मराठी गझलेसाठी संकेतांचा वापर

या लेखात मी माझी मते दिली आहेत, ती मी माझ्या गझलांमधे पूर्णपणे पाळली आहेत असे मला म्हणायचे नाही, फक्त आपण सर्वांनी विचारात घ्यावीत अशी विनंती!


गझलेतील संकेतांचे स्थान या विषयावर मला चर्चा घडवून आणायची आहे. श्री अजय जोशी यांच्या 'गझल आणि गझलियत' या चर्चेमधे मी 'संकेत' या विषयावर थोडे लिहिले होते. इथे जास्त विस्ताराने देत आहे.


गझलेतील संकेत


संकेतांची व्याख्या - संकेत म्हणजे अशा बाबी ज्या त्या संस्कृतीतील प्रथा, प्रघात, रुढी, रीती, निष्ठा, काल्पनिक किंवा सत्य समजुती आहेत अन त्या संस्कृतीतील सर्व लोकांना त्यांचे ज्ञान आहे.


गझलेत संकेत - गझल हे एक बहुतांशी संवादरुपी किंवा स्वगतस्वरुपाचे काव्य असल्यामुळे तसेच ते मनाशी किंवा भावनांशी निगडित असल्यामुळे त्यात त्या त्या संस्कृतीच्या संकेतांचा उल्लेख नुसता होतोच असे नव्हे तर तो उल्लेख गझलेला खुलवतोही.


उदाहरणे -


गझल मुळातच उर्दूमधून आपल्याकडे आलेली असल्यामुळे संकेतांचा वापर उर्दू मधे कसा केला जात होता हे पाहणे महत्वाचे ठरेल. उर्दूमधे 'शम्मा-परवाना', 'जाहिद-नासेह-शेख-वाईज' यासारखे संकेत प्रचंड प्रमाणावर वापरले गेले. जाहिद/नासेह/शेख हे साधारणपणे धर्मोपदेशक असायचे जे सतत लोकांना सागायचे की प्रेम ( भौतिक प्रेम - जसे कवी प्रेयसीवर करतो ते ) खोटे आहे किंवा ती माया आहे. ते असेही सांगायचे की दारू अतिशय वाईट अन इस्लामला मान्य नाही. पण कवी तो कवीच! त्याच्या मनावर राज्य त्याचे स्वतःचे असायचे. तो जर प्रेमात वेडा झाला किंवा नशाबाज झाला असेलच तर नासेह किंवा जाहिदचे कोण ऐकत बसणार? या भुमिकेतून अशा उपदेशकांची टर उडवली जाणे ( गझलेमधून ) हा संकेत दृढ झाला. उदाहरणासाठी हसरत दाग देहलवींचा हा शेर! 


वाईज बडा मजा हो अगर युं अजाब हो
दोजखमे पाव और हाथमे जामे शराब हो


( हे उपदेशका, जगबुडीच्या दिवशी असे झाले तर किती मजा येईल ना? की माझे पाय नरकात असले तरी चालेल पण हातात मद्याचा प्याला असावा ) - इथे उपदेशकाची सौम्य टर उडवली आहे.


संकेत रूढ होणे किंवा सशक्त होत जाणे:


आता गृहीत धरा की वाईजची इतपत सौम्य टर उडवणे मुशायर्‍यात भाव खाउन गेले. आता पुढच्या एखाद्या मुशायर्‍यात 'वाईज' किंवा 'नासेह' चा उल्लेख झाला तर आधीच्या वेळच्या उपस्थित लोकांना दागचा तो शेर आठवेल. त्यांचे कान आधीच अपेक्षा करायला लागतील की आत्ता ऐकू येत असणार्‍या शेरामधूनपण अशीच काहीतरी मजा येणार आहे. ही भावना दृढ होणे म्हणजे संकेत दृढ होणे. आता जर नवीन शायर म्हणाला की 'हे उपदेशका तू म्हणत होतास तेच खरय की दारू वाईट असते', तर लोकांना मजा येणार नाही. जर तो असे म्हणाला की  'तू म्हणतोस खरे की दारू वाईट असते पण मी काही फारशी पीत नाही काही?', तर लोकांना 'दाग'च्या शेराइतकी मजा येणार नाही. जर कवी असे म्हणाला की 'दारू वाईट असेलही, पण मी त्याच्यामुळे दु:ख विसरतो', तरी लोकांना फारशी मजा येणार नाही.


पण....


मिर्झा असद उल्ला खान गालिब :


कहा मयखानेका दरवाझा 'गालिब' और कहां वाईज
पर इतना जानते है कल वो जाता था के हम निकले ( स्वगत - मक्ता )


( खरे तर आम्हाला वेळोवेळी पिऊ नका असे संदेश देणारा उपदेशक अन दारूचा गुत्ता यांच्यात काहीच संबध नाही गालिब, पण तुला एवढे सांगतो की काल आम्ही प्यायला म्हणुन गुत्त्याच्या दारात पाऊल टाकले अन वाईज आम्हाला क्रॉस करून बाहेर पडला )


इथे इतकी टर उडवली आहे की 'लोका सांगे' प्रमाणे लेकाचा वाईजच पिऊन निघाला आहे. दागच्या शेरानंतर अर्थातच हा शेर वरच्या पातळीचा समजला जाणार! हे  म्हणजे संकेत नुसतेच 'दृढ होणे' नसून  'संकेत गझलेचा आत्मा बनत बनत' गझलेला अफाट सौंदर्य बहाल करतो.


आता पुढे पहा:


एक शेर आहे:


जाहिद शराब पीने दे मस्जिदमे बैठकर
या वो जगह बता..जहा पे खुदा न हो


अर्थ सांगण्याची गरजच नाही. 'अरे तू जर म्हणतोस की देव सगळीकडे आहे, तर मशीदीत दारू प्यायली काय अन इतरत्र प्यायली काय? एकच नाही का? नाहीतर अशी जागा दाखव जिथे देव नाही'.


आता याच विषयावरचे आणखीन काही शेर पहा:


लुत्फे मय तुझसे क्या कहू जाहिद
हाय कंबक्थ तुने पी ही नही ( तुला त्यातली मजा काय कळणार? ) - दाग


ना तजुर्बाकारीसे वाईजकी ये बाते है
इस रंग को क्या जाने पुछो तो कभी पी है - ( अनुभवच नाही बिचार्‍याला, बडबडतो काहीतरी! एकदा पिऊन तर बघ म्हणाव! )   -  अकबर इलाहाबादी


जाहिद ये मेरी शोखी-ए-रिन्दाना देखना
रहमत को बातो बातो मे बहला के पी गया ( मी तर देवालाही बोलण्यात गुंतवून प्यायली बर उपदेशका? तू माझ्यापुढे काय आहेस? ) - जिगर मुरादाबादी


असे एकाच संकेताचे उपयोग करताना अर्थाला मात्र जास्त जास्त उंचीवर नेण्यात आले. अर्थात याच्यात रसिकांच्या अभिरुचीचा अन आकलनशक्तीचा प्रश्न असतोच. म्हणजे आपल्याकडील 'ज्येष्ठ नागरिक संघात' दारूवरचे शेर आवडणार नाहीत, पण महाविद्यालयांमधे आवडू शकतील. तसेच, 'मागच्या वेळेला या विषयावर जे ऐकले होते त्यापेक्षा भन्नाट हे आहे' असे वाटण्यासाठी आकलनशक्ती लागते. 


अशा रीतीने, आज जर उर्दूमधे जाहिद या विषयावर शेर झाला तर


- मी जाहिदला प्यायलावर घरी सोडून आलो
- मी आणि जाहिद मशीदीतून एकत्रच प्यायला गेलो
- मी दारू सोडण्यासाठी मशीदीत गेलो तर जाहिदच पीत होता


अशा स्वरुपाची उंची गाठली गेल्यास आश्चर्य वाटु नये.


असे मराठी गझल मधे झाले असावे की नाही हे माहीत नाही, मात्र मला फारसे अनुभवायला आले नाही.


उर्दूमधे असे अनेक संकेत आहेत. 'जाहिद' हे फक्त एकच उदाहरण आहे.


संकेतांची आवश्यकता - संकेतांमुळे रसिकाला ते काव्य आपल्या भूमीचे वाटते. तो तिथे स्वतःला आयडेंटिफाय करू शकतो.


मराठीतील संकेतांसाठी असलेले विषयः


माझ्यामते आपल्याकडे इतक्या प्रचंड रुढी आहेत की आपल्याला संकेतांची कमतरता भासूच नये.


१. उपासतापास
२. सोवळेओवळे
३. मूर्तीपूजा
४. सण - जसे दिवाळी, दसरा, होळी, नवरात्र
५. प्रथा - जसे बळी देणे, वडाची पूजा करणे
६. कार्ये - मुंज, साखरपुडा, लग्न
७. इतर अनेक फक्त मराठी गोष्टी


माझ्यामते आपल्याला गझलेच्या विषयांसाठी अन गझलेचे सौंदर्य खुलवण्यासाठी एक रान मोकळे आहे. अर्थात, त्यात गझलेचा जो आत्मा, म्हणजे आशय, हा अबाधित रहावा. म्हणजे एखाद्याने नुसते 'साखरपुडा' या विषयावर काव्य न करता, 'साखरपुड्याची मजा लग्नानंतर येत नसल्यामुळे मी तिला फक्त साखरपुड्याचेच वचन दिले 'वगैरे असे म्हंटल्यास ते योग्य ठरावे. त्यानंनर मग कुणीतरी, ' ही पॉलिसी तिनेच माझ्याशी वापरली, तिने साखरपुडा माझ्याशी झाल्यावर लग्न दुसर्‍याशीच ठरवले' असे म्हंटल्यास ( हे फक्त एक लगेच सुचलेले उदाहरण आहे ) संकेत थोडासा दृढ व्हावा.


आपण यावर आपली मते द्यावीत अशी विनंती! 


धन्यवाद!



 


 


 


 


 

गझलचर्चा: 

प्रतिसाद

भूषण साहेब, चांगला  मुद्दा  मांडलात.
संकेत म्हणजे अशा बाबी ज्या त्या संस्कृतीतील प्रथा, प्रघात, रुढी, रीती, निष्ठा, काल्पनिक किंवा सत्य समजुती आहेत अन त्या संस्कृतीतील सर्व लोकांना त्यांचे ज्ञान आहे.
उर्दू  गझलकारांची  उदाहरणे  देऊन आपण  वरील  मुद्दा  स्पष्ट केलाच  आहे. 

माझ्या  मते, कुठल्याही  कवितेतून  व्यक्त होणारे  संकेत  हे  तत्कालीन  समाजव्यवस्था, कवीची  मनोवृत्ती, त्याच्या  दैनंदीन जीवनात त्याला  भिडलेले  विषय, त्या  कवीची  एकंदर धार्मीक, राजकीय, सामाजीक, कौटुंबीक पार्श्वभूमी  इत्यादी  गोष्टींवर  अवलंबून  असतात. तुम्ही  उल्लेख केलात, त्या उर्दू  शायरांनी  नुसते  चंद्र, बुरख्यामागे  दडलेला  प्रेयसीचा चेहरा, मयखाना या  विषयांवर  कित्येक रचना  केल्या  असतील, नव्हे आहेतच. त्याच  त्या संकेतातही त्यांना  दरवेळी  अधिकाधिक  चांगले  शेरही  रचता आले  आहेत. पण  हा  एकंदर  त्यांच्या  "तबीयतीने" केलेल्या  "फुलटाईम" शायरीचा, आणि  एकंदर जगण्याचा परीघ मर्यादीत असण्याचा  परिपाक  नसावा  का?
तिलकधारी  यांनी  कुठल्यातरी  प्रतिसादात  असे म्हटले आहे, की त्याकाळी  शायरीवर  पोटे  भरत असत. हल्ली  फक्त  डोळे  भरतात. हे अगदी खरे आहे.
हा  कुणालाही  कमी  लेखण्याचा प्रयत्न नाही. तात्पर्य एवढेच, की  आजचा  मराठी  शायर (किंबहुना  मराठी  माणूस) त्या  उर्दू शायराइतका  "डेडीकेटेड" नाही, असू शकत नाही. आजच्या कवीच्या अनुभवविश्वाच्या  कक्षा  रुंदावल्या आहेत. उपासतापास, सोवळे, सण-उत्सव या गोष्टींचा तितका पगडा त्याच्यावर  नाही, जितका तबीयतदार उर्दू शायरांवर मदिरा किंवा  मदिराक्षीचा आहे.
याचा अर्थ असा नाहीच की मराठी  गझलेत संकेतांचा वापर नाही. वापर आहेच, पण संकेत बदलले आहेत. जगणे  चहूबाजूंनी  प्रचंड वेगाने अंगावर येते आहे. मनातल्या कुठल्याही सूक्ष्म भावनेचा  सखोल उहापोह करण्याची उसंत कुणालाच नाहीये. अगदी  साध्यासुध्या चाकरमान्या मराठी (वा भारतीय) माणसालाही  त्याची  इच्छा असो वा नसो, "ग्लोबल सिटीझन" व्हावे लागते आहे. अर्वाचीन उर्दू शायरीतही कालानुरूप बदल घडले असावेत असा माझा अंदाज आहे. माझा तेवढा व्यासंग नसल्याने मी ते सांगू शकत नाही.
सुरेश भटांनीही बाराखडीत एक मुद्दा मांडलाय- "मराठी  गझलेला मराठी मातीचाच सुगंध आला पाहिजे" अशा स्वरूपाचा. त्यातही  त्यांना मराठी  संकेतांचाच वापर अभिप्रेत असावा. पण  एकंदर मराठी मातीचाच सुगंध "ग्लोबल" होत चालल्यामुळे, गझलेवर तो परिणाम जाणवावा यात नवल नाही.
मराठी  गझलेत (मी वाचलेल्या!) अनेकदा येणारे संकेत- आरसा, मनाला झालेल्या जखमा, लोकांनी  केलेली  फसवणूक यासंबंधीचे आहेत. आरशावर तर असंख्य शेर आहेत. (त्यातल्या बहुसंख्य शेराचा आशय सारखाच आहे- आरशातल्या व्यक्तीची ओळख न पटणे वगैरे.)
या साईटवर काही  खास  मराठी  संकेत असणारे शेर आहेत-
"त्यांचेच स्वच्छ ओटे, त्यांचे पवित्र लोटे..." (ओंकार)
"आलीस कपाळावर तू गोंदून फुलांचा रस्ता.."(वैभव देशमुख)
"राहिले माझे तुझे नाते घसा-यासारखे.." (चित्तरंजन)
"देव  सत्संगामधे बंदिस्त झाला, तो कसा दीनाघरी धावेल आता?" (पुन्हा चित्त)
"सारे ठरून गेले, हे नाटकाप्रमाणे.." (प्रदीप कुलकर्णी)
"फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा.." (अनंत ढवळे)
"मेंदू अपुला म्हणजे लोकल ट्रेन जशी..." (अनंत ढवळे)
"मिळावा मोक्ष ही इच्छा शवालाही कुठे आहे?" (तिलकधारी)
ही काही पटकन आठवलेली उदाहरणे. थोडी शोधाशोध केली, तर अशी असंख्य "मराठमोळी" उदाहरणे सापडतील, अगदी माझ्या किंवा तुमच्या किंवा सुनेत्रा सुभाष यांच्या गझलेतसुद्धा!!!
मुद्दा इतकाच, संकेत नाहीत असे नाही. संकेत बदलले आहेत. कालानुरूप नवनव्या संकेतांचाही मराठी गझलेने स्विकार केला आहे. आपणही करावा.
जय महाराष्ट्र !

प्रिय ज्ञानेश,

प्रतिसादाबद्द्ल धन्वचाद! प्रतिसाद आवडलाही.

१.) एक फरक नोंदीस आणून देत आहे, जो माझ्यामते मूळ मुद्यात व आपल्या प्रतिसादामधे मला जाणवला.

संकेत व प्रायॉरिटी हा तो फरक!

मी संकेतांमधे मराठी रुढींचा उल्लेख केला आहे, जसे साखरपुडा, बळी देणे, उपास करणे वगैरे!

आपण प्रायॉरिटीज बदलल्याचा उल्लेख केला आहेत.

म्हणजे असे की: आजही साखरपुडा, बळी देणे, उपास, मुंज, लग्न, श्राद्ध या प्रथा बर्‍यापैकी अस्तित्वात आहेत. एकंदर सांस्कृतिक देवाणघेवाणींमुळे व वेळेअभावी काही लोक काही गोष्टी पाळत नाहीत. ते त्या गोष्टी पाळत नाहीत ही त्यांची प्रायॉरिटी आहे. पण 'ते पाळले जायचे' याचे त्यांना ज्ञान असणे हे 'संकेताचे ज्ञान' आहे. या अर्थाने आजही संकेत रूढ तर आहेतच, पण बर्‍याच ठिकाणी ते पाळलेही जात आहेत. तेव्हा, मुद्दा असा आहे की 'ज्या संकेतांचे आपल्याला ज्ञान आहे' त्यांचा 'जाणीवपुर्वक' उल्लेख गझलेत करायला काही हरकत नसावी, किंबहूना तसा प्रयत्न व्हायला हवा.

२.) मराठी कवी डेडिकेटेड नाही हा आपला मुद्दा - हा मुद्दा मात्र मला पटत नाही. कवींच्या 'कवीपणामधे' काळानुरूप फरक पडणे हे विधान माझ्यामते तितकेसे योग्य नसावे. माणूस एक तर 'कवी' असतो किंवा 'कवी नसतो'. त्यात मधला स्तर नसतो असे माझे म्हणणे आहे.

३.) सूक्ष्म भावनांचा सखोल उहापोह करायला उसंत नाही - हे आपले विधानही मला पटत नाही. कारण माणूस जर कवी असेल तर तो उहापोह करण्यासाठी वेळ काढणारच. पण अर्थातच क्रमांक २ व ३ ही माझी वैयक्तिक मते आहेत, कुणाची ती भिन्न असू शकतात.

४.) आपण दिलेली उदाहरणे व त्यात संकेतांचे अस्तित्वः

"त्यांचेच स्वच्छ ओटे, त्यांचे पवित्र लोटे..." (ओंकार) - यात संकेत आहे.


"आलीस कपाळावर तू गोंदून फुलांचा रस्ता.."(वैभव देशमुख) - यात संकेत आहे.


"राहिले माझे तुझे नाते घसा-यासारखे.." (चित्तरंजन) - यात संकेत नाही.


"देव  सत्संगामधे बंदिस्त झाला, तो कसा दीनाघरी धावेल आता?" (पुन्हा चित्त) - संकेत आहे.त्याच गझलेतील आणखीन एका शेरात जास्त सशक्त संकेत आहे -
'नीज कविते, जागण्याची वेळ झाली - अंगणी आई दिवा लावेल आता' - अंगणात दिवा लावणे हा संकेत आहे.


"सारे ठरून गेले, हे नाटकाप्रमाणे.." (प्रदीप कुलकर्णी) - संकेत नाही.( नाटकामधे काय दाखवायचे हे ठरलेले असते हा मराठी संकेत नाही. ही उपमा झाली. )


"फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा.." (अनंत ढवळे) - संकेत नाही.


"मेंदू अपुला म्हणजे लोकल ट्रेन जशी..." (अनंत ढवळे) - संकेत नाही. उपमा आहे.


"मिळावा मोक्ष ही इच्छा शवालाही कुठे आहे?" (तिलकधारी) - संकेत आहे. माणूस मेल्यानंतर केल्या जाणार्‍या गोष्टी हा संकेत आहे.
मुद्दाम आपले दोन शेर लिहितो - 
ठेवणीतला नको करूस दागिना मला - वापरातला तुझा रुमाल होत जाऊदे - यात 'ठेवणीतला दागिना' हा संकेत आहे तर 'वापरातला रुमाल' हा संकेत नाही.

पेल्यात व्हायच्या त्या - झाल्या कपात चर्चा - यात संकेत आहे. मित्रांनी भेटण्यासाठी 'दारू' निवडणे किंवा चहा प्यायला भेटणे हे बर्‍यापैकी संकेत आहेत. ( जसे आपण म्हंटले आहेत की संकेत बदलतात. ) ५० वर्षापुर्वी कदाचित दारूची पार्टी हा संकेत ठरला नसता.
आणखीन काही उदाहरणे -

१. अजय जोशी यांची टाहो ही गझल काही संकेतांचा निर्देश करते२. अनंत ढवळे - ध्रुवा सांगते खूप काही मला - तुझे एकट्यानेच तेजाळणे - यात ध्रूव हा संकेत आहे.
३. जयंता ५२ यांचा हा शेर - सोडताना ती म्हणाली 'वायदा तो' - एक जन्माचाच होता सात नाही - सात जन्म हा संकेत आहे.
४.प्रदीप कुलकर्णी - हा हवा होता गुलाबी ना जरा? - रंग मेंदीचा न तळव्यासारखा - मेंदी हा संकेत आहे.
५.माझा शेर ( गझल विचाराधीन झाली कारण 'अलामत' भंगली ) - अस्थी माझ्या घ्यायला ते पोचले दुसर्‍या दिनी - तप्त कविता गवसल्या मतितार्थ सारी शायरी - अस्थि घ्यायला जाणे हा संकेत आहे.
६. नशा मी भूतलावर एवढी उपभोगली की बस - पुन्हा चक्रात आले मोक्षवासी त्रस्त झालेले - हाही माझाच शेर आहे. मोक्षवासी हा एक संकेत आहे.
७.आपला शेर - आपल्याही माणसांना ठोकरावे लागते - अर्जुना उमगावयाला वळ जावा लागतो - यात अर्जून/ गीता हे संकेत आहेत.
८. प्रदीप कुलकर्णी - मी अहल्येसारखी आहे शिळा - एकदा जाशील का जवळून तू? - यात अहल्या हा संकेत आहे.

अवांतर -
उर्दू शायर फुलटाईम शायर असल्यामुळे व त्यांचे अनुभव विश्व मर्यादीत असल्यामुळे त्यांच्या कवितांमधे / गझलांमधे संकेत भरपूर असतात असे नाही तर त्यांनी शायरीला व गझलेला वर्षानुवर्षाच्या प्रयत्नांनंतर व साधनेनंतर एका प्रचंड उंचीवर नेले होते. आपल्याकडे गझल अजून तरूण आहे, साधारण ५०/६० वर्षांची! त्यांच्याकडे, जर 'मीर' पासून सुरुवात केली तर आज ती जवळ जवळ २५० वर्षे जगलेली आहे. किवा अधिकच! कारण मीरच्या आधीही गझल सदृश काव्य आहे. मी तर म्हणेन की गझलाच आहेत. माझ्यामते 'गझल' वर जहरी टीका करणारा परंतू नंतर 'गझल'च्या प्रेमात पडणारा 'अमीर खुस्रो' हा कितीतरी आधीचा आहे.

वास्तव : - उर्दूमधील सर्व गझला श्रेष्ठ नाहीत. मराठीमधील कित्येक शेर असे आहेत जे उर्दू शेरांपेक्षाही बेहतर आहेत. प्रश्न उर्दू सरस की मराठी हा नसून संकेतांचा जाणीवपुर्वक वापर करणे हा आहे.

आपला प्रतिसाद आल्याने फार बरे वाटले.

धन्यवाद!