...काय फायदा ?

...काय फायदा ?

काढू तुझा कशास माग...? काय फायदा ?
सारा वृथाच पाठलाग...काय फायदा ?

तुज आठवून चांदणे मिळेल का कधी...?
मिळणार फक्त आग आग...काय फायदा ?

गेले घडायचे घडून....जे घडायचे...
कोणावरी धरून राग...काय फायदा ?

स्वार्थी  सवाल हाच सारखा मला छळे  -
`केलास तू कशास त्याग...? काय फायदा ?`

लागायचा कलंक, लागलाच शेवटी...
आता धुऊन डाग डाग...काय फायदा ?

जमवून ठेवलेत फक्त शून्य शून्य तू...
गुणलेस वा  दिलास  भाग...काय फायदा ?

तू रक्त शिंपलेस, शिंपशीलही उद्या...
गेल्यावरी जळून बाग...काय फायदा ?

होतात ओळखी नवीन, लाभ हा जरी -
झालो मलाच मी महाग...काय फायदा ?

वागायचा तसाच वागतोस तू मना...
सांगून रोज ,  `नीट वाग...` काय फायदा ?

दोहा निदान एक पाहिजे सुचायला...
नुसता मिळून हातमाग...काय फायदा ?

डोळे मिटायचीच वेळ येत चालली...
येऊन शेवटास जाग...काय फायदा ?

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

प्रदीप,
दर वेळेस आधीच्या गझलहून सरस लिहतोस!
होतात ओळखी नवीन, लाभ हा जरी -
झालो मलाच मी महाग...काय फायदा ?
वागायचा तसाच वागतोस तू मना...
सांगून रोज ,  `नीट वाग...` काय फायदा ?
दोहा निदान एक पाहिजे सुचायला...
नुसता मिळून हातमाग...काय फायदा ?----क्या कहने!

(भक्त)
जयन्ता५२

 
 
 
 

प्रदीपजी, काय शेर आहे हो हा! भाग आणि जाग हे शेरही खूप आवडले.
इतक्या अप्रतिम गझला. एकूणच आयुष्यात माजलेल्या medocrity मधे माझ्यासारख्या सर्वसामान्य मराठी रसिकाला अशा या बहुप्रसवी अभिजात सर्जनशीलतेचा आधार वाटतो. तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत...

मस्त गझल. प्रदीप एकूण एक शेर फार आवडले. त्यातही महाग, हातमाग, जाग क्या बात है! 

प्रदीपजी,गुणवत्ता टिकवून, सातत्याने  इतके भरपूर लिहित आहात की तुमचा चाहता होण्यावाचून गत्यंतर नाही.
दोहा निदान एक पाहिजे सुचायला...
नुसता मिळून हातमाग...काय फायदा       हा शेर वाचून" आजका दिन बन गया" म्हणावंस वाटतं.

वा प्रदीपराव वा !!!
नेहमीप्रमाणेच अप्रतिम गझल. तुमच्या गझलांनी आम्हाला नेहमीच मोहिनी घातली आहे. वेगळे काय सांगणार?
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
आपला,
(चाहता) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

क्या बात है!!!!!!!!
सगळेच शेर सुंदर. कोणकोणत्या म्हणून शेरास दाद द्यावी ? अख्खी गझल सुंदर आहे. गझलेचे सर्व (मला माहित असलेले) गुण ओतप्रोत असलेली गझल आहे ही - आपल्या सर्वच गझलाप्रमाणे. नाविन्य, खटकेबाजपणा, साधे-सोपेपणा, सौंदर्य, माधुर्य --- किती किती सांगावेत!!!!
अजून पाठवा.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

अत्यन्त सुन्दर गझल...
़खुप खुप आवडली.
एताकि सुन्दर गझल मल कशी सुचलि नाही अशी प्रत्येकाला द्वेश भावना निर्मान व्हावी एताकी सुन्दर...
 
-श्रीजित वाघमारे

जबरदस्त.....
एकूण एक.....
चुभूद्याघ्या... *********************** वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!

दोहा निदान एक पाहिजे सुचायला...
नुसता मिळून हातमाग...काय फायदा ?

सुरेख !

प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"