आशयाचा अंदाज न बांधता येणे - गझलेचे प्रमुख वैशिष्ट्य!

उर्दू व मराठीतील अनेक गझला वाचल्यानंतर एक मुद्दा मला जाणवला, तो म्हणजे गझल व इतर काव्यप्रकारामधील जो फरक उर्दूमधे बर्‍याच अंशी जाणीवपुर्वक सांभाळल्या गेल्यासारखा वाटतो, तो मराठी गझलांमधे तितकासा दिसत नसावा. तो फरक म्हणजे:


द्विपदीची पहिली ओळ ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर दुसर्‍या ओळीत काय म्हणायचे असावे याचा अंदाज बांधता न येणे किंवा तसा अंदाज बांधणे अवघड असणे. ( याला धक्कातंत्र असे संबोधण्यात येते, पण माझ्यामते धक्का हा शब्द तितकासा योग्य नसावा. )


अशा काही उर्दू शेरांची उदाहरणे:


१. कितनीही कोशिशोंसे क्यों न निकाले हम आह
लब तक आते ही तेरा नाम हुई जाती है - शाकिर औरंगाबादी


( कितीही प्रयत्न करून मी एक दु:खोद्गार काढायचा प्रयत्न केला तरी ओठापर्यंत येता येता त्या उद्गाराचे परिवर्तन तुझ्या नावात होते - म्हणजे सतत तुझे नावच येते - इथे असा अंदाज वाटू शकतो की तरीही दु:खोद्गार निघतच नाही इतकी दु:खाची सवय झाले आहे वगैरे!)


२.  रात भी निंद भी कहानी भी
      हाय क्या चीज है जवानी भी - फिराक गोरखपुरी


३. उनके देखे से जो आजाती है मुह पे रौनक
     वो समझते है कि बीमार का हाल अच्छा है - गालिब


( इथे असा अंदाज वाटु शकेल की मी आजारी असताना ती मला भेटायला आल्यावर माझ्या चेहर्‍यावर अशी काही चमक आली की मी बरा झालो वगैरे, पण तसे न म्हणता असे म्हंटले गेले आहे की माझ्या चेहर्‍यावर अशी चमक आली कि तिला वाटले मी तर आधीच बरा आहे, खोटेच कारण काढून मला येण्यास भाग पाडले वगैरे ! )


४. किस कदर खुश नझर आते है मेरे शहरके लोग
      आज अखबार किसीने न पढा हो जैसे - नैय्यर


५. मुझ जैसे रिंदको भी तूने हश्रमे या रब
     बुलालिया है तो कुछ इंतजाम हो जाये - शाद


( हे देवा, माझ्यासारख्या दारुड्याच्या पापपुण्यांचा हिशोब करायला तू बोलवतच आहेस तर जरा थोडे पेग लावूनच येतो, म्हणजे मजा येईल. )


६. हम जिसे जिंदगी समझते है
     कैफ चढती हुई थकान का है - खलीश कादरी


७. हम भटककर जुनूं की राहो मे
    अक्लसे इंतिकाम लेते है - सरदार अंजूम


८. आपके कदमोंके नीचे दिल है
     एक जरा आपको जहमत होगी - सिराज


( इथे असे वाटू शकेल की शायर म्हणेल 'जरा जपुन पाय टाक, मला त्रास होईल'. पण शायर म्हणत आहे की माझे ह्रुदय पायाखाली आहे, जरा जपुन पाय टाक की तुला त्रास होऊ नये. )


९. शक न कर मेरी खुश्क आखोंपर
    यूं भी आसू बहाये जाते है - सागर


( 'माझे अश्रू वाहून वाहून संपले आहेत' असे ऐकायला मिळेल असे वाटते. पण शायर म्हणतो की कोरड्या डोळ्यांनी सुद्धा अश्रू वाहतात, ती पण एक पद्धत आहे. गर्भितार्थ - मी तुझ्यावर किटाळ येऊ नये म्हणुन स्वतःचे अश्रू समाजाला दाखवत नाही याचा अर्थ असा घेऊ नकोस की मला दु:ख नव्हतेच. )


१०. आये थे मुझसे मिलने मगर मै न जब मिला
        वो मेरी बेखुदीसे मुलाकात कर गये ( आदम )


( शायराला ती भेटायला आली पण शायर भेटला नाही म्हंटल्यावर ----असे वाटते की ती रागवुन गेली असेल किंवा त्यानंतर तिने प्रेम करणे सोडून दिले असेल किंवा शायराला कळल्यावर शायराला प्रचंड पश्चात्ताप झाला असेल्...पण नाही...शायर तिथेच होता, तिच्या विचारात, त्यामुळे त्याला ती आल्याचे कळलेच नाही. )      


ही उदाहरणे तशी अगदीच साधी आहेत. ( मला जितके उर्दू कळते त्यावरून घेतलेली. ) पण अशी अनेक उदाहरणे असू शकतील. 


अर्थातच अशीही अनेक उदाहरणे असू शकतील ज्यात बर्‍याच अंशी अंदाज येतो की काय मुद्दा असावा.


पण 'दुसर्‍या ओळीचा अंदाज बांधता न येण्यासारखी दुसरी ओळ असणे' हे उर्दूमधील बर्‍याच गझलांचे वैशिष्ट्य व सौंदर्यस्थळ आहे असे माझे मत आहे.


आता काही मराठी शेरांची उदाहरणे: ( यात व्यक्तिगत काहीही नाही ).


१. तुझ्याविना रहायचे कसे?
     जिवंत मी जगायचे कसे?


२. सौंदर्यावर मला भाळणे जमले नाही
     प्रेमामध्ये जीव टाकणे जमले नाही


३. मी दिला आवाज येथे लाभली पण साथ नाही
हात हा केला पुढे मी लाभला पण हात नाही


४. माझ्याच भावनांना मज जाळता न येते
     माझ्याच वेदनांना मज टाळता न येते


५. एकमेकांना विसरणे शक्य नाही
     ही नशा आता उतरणे शक्य नाही


वरील शेरांमधे दुसर्‍या ओळीमधे आशयाला कलाटणी मिळणे किंवा अनपेक्षित काहीतरी ऐकायला मिळणे असे होण्याची शक्यता कमी वाटते.


अशा दृष्टीने मराठीतील अनेक गझला पाहिल्यास मला असे वाटते की माझ्या या वरील मताशी सहमती दर्शवण्यासारखी परिस्थिती असावी.


अर्थात, या गोष्टी व्यक्तिसापेक्ष आहेतच. तेव्हा सर्वांच्याच मतांचा आदर आहे.


मराठी गझलमधे हे वैशिष्ट्य आणण्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न व्हावेत अशी माझी इच्छा आहे, असे नोंदवून मी रजा घेतो.


 


                 


 

गझलचर्चा: 

प्रतिसाद

भूषण,

मतांशी बहुतांशाने सहमत.

कलाटणी मिळण्याचा मझा उर्दूत खूप छान येतो.

आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. तशा गझला कराव्यात. त्या वाचून आम्हा इतर गझलकारांना स्फूर्ती मिळेल व ज्ञानात भर पडेल.  

लोभ आहेच.


केवळ "आशयाचा अंदाज न बांधता येणे - गझलेचे प्रमुख वैशिष्ट्य!"  आहे असे मला वाटत नाही.

शेराचा टोन (लहजा) ही कधीकधी वैशिष्ट्य असू शकते. तर कधी द्विपदीच एवढी सहजसुंदर असते, काव्यमय असते की त्यात अंदाज बांधता आला तरी बिघडत नाही.

हुस्न से कबतक पर्दा करते
इश्क से कबतक पर्दा होता
फ़िराक गोरखपुरी

तर कधीकधी कल्पनाच एवढी आगळीवेगळी असते की वाचक वेगळेपणाच्या प्रेमात पडतो. दुनिया है बेपनाह तो भरपूर ज़िंदगी
दो औरतों के बीच में लेटा हुआ हूँ मैं
बशीर बद्र

कधी कधी ओळी अगदी चित्रदर्शी असतात.
सुबह होते ही निकल आते हैं बाज़ार में लोग
गठरियाँ सर पे उठाये हुए ईमानों की
अहमद नदीम क़ासमी

अनेक गोष्टी आहेत.  हे एक अजब रसायन आहे.  ह्याचा फॉर्म्यूला सांगणे कठीण आहे. तूर्तास एवढेच.

सांगायचे पहिल्या ओळीत सांगून झाले असेल तर दुसर्‍या ओळीचे काही काम नसते. असे तुम्ही दिलेल्या मराठी उदाहरणांत झाले आहे असे वाटते.

गझलेचे प्रमुख लक्षण म्हणजे ती काळजाला भिडलीच पाहिजे.कारण ती सरळ सरळ काळजाची कविता आहे. दुसर्या ओळीची उत्कंठा पहिल्या ओळीने वाढली पाहिजेच ह्यात प्रश्न नाही.

प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"