिजे असे नाही. पण आणखीन एक दोन अनुभव असतील, म्हणजे कुठेतरी आलेले अपयश, कसलीतरी आलेली नशा, कुठलीतरी इतर तीव्र भावना, तर त्यावर शेर रचण्याची इच्छा होणे हे नैसर्गीक आहे. कारण गझलेमधे मुळात आकर्षणच इतके असते की एक शेर रचून थांबावेसे वाटत नाही. आता या स्टेजला कवींमधे फरक पडतो. कुणी घाईघाईत काहीतरी रचेल ( 'मी' हे कदाचित याचे उत्तम उदाहरण असावे ), कुणी खूप वेळ घेईल, कुणी दोन तीनच शेर रचून थांबेल वगैरे. पण मुळात सुचले पाहिजे ते काव्यरुपातच!

'गझल सुचण्याची प्रक्रिया' या विषयावरही माझी काही मते आहेत, पण 'प्रक्रियेचे निकष' या विषयात ती घेणे योग्य ठरणार नाही.

अवांतर - एक वर्षभरात, मला या साईटमुळे 'तंत्र' या बाबतीत अतिशय फायदा झाला. येथील कित्येक गझलकारांना हे माहीत आहे की माझ्या अनेक रचना 'तंत्र' या कारणासाठी विचाराधीन व्हायच्या. तसेच, आजही काहींच्या मते माझ्या रचनांमधे काही त्रुटी असतील. पण मला असे वाटते की 'चांगली गझल करू शकणे व गझलेबाबतीत काही मते असणे' या दोन भिन्न गोष्टी आहेत. म्हणून मी हा लेख लिहिलेला आहे.

धन्यवाद!














गझलचर्चा: 

प्रतिसाद

सारखं कसं कवी म्हणुन वावरणार?

सारखं कसं कवी म्हणुन वावरणार?
मग रवी म्हणून वावरा. (लोणी काढणारी)
कवीने कवी म्हणूनच २४ तास वावरले पाहिजे. हां, अता कविता रचणारे कवी असतील तर वेगळा विचार करावा लागेल. कारण एकेका ओळीसाठी त्यांना जुळवाजुळव करायला बराच वेळ जात असेल. इकडचा अर्थ, तिकडचा शब्द, मग त्याला यमक पाहिजे-ते तिसर्‍या ठिकाणी असेल ते घ्या-फार म्हणजे फार झंझट असते. अशांनी दिवसातले ८ तासच कवी म्हणून रहावे.
आम्ही आपले २४ तास कवी.
कलोअ चूभूद्याघ्या

माझ्या मते 'गझल सुचणे' ही बाब नैसर्गीक आहे. म्हणजे ठरवून गझलकार होणे
शक्य नाही. एखादा माणूस तंत्रशुद्ध रचना कशी करायची हे शिकू शकेलच. पण
तंत्रशुद्धतेवर गझलेच्या गुणवत्तेचा दर्जा पूर्णपणे ठरू नये, तर फक्त
गझलच्या बांधणीचा दर्जा ठरावा.

 केवळ सुचणे ही नैसर्गिक बाब आहे. आता त्या सुचलेल्या कल्पनेला कुठल्या काव्यप्रकाराचे, साहित्यप्रकाराचे कोंदण द्यायचे हे जो तो आपल्या कुवतीप्रमाणे, इच्छेनुसार ठरवत असतो.

१. २४ तास माणूस कवी म्हणुनच वावरला पाहिजे. त्याने जगाकडे 'कवीप्रवृत्तीने' पहायला पाहिजे.
ठरवून कवी म्हणून वावरता येत नाही असे वाटते. जो कवी असतो तो २४ तास कवी असतोच. ही चक्री सतत सुरूच असते. कागदावर जेव्हा एखादी ओळ उतरवणे हा केवळ एक भाग झाला. असे असले तरी  कवीन कवितेला गंभीरपणे घ्यावे. स्वतःला घेऊ नये.

गझल सुचण्याच्या प्रक्रियेचे काही निकषच नाहीत. लोक आध्यात्म , कला , प्रतिभा ह्यांना शास्त्राच्या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न का करतात हेच मला कळत नाही. अर्थात भूषण चा विचार स्तुत्य आहे व विचार करायला लावणारा आहे. पण गझल का सुचते , केव्हा सुचते ह्याचे काही म्हणजे काहीच ठोकताळे नाहीत.

कवी हा चोवीस तास कवी असतो असे मला वाटत नाही. पण एकदा तो कवितेच्या "मोड" मध्ये गेला की तो पुर्णत्वाने कवी असतो. गझलेच्या बाबतीत थोडा बदल असू शकेल. दोनच ओळी सुचल्या की त्या स्वतःच्या चालीत दिवसेन दिवस गुणगुणत राहणे हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्याची मजा आहे. तुम्हालाही असे गुणगुणत फिरण्याचे मस्त अनुभव असतीलच की !


प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"

दोन काय, मी तर अगदी एकच मिसरा सुचलेला असेल तरी २-३ दिवस गुणगुणतो कधी कधी :)

स्वत:ची ग़ज़ल गुणगुणत राहणे यात एक वेगळाच आनंद मिळतो. कधी कधी (नेहमीच) एखादा वेगळा शेर सुचतो. वेगळी चाल सुचते. माझ्या बर्‍याच ग़ज़ला गुणगुणत झाल्या आहेत.
शरद

मझ्या मनिच्या अन्तरन्गी तुझ्या विरहाचि खन्त होती
तुज पाशी पोहचवणारी वाट ही किती सन्थ होती